CWG 2022: पैशांचा हार, टाळ्यांचा कडकडाट! पदक विजेत्या खेळाडूंचे दिल्ली विमानतळावर जोरदार स्वागत By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 05:48 PM 2022-08-09T17:48:33+5:30 2022-08-09T17:53:19+5:30
राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ ची सांगता झाली असून प्रत्येक देशातील खेळाडू आपापल्या मायदेशी परतत आहेत. ११ दिवस चाललेल्या या स्पर्धेचा शेवट सोमवारी झाला. भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेत २२ सुवर्ण, १६ रौप्य आणि २३ कांस्य पदकांसह एकूण ६१ पदकांवर देशाचे नाव कोरले. भारतीय खेळाडू दिल्ली विमानतळावर दाखल होताच त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. राष्ट्रकुल स्पर्धेत उल्लेखणीय कामगिरी केल्यानंतर भारतीय खेळाडू मायदेशी परतले आहेत. भारतीय खेळाडूंनी विक्रमी ६१ पदके जिंकून इंग्लंडच्या धरतीवर तिरंग्याची शान वाढवली असून याचा देशवासियांना अभिमान आहे. भारतीय खेळाडू मंगळवारी दिल्ली विमानतळावर दाखल झाले तेव्हा त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. भारताचे कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि दीपक पुनिया यांनी कुस्तीमध्ये भारताला सुवर्ण जिंकून दिले. तर बजरंग पुनियाने टोकियो ऑलिम्पिकमध्येही पदक पटकावले होते.
इंग्लंडमधील बर्गिंहॅम येथून भारतीय खेळाडू सोमवारी रात्रीच निघाले होते. सर्व खेळाडू एकत्र निघाले नव्हते. सर्व खेळाडूचे वेगवेगळ्या ग्रुपमध्ये विभाजन करण्यात आले होते त्यामुळे काही खेळाडू मंगळवारी भारतात दाखल झाले. काही खेळाडू तर त्यांच्या प्रशिक्षकांसोबत मायदेशी परतले आहेत.
भारताचा तिरंगा इंग्लंडच्या धरतीवर फडकावणाऱ्या भारतीय खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी विमानतळावर मोठी गर्दी जमली होती. विमानतळावर खेळाडूंना फुलांचे हार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी क्रीडा संघटनांचे सदस्यही उपस्थित होते. खेळाडू बाहेर पडताच विमानतळावर टाळ्यांचा कडकडाट झाला.
भारताला बॉक्सिंगमध्ये एकूण ३ सुवर्ण मिळाली आहेत. पुरूष बॉक्सिंगमध्ये केवळ अमित पांघालने सुवर्ण जिंकून पहिल्या क्रमांकावर तिरंगा फडकवला. टोकियो ऑलिम्पिकमध्ये आपल्या पहिल्याच राउंडमध्ये बाहेर गेलेल्या अमितने इंग्लंडच्या भूमीवर प्रतिस्पर्धी खेळाडूला चितपट केले.
भारतीय खेळाडूंनी केलेल्या सुवर्ण कामगिरीमुळे देशातील सर्व नागरिक त्यांचे कौतुक करत आहे. याचाच एक प्रत्यय म्हणजे खेळाडू विमानतळावर दाखल होताच त्यांना पैशांचा हार घालण्यात आला. यावेळी सर्वसामान्य नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारताचे बॉक्सर्स एकत्र मायदेशी परतले आहेत. यामध्ये अमित पांघाल यांच्यासह महिला बॉक्सर नीतू आणि लवलीना यांचाही सहभाग होता. नीतूने सुवर्ण जिंकले तर उपांत्यपूर्व फेरीत लवलीनाचा पराभव झाला. लवलीना ही भारताची एकमेव अशी महिला बॉक्सर आहे, जिला एकही पदक मिळाले नाही. ऑलिम्पिकमध्ये पदक विजेत्या लवलीनाचा क्वार्टर फायनलमध्ये वेल्सच्या बॉक्सरकडून ३-२ अशा फरकाने पराभव झाला. खेळ सुरू होण्यापूर्वी लवलीना वादात सापडली होती.