Commonwealth Games: स्पोर्ट्सवाली लव्हस्टोरी; कॉमनवेल्थ स्पर्धेने बनविलेल्या जोड्या ! By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 01:28 PM 2022-07-28T13:28:53+5:30 2022-07-28T13:32:56+5:30
Commonwealth Games: बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेची चुरस २८ जुलैपासून रंगेल. यंदा भारतीय संघात पी. व्ही. सिंधू, बजरंग पुनिया या स्टार खेळाडूंसह अनेकांच्या कामगिरीवर लक्ष असेल; पण भारतीय संघात असेही काही खेळाडू आहेत, ज्यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत देशासाठी पदक तर जिंकलेच, पण त्याचबरोबर आपला जोडीदारही मिळवला. अशाच सहा भारतीय पदकवीर खेळाडूंचा यानिमित्ताने घेतलेला आढावा. बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेची चुरस २८ जुलैपासून रंगेल. यंदा भारतीय संघात पी. व्ही. सिंधू, बजरंग पुनिया या स्टार खेळाडूंसह अनेकांच्या कामगिरीवर लक्ष असेल; पण भारतीय संघात असेही काही खेळाडू आहेत, ज्यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत देशासाठी पदक तर जिंकलेच, पण त्याचबरोबर आपला जोडीदारही मिळवला. अशाच सहा भारतीय पदकवीर खेळाडूंचा यानिमित्ताने घेतलेला आढावा.
भारतीय क्रीडाविश्वात सायना आणि पारुपल्ली कश्यप यांची जोडी जबरदस्त चर्चेत राहिली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत सायनाने तब्बल सहा पदके कमावली आहेत. कश्यपने २०१४ ला सुवर्ण आणि २०१० मध्ये कांस्य जिंकले होते. या दोघांनी १४ डिसेंबर २०१८ रोजी लग्न केले होते.
हीनाने राष्ट्रकुल स्पर्धेत ४ पदके जिंकली असून, तिचा पती आणि सध्याचा राष्ट्रीय प्रशिक्षक असलेल्या रौनक पंडितने २००६ मध्ये २५ मी. एअर पिस्तूलमध्ये सुवर्ण जिंकले होते. दोघे २०१३ साली विवाहबद्ध झाले होते.
‘दंगल गर्ल’ गीता आणि पवन कुमार यांचे प्रेम कुस्ती आखाड्यातून सुरू झाले. २० नोव्हेंबर २०१६ रोजी दोघांनी सात फेरे घेतले. गीता आणि पवन यांची जोडी राष्ट्रकुल स्पर्धेदरम्यानच बनली होती.
साक्षीने २०१६ मध्ये पैलवान सत्यव्रत कादियानसोबत लग्न केले होते. दोघांनी राष्ट्रकुल स्पर्धेत देशासाठी पदक जिंकले आहे. साक्षीने २०१४ मध्ये रौप्य, तर सत्यव्रतने २०१७ मध्ये रौप्य जिंकले होते.
स्प्रिंट ॲथलिट मनजित कौर २०१५ मध्ये हॉकीपटू गुरविंदर सिंगसोबत विवाहबद्ध झाली. मनजितने राष्ट्रकुल स्पर्धेत दोन पदके जिंकली असून, २०१० आणि २०१४ साली रौप्यपदक जिंकलेल्या भारतीय हॉकी संघात गुरविंदरने आपले मोलाचे योगदान दिले होते
दीपिका-अतानु दास यांची लव्हस्टोरी एखाद्या चित्रपटाप्रमाणेच आहे. जमशेदपूर येथील टाटा अकादमी येथे एकत्र सराव करणाऱ्या या दोघांची भेट २००८ मध्ये झाली. त्यांनी २०२० मध्ये लग्न केले होते. दीपिकाने २०१० मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत दोन सुवर्णपदके जिंकली आहेत.