...अन् थेट राजीनामाच द्यायला निघाले होते योगी; वाचा, संघ दरबारी गेलेल्या वादाची पडद्यामागची स्टोरी By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:29 PM 2021-06-11T16:29:50+5:30 2021-06-11T16:42:27+5:30
"...यापेक्षा सरसंघचालकांनी आदेश दिला, तर आपण आपला राजीनामा देऊ. सरसंघचालकांच्याच आशिर्वादाने आपण मुख्यमंत्री आहोत आणि आपले दायित्वही निष्ठेने पार पाडत आहोत". (Yogi Adityanath, RSS) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने, दिल्लीतील तीन दिवसांच्या बैठकीनंतर, उत्तर प्रदेशातील राजकीय घडामोडींसंदर्भात भाजपला जो सल्ला दिला, त्यावर पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने काम करायला सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचा दिल्ली दौरा आणि भाजप नेत्यांच्या भेटी यासंदर्भात माहिती देताना सूत्रांनी म्हटले आहे, की संघाच्या आशीर्वादाने योगी आदित्यनाथच मुख्यमंत्री पदावर कायम राहतील आणि लवकरच राज्य मंत्रिमंडळचाही विस्तार होईल. (The Yogi had set out to resign; Read the behind story of the yogi BJP controversy RSS gave advise)
यात, माजी आयएएस अरविंद कुमार शर्मा आणि भाजपत नुकतेच आलेले माजी केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद यांना मंत्रीमंडळात स्थान दिले जाऊ शकते.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्लीत गृह मंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी उत्तर प्रदेशसंदर्भाततील सर्वच गुंतागुंतीच्या मुद्यांवर चर्चा केली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय नेतृत्वाकडून योगींवर अरविंद शर्मा यांना विधान परिषद सदस्य केल्यानंतर उप मुख्यमंत्री करण्यात यावे. तसेच त्यांच्याकडे गृह नियुक्ती तसेच काही महत्वाची आणि संवेदनशील खाती देण्यासाठी दबाव वाढत होता. मात्र, योगी हे टाळत होते.
यानंतर, केंद्रीय नेतृत्वच्यावतीने भाजपचे सरचिटणीस बीएल संतोष आणि प्रभारी राधा मोहन सिंह यांनी लखनौ येथे आमदार आणि मंत्र्यांशी चर्चा करून योगींवर दबाव वाढविला. एवढेच नाही, तर यावेळी राधामोहन सिंह यांनी राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि विधानसभा अध्यक्ष ह्रदय नारायण दीक्षित यांचीही भेट घेतली होती. यावेळी योगींना बदलण्याच्या चर्चाही होऊ लागल्या. मात्र, यावर योगींनी थेट सर संघचालक मोहन भागवतांशी संपर्क साधला आणि त्यांना आपल्या स्थितीसंदर्भात संपूर्ण माहिती दिली. यासंदर्भात अमर उजालाने वृत्त प्रसिद्ध केले आहे.
योगींच्या अत्यंत जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री योगी यांनी सरसंघचालकांना सांगितले, की गेली साडेचार वर्षे आपल्या सरकारने केंद्राच्या प्रत्येक आदेशाचे पालन केले आहे. एवढेच नाही, तर राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकांसाठी पक्षाच्या उमेदवारांची यादीही केंद्रीय नेतृत्व त्यांच्या सल्ल्याशिवायच तयार करून पाठवत होते आणि आपण तेही मान्य करत आलो आहोत.
राज्यातील अधिकाऱ्यांनाही थेट केंद्राकडून सूचना मिळत राहिल्या आणि आपण त्यावरही काहीच आक्षेप घेतला नाही. संघटनेच्या नावावर सरकारी कामांत आणि नियुक्त्यांत हस्तक्षेप सुरूच राहिल्या. मात्र, आता अपयशाचे खापर आपल्या माथी फोडले जात आहे, असेही योगींनी सरसंघचालकांना सांगितल्यांचे सूत्रांनी म्हटले आहे.
योगी भागवतांशी बोलताना असेही म्हणाले, की एखाद्या मुख्यमंत्र्याकडून गृह गोपनीय आणि नियुक्ती विभागही काढून घेतला गेला, तर त्या मुख्यमंत्र्याचे असूनही नसण्यासारखेच आहे. यापेक्षा सरसंघचालकांनी आदेश दिला, तर आपण आपला राजीनामा देऊ. एवढेच नाही, तर सरसंघचालकांच्याच आशिर्वादाने आपण मुख्यमंत्री आहोत आणि आपले दायित्वही निष्ठेने पार पाडत आहोत, असेही योगी यांनी म्हटले होते.
सागण्यात येते, की यानंतर दिल्लीत संघाचे वरिष्ठ पदाधिकारी आणि संघाशी संबंधित इतर संघटनांच्या प्रमुखांची तीन दिवस बैठक झाली. यात सर कार्यवाह दत्तात्रेय होसबोले आणि भाजपचे सरचिटणीस बीएल संतोष यांच्या अहवालावर चर्चा झाली आणि सर्वांच्या सहमतीने योगी हेच मुख्यमंत्री राहतील. मात्र, त्यांनी अरविंद शर्मा यांना जास्तीत-जास्त राज्य मंत्रीच बनवले जाईल, या निर्णयावरून माघार घ्यावी, असे ठरले.
योगींनी अरविंद शर्मा यांना कॅबिनेट मंत्री बनवायला हवे आणि मंत्रीमंडळातील फेरबदलात अथवा मंत्रीमंडळ विस्तारात भाजपच्या नेतृत्वाने मुख्यमंत्र्यांना विश्वासात घ्यायला हवे आणि आपसात चर्चा करून निर्णय घ्यायला हवा. तसेच, मंत्र्यांच्या विभागाच्या बाबतीतही मुख्यमंत्र्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही, असे म्हणत, संघाने एक प्रकारे मधला मार्ग काढून केंद्रीय नेतृत्व आणि योगी दोघांनाही आपापल्या भूमिकेवरून मागे हटण्याचा सल्ला दिला.