प्रेरणादायी! वयाच्या ११व्या वर्षी आई-वडील गमावले; अमन सेहरावतनं ऑलिम्पिक गाठून मैदान मारलंच By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 01:51 PM 2024-08-10T13:51:29+5:30 2024-08-10T14:11:13+5:30
aman sehrawat olympics 2024 : भारताच्या अमन सेहरावतने भारतीय कुस्तीची परंपरा जपत कांस्य पदक जिंकले. अमन सेहरावतने भारताची परंपरा राखत कुस्तीत पदक जिंकले. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतीय शिलेदारांना म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही.
कुस्तीत भारत पदाकाच्या शोधात होता. पण, शुक्रवारी अमन सेहरावतने कांस्य पदकाची कमाई केली. २००८ पासून भारत प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत पदक जिंकत आला आहे.
बीजिंग ऑलिम्पिकपासून भारताला कुस्तीने पदकांच्या बाबतीत निराश केले नाही. पॅरिसमध्येही अमनने ती परंपरा खंडित होऊ दिली नाही आणि पुरुषांच्या ५७ किलो फ्रीस्टाइल कुस्ती प्रकारात कांस्य पदक जिंकले.
कांस्य पदकाच्या लढतीत २१ वर्षीय अमनने १३-५ असा मोठ्या फरकाने विजय संपादन केला. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा सर्वात तरूण भारतीय खेळाडू म्हणून अमनच्या नावाची नोंद झाली आहे.
अमनने त्याचे ऐतिहासिक पदक आपल्या आई-वडिलांना आणि देशाला समर्पित केले. ऑलिम्पिकसारख्या मोठ्या व्यासपीठावर पदक जिंकल्याने अमन प्रसिद्धीच्या झोतात आला.
पण, त्याचा इथपर्यंतचा प्रवास खूपच संघर्षमय राहिला आहे. पॅरिसच्या धरतीवर तिरंगा फडकावणाऱ्या अमनला आई-वडिलांचे प्रेम फार काळ लाभले नाही.
वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी अमनने आई-वडिलांना गमावले. एवढ्या लहान वयात त्याच्या डोक्यावरून आई-वडिलांची सावली उठल्याने त्याच्या आयुष्यात अंधार पसरला.
मात्र त्याने या अंधारावर मात करण्यासाठी कुस्तीचे क्षेत्र निवडले. मेहनतीच्या जोरावर त्याने ऑलिम्पिकपर्यंत मजल मारून कांस्य जिंकले. यासह त्याने त्याच्या दिवंगत वडिलांचे स्वप्न पूर्ण केले.
अमनच्या वडिलांनी त्यांच्या अकाली निधनापूर्वी त्यांच्या वडिलांनी २०१३ मध्ये अमनला छत्रसाल स्टेडियममध्ये दाखल करून कुस्तीचा मार्ग दाखवला होता. काही वेळातच हे स्टेडियम अमनचे दुसरे घर बनले.
२०२२ हे वर्ष अमनच्या कारकिर्दीतील एक मोठे टर्निंग पॉइंट ठरले. त्याने आशियाई अंडर-२० चॅम्पियनशिपमध्ये कांस्य आणि आशियाई अंडर-२३ चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक जिंकले आणि आता दोन वर्षांनंतर त्याने ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले.