नेपाळमधील शाळीग्राम शिळापासूनच का बनतेय प्रभू श्रीरामांची मूर्ती, काय आहे महत्त्व By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2023 06:21 PM 2023-02-01T18:21:01+5:30 2023-02-01T18:58:39+5:30
उत्तर प्रदेशमधील अयोध्या इथं भव्य श्रीराम मंदिर उभारलं जातंय. या मंदिराबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये रामजन्मभूमी मंदिराच्या ग्राउंड फ्लोअरच्या बांधकामाची डेडलाइन निश्चित झाली आहे. उत्तर प्रदेशमधील अयोध्या इथं भव्य श्रीराम मंदिर उभारलं जातंय. या मंदिराबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये रामजन्मभूमी मंदिराच्या ग्राउंड फ्लोअरच्या बांधकामाची डेडलाइन निश्चित झाली आहे.
जानेवारी २०२४ पर्यंत राम मंदिर बांधून पूर्ण होणार असल्याचंही गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलंय. आता रामाच्या मूर्तीचं कोरीव काम वेळेत पूर्ण करण्याची तयारी सुरू झाली आहे. रामाची मूर्ती साडेपाच फूट उंचीची उभ्या मुद्रेत असेल. त्यासाठी लागणाऱ्या शाळिग्राम शिळेचा शोधही संपला आहे.
या दगडाची व्यवस्था करण्यासाठी मंदिर ट्रस्टचे सदस्य कामेश्वर चौपाल यांना नेपाळच्या गंडकी नदी परिसरात पाठवण्यात आलं होतं. तिथून 7 फूट बाय 5 फूट आकाराची शाळिग्राम शिळा बाहेर काढण्यात आली आहे.
जनकपूरमध्ये 27 जानेवारी रोजी वसंत पंचमीच्या दिवशी शिळेची पूर्ण विधीपूर्वक पूजा करुन ही शिळा आता लवकरच अयोध्येत पोहोचणार आहे. जनकपूरहून मधुबनी-दरभंगा मार्गाने ही शिळा गोरखपूरला पोहोचली असून आता अयोध्येकडे रवाना झाली आहे.
श्रीराम यांच्या मूर्तीसाठी वापरण्यात येणारा हा शाळीग्राम खडक खूप महाग आहे. मात्र, नेपाळ सरकारच्या मदतीने तो मिळवण्यात आला आहे. या शाळिग्राम खडकाला धार्मिक महत्त्व आहे. यामध्ये भगवान विष्णूंचं निवासस्थान असल्याचं मानलं जातं.
शाळिग्राम शिळेत घडलेल्या मूर्तीचे सहा प्रकारचे फायदे आहेत, असं म्हटलं जातं. सुखी जीवन, समृद्धी, वाईट शक्तींपासून संरक्षण, उत्तम आरोग्य, वैश्विक आनंद आणि देवाची कृपा हे योग यातून बनतात, अशी मान्यता आहे. म्हणूनच या दगडाची निवड करण्यात आली आहे.
गंडकी नदीतील हा खडक निवडण्यासाठी नेपाळच्या पुरातत्त्व विभागाच्या तज्ज्ञांची मदत घेण्यात आली होती, असं कामेश्वर चौपाल यांनी सांगितलं. तज्ज्ञांच्या मदतीने उच्च दर्जाच्या दगडाची निवड करण्यात आली आहे, असंही ते म्हणाले.
राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील नामवंत कारागिरांची तीन सदस्यीय पथक रामाच्या मूर्तीचं डिझाईन आणि मॉडेल तयार करण्यासाठी काम करत आहे.
उभ्या मूर्तीची अनेक छोटी मॉडेल्स आतापर्यंत आली आहेत. मंदिर ट्रस्ट त्यापैकी कोणत्याही एकाची निवड करेल. ही मूर्ती साडेपाच फूट उंच असेल. याच्या खाली सुमारे 3 फूट उंचीचा पेडिस्ट्रियल असेल.
दरम्यान, पुढील वर्षी जानेवारीमध्ये मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर भव्य राम मंदिरात रामललाच्या अभिषेकाचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे, अशी माहितीही चंपत राय यांनी दिली.