FIFA World Cup 2018: 10 players who could play magic in tournament
Fifa World Cup 2018 : रोनाल्डो, मेस्सीसोबत 'हे' दहा वीर करू शकतात चमत्कार By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2018 06:23 PM2018-06-06T18:23:48+5:302018-06-06T18:23:48+5:30Join usJoin usNext फुटबॉलचा महाकुंभमेळा, अर्थात फिफा वर्ल्ड कप २०१८ जसजसा जवळ येऊ लागलाय, तसतशी चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचतेय. स्टार फुटबॉलर्ससोबतच, उगवत्या ताऱ्यांचा दर्जेदार खेळ पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये कोणते तारे चमकू शकतात, यावर एक दृष्टिक्षेप.... २०१७-१८च्या प्रीमिअर लीगच्या मोसमात लिव्हरपूलकडून तब्बल ४६ गोल करणारा इजिप्तचा शिलेदार मोहमद सलाह फुटबॉलचा नवा बादशाह ठरला आहे. त्याचा भन्नाट खेळ पाहण्यासाठी फक्त इजिप्तचेच नव्हे, तर जगभरातील फुटबॉलप्रेमी आतुर आहेत. चॅम्पियन्स लीगमध्ये रिअल माद्रिदविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याला दुखापत झाली होती. त्यातून सावरत त्यानं जर दणक्यात कमबॅक केलं तर इजिप्तचा संघ नक्कीच नवा इतिहास रचू शकतो. जर्मनीच्या २०१४च्या विश्वविजयात प्रमुख भूमिका बजावणाऱ्या मेसूट ओझिलवर फुटबॉलप्रेमींच्या नजरा खिळल्यात. चेंडू पास करून गोलपोस्टपर्यंत घेऊन जाण्यात हातखंडा असलेला ओझिल 'असिस्ट किंग' म्हणूनच ओळखला जातो. हा 'किंग' जर्मनीसाठी विजयाचा वजीर ठरू शकतो. फुटबॉल लीगमध्ये चेल्सीकडून खेळणारा एडन हजार्ड बेल्जियमसाठी गेम चेंजर ठरू शकतो. प्रतिस्पर्ध्यांना चकवत गोलपोस्टवर धडक मारण्याची क्षमता त्यानं अनेकदा सिद्ध केली आहे. त्यामुळे, फिफा वर्ल्ड कपमध्ये डार्क हॉर्स म्हणून पाहिल्या जाणाऱ्या बेल्जियमसाठी तो काय किमया करतो, याबद्दल उत्सुकता आहे. रशियातील वर्ल्ड कपसाठी फ्रान्सने आपली यंग ब्रिगेड पाठवली आहे. एक परिपूर्ण संघ म्हणून जाणकार फ्रान्सला झुकतं माप देत आहेत. परंतु, फॉरवर्ड अँटोइन ग्रीझमनशिवाय हा संघ अपूर्णच मानला जातोय. अलीकडच्या काळात त्यानं दर्जा कामगिरी केलीय. तोच फॉर्म कायम राहिला, तर फ्रान्सला 'अच्छे दिन' येऊ शकतात. इंग्लंडचा कर्णधार हॅरी केन काय जादू करणार, याकडे फुटबॉलविश्वाचं लक्ष आहे. आव्हानात्मक परिस्थितीत खेळाचा दर्जा उंचावण्याची हॅरी केनची ताकद विलक्षण आहे. त्याला सूर गवसला तर इंग्लंड संघाच्या आजवरच्या दिग्गजांना जे जमलं नाही, ते तो करून दाखवू शकेल. २०१०च्या वर्ल्ड कप विजेत्या स्पेन संघाचा शिलेदार असलेला आणि २०१२ च्या युरो कप विजयातही प्रमुख भूमिका बजावणारा डेव्हीड सिल्व्हा यंदाच्या वर्ल्ड कपमधील लक्षवेधी खेळाडू आहे. 'स्पॅनिश मेस्सी' म्हणून प्रसिद्ध असलेला सिल्व्हा अनुभवाच्या जोरावर स्पेनसाठी किमयागार ठरू शकतो. रशियामध्ये इतिहास रचण्यासाठी उरुग्वेची मदार आहे, ती लुइस सुआरेझवर आहे. कावानी आणि सुआरेझची जोडी जमली तर ते प्रतिस्पर्ध्यांना भारी पडू शकते. उरुग्वेपेक्षा चाहत्यांना बघायचाय तो सुआरेझचा खेळ. २०१४च्या वर्ल्ड कपमधील सामन्यादरम्यान ब्राझीलचा स्टार नेमारला जबर दुखापत झाली होती. त्याला अर्ध्यावरच स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आणि या धक्क्यातून ब्राझील सावरलाच नाही. स्वाभाविकच, यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये नेमारकडून खूप आशा आहेत. २०१८ मध्ये नेमारची कामगिरी फारशी समाधानकारक झालेली नाही, पण क्रोएशियाविरुद्धच्या सराव सामन्यात त्यानं जबरा गोल करून आपली क्षमता सिद्ध केली आहे. त्याचा हा फॉर्म कायम राहावा, अशीच प्रार्थना ब्राझील करतंय. जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंची यादी ज्याच्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, अशा लिओनल मेस्सीचं जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार होणार का, याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. क्लब फुटबॉलमध्ये अफलातून कामगिरी करणारा मेस्सी अर्जेंटिनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठं यश मिळवून देऊ शकलेला नाही. ही ओळख बदलण्याची नामी आणि शेवटची संधी म्हणून या वर्ल्ड कपकडे पाहिलं जातंय. २०१४ मध्ये अर्जेंटिनाला अंतिम सामन्यात जर्मनीकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर, मेस्सीच्या डोळ्यात तरळलेले अश्रू यावेळी आनंदाश्रूंमध्ये बदलावेत, अशीच त्याच्या चाहत्यांची इच्छा आहे. रिअल माद्रिदला UEFA चॅम्पियन्स लीगचं तिसरं जेतेपद मिळवून देण्यात ख्रिस्तियानो रोनाल्डोची प्रमुख भूमिका होती. २०१६ मध्ये प्रतिकूल परिस्थितीत त्यानं युरो कपवर देशाचं नाव कोरण्याचा पराक्रम केला होता. स्वाभाविकच, रशियामध्ये रोनाल्डो मॅजिक पाहण्यासाठी तमाम फुटबॉलप्रेमी उत्सुक आहेत. रोनाल्डोचं वय पाहता, तो पुढचा वर्ल्ड कप खेळू शकेल का, याबद्दल शंकाच आहे. त्यामुळे तो यावेळी चाहत्यांना काय भेट देतो, हे पाहणं नक्कीच रंजक ठरेल. टॅग्स :फिफा विश्वचषक २०१८ख्रिस्तियानो रोनाल्डोलिओनेल मेस्सीFifa World Cup 2018Cristiano RonaldoLionel Messi