आकाश नेवे/आॅनलाइन लोकमतमोहालीतील आयएस बिंद्रा स्टेडियमच्या सपाट आणि फलंदाजीसाठी पोषक असलेल्या खेळपट्टीवर दोन्ही संघांनी दमदार फलंदाजीचे प्रदर्शन केले. मात्र, आमलाच्या शतकावर गुजरातची सांघिक कामगिरी भारी पडली. आमलाने ६० चेंडूत १०४ धावा केल्या, तर पंजाबच्या उर्वरित फलंदाजांनी ६० चेंडूत फक्त ८२ धावा केल्या. त्याच तुलनेत ड्वेन स्मिथने ३४ चेंडूत ७४ धावा केल्या.मात्र रैना, कार्तिक आणि इशान किशनच्या पूरक खेळीने गुजरातने विजय साकारला. प्ले आॅफच्या बाहेर असलेल्या गुजरात लायन्सने प्ले आॅफसाठी झगडणाऱ्या किंग्ज इलेव्हन पंजाबच्या मार्गातील अडचणी वाढवून ठेवल्या. आमलाचे शतक तसे पंजाबसाठी या सत्रात दोन्ही वेळा विजय मिळवून देऊ शकले नाही, त्याने दोन्ही वेळा १०४ धावाच केल्या. २० एप्रिलला आमलाने मुंबई इंडियन्स विरोधात ६० चेंडूतच १०४ धावा केल्या होत्या. गुजरातच्या ड्वेन स्मिथ आणि इशान किशन यांनी ९१ धावांची भागिदारी केली. दोनदा मिळालेल्या जीवदानाचा स्मिथने पुरेपूर फायदा घेतला. पंजाबच्या क्षेत्ररक्षकांनी तीन सोपे झेल सोडले, त्यात एकदा रैनाला जीवदान मिळाले होते.पंजाबला विजयासाठी काही धावाच कमी पडल्या. अखेरच्या षटकांत कार्तिकने चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला. आमला वगळता पंजाबच्या फलंदाजांनी कमी धावा काढल्या, हे संघाला मात्र महाग पडले. या खेळपट्टीवर दोनशेधावांचे लक्ष्य गाठणे आवश्यक होते. मार्शने ४३ चेंडूत ५५ धावा केल्या, हीच बाब बहुदा संघाला विजयापासून दूर घेऊन गेली. मार्शचा स्ट्राईक रेट १३४ होता. या उलट गुजरातच्या फलंदाजांनी बाद होण्याची पर्वा न करता मुक्तपणे फलंदाजी केली, त्याचा फायदा त्यांना झाला. इशान किशन वगळता सर्वच फलंदाजांनी १५० पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने धावा काढल्या, हीच बाबगुजरातच्या पथ्यावर पडली. पंजाबच्या गोलंदाजीचा विचार करता मोहित शर्मा, वरुण अॅरॉन, टी. नटराजन पुन्हा महाग पडले. वरुणने तर ४ षटकांत ४३ धावा दिल्या. नटराजननेही २.४ षटकांत ३२ धावा दिल्या. संदीप शर्मा फायदेशीर ठरला असला, तरी त्याचे प्रयत्न तोकडे पडले. त्याने धोकादायक ठरत असलेल्या रैना आणि फिंचला बाद केले.या पराभवाने पंजाबपुढील अडचणी वाढल्या आहेत. सोमवारी सनरायजर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स हा सामना आहे. अव्वल स्थानावर असलेल्या मुंबईला हैदराबादने पराभूत केले तर पंजाबला प्ले आॅफ गाठणे अशक्य होईल. पंजाबचे ११ सामन्यांत १० गुण आहेत, तर हैदराबादचे १२ सामन्यांत १३ गुण आहेत. त्यामुळे या दोन्ही संघांना प्ले आॅफ गाठण्यासाठी प्रत्येक सामना जिंकणे आवश्यक आहे.