सलूनमध्ये महिलेला अचानक आला Beauty Parlour Stroke; जाणून घ्या, नेमका काय प्रकार? By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2022 07:24 PM 2022-11-01T19:24:06+5:30 2022-11-01T19:27:01+5:30
हैदराबाद येथे अत्यंत धक्कादायक आणि हैराण करणारा प्रकार समोर आला आहे. याठिकाणी ब्यूटी पार्लरमध्ये हेअर कट करण्यासाठी आलेली महिला ब्यूटी पार्लर स्ट्रोक सिंड्रोमचा(Beauty Parlour Stroke Syndrome) शिकार बनली आहे.
या महिलेला तात्काळ उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात भरती करण्यात आले. सध्या महिलेच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. परंतु तिला पूर्णत: बरे व्हायला आणखी काही काळ लागू शकतो असं तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ५० वर्षीय महिला ब्यूटी सलूनमध्ये हेअर कट करण्यासाठी आली होती. सलूनमध्ये तिचं हेअर वॉश करण्यात येत होते. तेव्हा महिलेची तब्येत अचानक बिघडली. त्यानंतर या महिलेला ब्यूटी पार्लर स्ट्रोक सिंड्रोम झाल्याचं उघड झाले.
महिलेची तब्येत बिघडल्यानंतर सलूनमध्ये उपस्थित असणाऱ्या लोकांमध्ये गोंधळ झाला. काहींनी या महिलेला शहरातील अपोलो रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. नेमकं या महिलेला काय झालं? याबाबत कुणालाही काही कळालेच नाही.
मात्र अपोलो हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी महिलेला ब्यूटी पार्लर स्ट्रोक सिंड्रोम झाल्याचं सांगितलं. याबाबत सीनियर कंसल्टेंट सुधीर कुमार यांनी म्हटलं की, ब्यूटी पार्लर स्ट्रोक सिंड्रोम त्यावेळी होतो जेव्हा कुणालाही खूप उशीर मानेला मागच्या बाजूस वर उचलून सरळ बसण्यास सांगितले जाते.
विशेषत: पार्लरमध्ये जेव्हा एखाद्याला केस धुण्यास सांगितले जाते तेव्हा त्या खुर्चीवर अशाप्रकारे बसावं लागते. ज्यात मानेवर जोर दिला जातो. मान मागच्या बाजूस वरच्या बाजूला उचलून ठेवावी लागते. त्यानंतर केस धुतले जातात. परंतु ही स्थिती धोकादायक ठरू शकते असं डॉक्टर सांगतात.
सलूनमध्ये हेअर वॉश करताना अशा स्थितीत बसावे लागते. त्याचसोबत केस सुकवण्यासाठीही मानेला मागच्या बाजूस करून बसावे लागते. या पूर्ण प्रक्रियेला जवळपास ४०-४५ मिनिटे लागतात. इतका वेळ अशा स्थितीत राहण्यामुळे नसांवर दाब येतो.
२०-२५ मिनिटांनी रक्तांचा पुरवठा इतका कमी होतो की, त्यामुळे रक्ताची गुठळी तयार होते. त्यामुळे स्ट्रोक सारखी स्थिती येते त्याला ब्यूटी पार्लर स्ट्रोक सिंड्रोम म्हटलं जाते. या महिलेसोबत असेच झाले आहे. मान मागच्या बाजूस जास्त वेळ ठेवल्याने रक्ताची गुठळी तयार झाली.
सध्या या महिलेची प्रकृती सुधारत असून अद्यापही तिच्या तब्येतीवर डॉक्टर लक्ष ठेवून आहेत. या महिलेला पूर्णत: ठीक व्हायला तयार २-३ आठवडे लागू शकतात असं डॉक्टरांनी म्हटलं आहे. ब्यूटी पार्लर स्ट्रोक सिंड्रोमचा हा प्रकार पहिल्यांदा अमेरिकेत समोर आला.
१९९३ मध्ये या प्रकारामुळे महिलेने पार्लरविरोधात तक्रार केली होती. त्यानंतर ब्यूटी पार्लर स्ट्रोक सिंड्रोम खूप चर्चेत आला. अशाप्रकारे झालेल्या स्थितीला त्यावेळी ब्यूटी पार्लर स्ट्रोक सिंड्रोम असं पहिल्यांदा नाव देण्यात आले होते.