Commonwealth Games 2022 : १२ मल्ल, १२ पदकं! भारतीय कुस्तीपटूंची सर्वोत्तम कामगिरी, पाहा रेकॉर्ड ब्रेकींग पदकं एका क्लिकवर By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2022 07:54 AM 2022-08-07T07:54:55+5:30 2022-08-07T07:55:02+5:30
Commonwealth Games 2022 Wrestling : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या १२च्या १२ मल्लांनी पदकांची कमाई करून इतिहास घडविला. बर्मिंगहॅम येथे झालेल्या या स्पर्धेत दोन दिवसांत भारतीय मल्लांनी १२ पदकं जिंकली. त्यात सर्वाधिक ६ सुवर्ण, १ रौप्य व ५ कांस्यपदकांची कमाई होती. एकाच राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने कुस्तीत प्रथमच ६ सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला. यापूर्वी भारताने २०१८मध्ये ५ सुवर्ण, ३ रौप्य व ४ कांस्यपद जिंकली होती. बजरंग पुनिया (Bajrang Punia) याने भारताला सुवर्णपदक जिंकून दिलं. कुस्तीच्या ६५ किलो वजनी गटात बजरंग पुनियाने कॅनडाच्या लाचलन मॅकनील याचा ९-२ असा अतिशय सहज आणि एकतर्फी पराभव केला.
दीपक पुनियाने अपेक्षेप्रमाणे प्रतिस्पर्ध्याला पाणी पाजले आणि सुवर्णपदाकवर नाव कोरले. दीपक पुनियाने ८६ किलो वजनी गटात पाकिस्तानच्या मुहम्मद इनाम याला ३-० असं पराभूत केले.
भारतीय महिला कुस्तीपटू साक्षी मलिक (Sakshi Malik) हिने ६२ किलो वजनी गटात कॅनडाच्या गोडीनेज गोन्झालेझ हिला पराभूत करत गोल्ड मेडल मिळवलं. साक्षी पहिल्या फेरीत ०-४ अशी पिछाडीवर होती पण दुसऱ्या फेरीत साक्षीने प्रतिस्पर्धी खेळाडूला चांगलाच दम दाखवला. तिने गोडीनेज गोन्झालेझला चितपट करून तिची पाठ टेकवली आणि ४-४ अशा बरोबरीसह सुवर्ण पदकावर नाव कोरलं. साक्षीने प्रतिस्पर्ध्याला चितपट केल्याने (by Fall) तिला विजेती जाहीर करण्यात आलं
७४ किलो वजनी गटात भारताच्या नवीनसमोर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानच्या मुहम्मह ताहीरचे आव्हान होते. दोन्ही खेळाडू टांक पकडून पलटवार करण्यात महारथी होते. पाकिस्तानी कुस्तीपटू फार बचावात्मक खेळ करत असल्याने रेफरीने त्याला ताकिद दिली. नवीनने पाकिस्तानच्या खेळाडूला उचलून फेकले आणि २-० अशी आघाडी घेतली. पहिल्या तीन मिनिटांत नवीनने ही आघाडी कायम राखली होती. पिछाडीवर असूनही पाकिस्तानी मल्ल डिफेन्सीव्ह खेळताना दिसला. नवीनने पुन्हा एक डाव टाकून ५-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर आणखी एक भारंदाज डाव टाकून ९-० अशी आघाडी घेतली आणि बाजी मारली.
५३ किलो वजनी गटातील सुवर्णपदकाच्या लढतीत विनेश फोगाटसमोर श्रीलंकेच्या चमोद्या केशानी मदुरावेलागेचे आव्हान होते. विनेशने पहिल्याच प्रयत्नात प्रतिस्पर्धीला पाठीवर टेकवण्याचा डाव टाकून ४-० अशी आघाडी घेतली. चमोद्याला विनेशची पकड सोडवता आली नाही आणि ती पूर्णपणे हतबल दिसली. विनेशने दीड मिनिटांत पक्के केले सुवर्णपदक. विनेशने २०१९च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचे कांस्यपदक जिंकले आहे. शिवाय २०१४ व २०१८च्या राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्ण, २०१८च्या आशियाई स्पर्धेतील सुवर्ण व २०१४ चे कांस्यपदक तिच्या नावावर आहेत. आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत विनेशने १ सुवर्ण, ३ रौप्य व ४ कांस्यपदकं जिंकली आहेत.
रवी दहियाने ( Ravi Kumar Dahiya ) ५७ किलो वजनी गटाच्या सुवर्णपदकाच्या लढतीत एकहाती बाजी मारली. त्याने नायजेरीयाच्या वेल्सन एबिकेवेनिमोला पराभूत केले. वेल्सननेही राष्ट्रकुल स्पर्धेत दोन रौप्यपदक जिंकले आहेत आणि आजही त्याला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले. रवी दहिया प्रथमच राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी झाला होता आणि त्याने सुवर्णपदकाच्या लढतीत सुरुवातीला सावध खेळ करताना रवीने पकड करण्याचा प्रयत्न केला. रवीने जबरदस्त पकड करून नायजेरियाच्या खेळाडूला चार वेळा गिरकी घेण्यास भाग पाडून ८-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर दोन गुण घेत सुवर्णपदक पक्के केले.
भारताची महिला कुस्तीपटू अंशू मलिक (Anshu Malik) हिने ५७ किलो फ्री स्टाइल प्रकाराच्या अंतिम फेरीत रौप्यपदकाची कमाई केली. नायजेरियाच्या ओडुनायो अडेकुरोये हिच्याकडून अंशूला ७-३ ने पराभूत व्हावे लागले. त्यामुळे अंशूला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
५० किलो वजनी गटाच्या कांस्यपदकाच्या लढतीत पूजा गेहलोत व स्कॉटलंडच्या ख्रिस्टली लेमोफॅक यांच्यात लढत होती. स्कॉटलंडच्या खेळाडूने प्रथम दोन गुण घेतले. पण, पूजाने एक डाव टाकला अन् स्कॉटलंडच्या खेळाडूला चारवेळा गिरकी घेण्यास भाग पाडून ८-२ अशी आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीत पुजाने लेक अटॅक करून आणखी ४ गुण घेत ही लढत १२-२ अशी जिंकली. २०१९च्या २३ वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या पूजाने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतासाठी कुस्तीतीत आजचे दुसरे कांस्यपदक निश्चित केले.
पूजा सिहाग ( ७६ किलो) कांस्यपदकावर समाधान मानावे लागले, तिने ऑस्ट्रेलियाच्या कुस्तीपटूला १०-० असे पराभूत केले.
पुरुषांच्या ९७ किलो वजनी गटाच्या कांस्यपदकाच्या लढतीत दीपक नेहराने पाकिस्तानी मल्लाला १०-२ असा पाणी पाजले.
कांस्यपदका साठी झालेल्या सामन्यांमध्ये १२५ किलो वजनी गटात भारताच्या मोहित ग्रेवालने विजय मिळवला. त्याने आरोन जॉन्सनला पराभवाचं पाणी पाजलं.
भारताची दिव्या काकरन हिनेही कांस्यपदकाची कमाई केली. तिने ६८ किलो वजनी गटात टोंगा देशाच्या टायगर लिली कॉकर लिमाली हिला चितपट करत सामना खिशात घातला.