कोरोना चाचणी चुकवून महिलेनं लग्नासाठी गोवा गाठलं; नंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला अन्... By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2020 02:20 PM 2020-06-06T14:20:46+5:30 2020-06-06T14:28:13+5:30
मुंबईहून गोव्यातल्या कलंगुटला एक महिला लग्नासाठी गेली होती. गोव्यात प्रवेश करताना तिनं कोरोना चाचणी चुकवली.
कलंगुटमधल्या ग्रामपंचायत सदस्याची सासू असलेल्या महिलेनं तिथे एका नातेवाईकाच्या लग्नाला हजेरी लावली.
३१ मे रोजी विवाह सोहळा संपन्न झाला. एका प्रसिद्ध नाईटक्लब मालकाच्या घराशेजारी संपन्न झालेल्या सोहळ्याला जवळपास ४०० जण हजर होते.
संबंधित महिलेला श्वसनाचा त्रास होऊ लागल्यानं तिला नातेवाईकांनी गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथं तिची कोरोना चाचणी घेण्यात आली.
महिलेची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येताच सगळ्यांचेच धाबे दणाणले. या प्रकरणात खुद्द गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी लक्ष घातलं आहे.
संबंधित महिलेच्या संपर्कात आलेल्या काही जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर इतरांनी पुढे येऊन कोरोना चाचण्या करून घेण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
महिलेची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानं लग्नाला उपस्थित असलेल्या पंचायत सदस्यांना आणि महिलेच्या जवळच्या नातेवाईकांना क्वारंटिन करण्यात आलं.
संबंधित महिलेनं गोव्याच्या सीमेवर कोणतीही कोरोना चाचणी केली नव्हती. चाचणी चुकवून ती गोव्यात आली होती, असं सावंत यांनी सांगितलं.
महिलेनं गोव्यात प्रवेश करताना कोरोना चाचणी कशी चुकवली, याची चौकशी करण्याचे देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
बाहेरच्या राज्यातून गोव्यात प्रवेश करताना संबंधित व्यक्तीला आयसीएमआरची मान्यता असलेल्या लॅबमधून देण्यात आलेलं प्रमाणपण सादर करावं लागतं. हे प्रमाणपत्र ४८ तासांपेक्षा जास्त वेळापूर्वी असलेलं चालत नाही.
बाहेरून येणाऱ्या व्यक्तीनं कोरोना चाचणी केली नसेल, तर तिला राज्यातील सरकारी मान्यताप्राप्त लॅबमध्ये कोरोना चाचणी करावी लागते.