आज संपूर्ण जग रडतंय! लता मंगेशकरांच्या आठवणींचा संग्रह जपणाऱ्या चाहत्याला अश्रू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2022 08:36 PM2022-02-06T20:36:13+5:302022-02-06T20:42:02+5:30

Lata Mangeshkar: भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर आज अनंतात विलीन झाल्या. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण देशभरात शोक व्यक्त केला जात आहे. लता दीदींच्या आठवणींचा संग्रह केलेल्या एका चाहत्यानंही आपल्या भावना व्यक्त केल्या.

दैवी सुरांनी संपूर्ण जगातील श्रोत्यांना गेल्या सहा दशकाहून अधिक काळ तृप्त केलेल्या भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं आज निधन झालं. पंतप्रधान, राष्ट्रपतींसह अनेक दिग्गजांनी शोक व्यक्त केला. त्यासोबतच मेरठमधील एका चाहत्याचाही विशेष उल्लेख इथं करणं महत्त्वाचं आहे.

मेरठमधील स्थायिक गौरव शर्मा गेल्या ३५ वर्षांपासून गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना समर्पित केलेलं संग्रहालय सांभाळात आहेत. लता दीदींच्या निधनाची बातमी कळताच त्यांना अश्रू अनावर झाले.

आज संपूर्ण जग रडतंय, अशा शब्दांत गौरव शर्मा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. गौरव शर्मा यांनी त्यांच्या राहत्या घरातच लता मंगेशकर यांच्या गाण्याच्या अनेक सीडी, कॅसेट्स यांच्यासह त्यांना पुरस्कार प्राप्त झाल्याच्या वृत्तपत्रात छापून आलेल्या बातम्यांची कात्रणं असा अनोखा खजिना आजवर संग्रहित केला आहे.

गौरव शर्मा यांनी जेव्हा लता मंगेशकर हे नाव पहिल्यांदा ऐकलं तेव्हा ते अवघे ८ वर्षांचे होते. लता दीदींचं गाणं ऐकून मोठं झालेल्या गौरव शर्मा यांनी त्यांना आपलं गुरू मानलं होतं. लता दीदींप्रतीचं त्यांचं प्रेम त्यांनी केलेल्या संग्रहावरुनच लक्षात येतं.

लता दीदींबद्दल जे काही छापून यायचं त्याची कात्रणं गौरव शर्मा यांनी जमा केली आहेत. त्यांच्यावर छापून आलेल्या पुस्तकांचाही संग्रह शर्मा यांच्याकडे आहे. लता दीदींना समर्पित केलेल्या या संग्रहालयाला गौवर शर्मा यांनी 'लतांजली', असं नाव दिलं आहे.

लता मंगेशकर यांना जेव्हा या अनोख्या संग्रहालयाची माहिती मिळताच ऑगस्ट २०१३ साली गौरव शर्मा यांना खुद्द लता दीदींना भेटण्याचा योग आला. गौरव शर्मा यांनी लता दीदींची मुंबईत प्रभूकुंज या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती.

लता दीदींना समर्पित असलेला हा संग्रह जमा करण्यासाठी कुटुंबीयांनीही नेहमी मदत केल्याचंही गौरव शर्मा सांगतात. त्यांच्या मातोश्रींनी देखील लता दीदींचं जाणं हा देशाचा खजिना असल्याचं म्हणतात.