Asian Games 2023 : ऊस अन् बांबूचा वापर करून भालाफेक शिकली अन् अनू आज भारताची 'राणी' ठरली! By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 09:21 PM 2023-10-03T21:21:03+5:30 2023-10-03T21:22:49+5:30
Asian Games 2023 : आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये आज भालाफेकीत ऐतिहासिक कामगिरी पाहायला मिळाली. अनू राणीने ( Annu Rani) महिलांच्या भालाफेकीत सुवर्णपदक जिंकले. २०२२च्या राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या अनूने आज इतिहास लिहीला. ७२ वर्षांच्या स्पर्धा इतिहासात भालाफेकीत सुवर्ण जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. अनूने ६२.९२ मीटर लांब भालाफेकला अनू राणीच जन्म २८ ऑगस्ट १९९२ मध्ये मेरठ येथे शेतकरी कुटुंबात झाला. ६० मीटरपेक्षा जास्त अंतरावर भाला फेकणारी अनू ही पहिली भारतीय महिला आहे. २०१९ च्या राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये अनूने ६२.३४ मीटर भालाफेक करून नवीन विक्रम केला. अनूने स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम चार वेळा मोडला आहे. तिने वर्ल्ड चॅम्पियनशिपची अंतिम फेरीही गाठली आहे.
अनूच्या हातातली ताकद भावाने ओळखली आणि त्याने उसाला भाल्याचा आकार दिला आणि तो अनूच्या हातात दिला. पण जेव्हा तिला या खेळाकडे गांभीर्याने घ्यायचे होते, तेव्हा तिला गावकऱ्यांकडून विरोध झाला.
कारण तिच्या गावात बहुतेक मुली घरची कामे करायच्या. तिच्या रूढीवादी वडिलांनाही तिचे खेळात कारकीर्द करणे मान्य नव्हते. मात्र, घरातील सर्वात लहान असलेली अनू राणी तिच्या वडिलांची समजूत घालत राहिली.
एका चांगल्या भाल्याची किंमत सुमारे १ लाख रुपये होती, जी ती विकत घेऊ शकली नाही. त्यामुळे तिने बांबूला भाल्याचा आकार दिला आणि त्याच्या सहाय्याने सराव सुरू केला. तिची या खेळातील आवड आणि प्रगती पाहून कुटुंबीयांनी पूर्ण ताकदीने अनूचा पाठपुरावा करण्याचा निर्णय घेतला.
भालाफेक हा केवळ ताकदीचा नव्हे तर तंत्राचाही खेळ असल्याचे अनूला समजले आणि तिने माजी भारतीय खेळाडू काशिनाथ नाईक यांच्याकडून भालाफेकचे प्रशिक्षण घेण्याचे ठरवले. काशिनाथ नाईक यांनी २०१० मध्ये दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते.