Paris Paralympics 2024 : जिद्दीला सलाम! पॅरालिसिस झाला पण हार न मानणारी 'अवनी', संघर्ष डोळ्यात पाणी आणणारा By ओमकार संकपाळ | Published: August 30, 2024 05:10 PM 2024-08-30T17:10:35+5:30 2024-08-30T17:14:56+5:30
avani lekhara paralympics 2024 : पॅरालिम्पिकमध्ये सलग दुसऱ्यांदा सुवर्ण पदक जिंकणारी अवनी लखेरा. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताच्या खात्यात सुवर्ण पदकाचा दुष्काळ पाहायला मिळाला. मात्र, पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या अवनी लेखराने नेमबाजीत सुवर्ण पदक जिंकून इतिहास रचला. (avani lekhara story)
विशेष बाब म्हणजे आपल्या सुवर्ण पदकाचा बचाव करणारी ती पहिली भारतीय ठरली आहे. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये देखील तिने सोनेरी कामगिरी केली होती.
अवनीने महिलांच्या १० मीटर एअर रायफल स्पर्धेत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. (avani lekhara medals) पॅरिस पॅरालिम्पिकमधले भारताचे हे पहिले पदक ठरले आणि तेही सुवर्णपदकच.
सलग दुसऱ्यांदा पदक जिंकताच अवनी प्रसिद्धीच्या झोतात आली. मात्र, तिचा इथपर्यंतचा प्रवास खूप संघर्षमय आहे. २०१२ मध्ये वयाच्या अवघ्या १२व्या वर्षी अवनीच्या वाटेत मोठा अडथळा आला. एका अपघातामुळे तिला अर्धांगवायू (Paralysis) झाला आणि तिला चालण्यासाठी व्हीलचेअरची मदत घ्यावी लागली.
पण, अवनीने हार न मानता पुढे जाण्याचा निर्णय घेतला. अपघातानंतर अवघ्या तीन वर्षांनी अवनीने शूटिंगला आपले आयुष्य बनवले. अवघ्या काही वर्षात तिने गोल्डन कामगिरी करुन दाखवली.
अवनीचे वडील प्रवीण सांगतात की, अपघातानंतर ती खूप शांत होऊ लागली. ती कोणाशीही बोलली नाही आणि पूर्ण तणावात गेली. या भीषण अपघातामुळे तिला खूपच त्रास सहन करावा लागला. ती इतकी अशक्त झाली होती की ती काहीच करू शकत नव्हती. हलकी वस्तू उचलणेही तिच्यासाठी कठीण होत होते.
तसेच अवनीला वयाच्या १२व्या वर्षी जेव्हा अर्धांगवायू झाला तेव्हा ती खचली होती. त्यावेळी आम्ही तिच्या भविष्याचा विचार करत असे. मग खूप विचार केल्यानंतर तिला नेमबाजीत हात आजमावायला सांगितले, असे अवनीच्या पालकांनी सांगितले.
अवनीचे वडील पुढे म्हणाले की, शूटिंगमध्ये पहिल्यांदा ती बंदूकही उचलू शकली नाही, पण आज यामुळे टोकियो पॅरालिम्पिकच्या व्यासपीठावर राष्ट्रगीत ऐकू आले. (अवनीच्या वडिलांनी ही प्रतिक्रिया मागील पॅरालिम्पिकवेळी दिली होती) खेळासोबतच अवनी अभ्यासातही हुशार आहे. याशिवाय इतर उपक्रमांमध्येही अवनी अव्वल राहते.
दरम्यान, अपघातानंतर अवनीला अस्वस्थ वाटू लागले तेव्हा आम्ही तिला मनोरंजनासाठी शूटिंग पाहायला घेऊन जायचो. इथूनच अवनीला या खेळाबद्दल आवड निर्माण झाली. तिने यासाठी खूप मेहनत घेतली आणि आता फळ मिळत आहे, असेही अवनीच्या वडिलांनी सांगितले.
अवनीने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये एक सुवर्ण आणि एक कांस्य अशी दोन पदके जिंकली होती. एका पॅरालिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी ती भारतातील पहिली महिला खेळाडू ठरली. यंदाच्या पॅरालिम्पिकमध्येही तिने गोल्ड जिंकून आपल्या सुवर्ण पदकाचा बचाव केला.