फुटबॉलमधील ‘ऑफसाइड’, काय आहे Offside चा नियम? By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2022 02:21 PM 2022-12-02T14:21:18+5:30 2022-12-02T14:26:57+5:30
फुटबॉलमधील सर्वांत कठीण नियमांपैकी एक म्हणजे ऑफसाइडचा नियम. बुधवारी झालेल्या सौदी अरबविरुद्धच्या सामन्यात मेक्सिकोचे दोन गोल याच नियमामुळे बाद ठरविण्यात आले. फुटबॉलमधील सर्वांत कठीण नियमांपैकी एक म्हणजे ऑफसाइडचा नियम. बुधवारी झालेल्या सौदी अरबविरुद्धच्या सामन्यात मेक्सिकोचे दोन गोल याच नियमामुळे बाद ठरविण्यात आले.
१८८३ साली फुटबॉलमध्ये हा नियम अधिकृतरीत्या वापरला गेला. तेव्हापासून आजतागायत या नियमाने खेळाडूंच्या नाकात दम आणलेला आहे. पण, प्रतिस्पर्ध्यांच्या ‘डी’मध्ये कायमचा तळ ठोकण्यापासून हा नियम खेळाडूंना रोखतो. म्हणून या नियमाचे महत्त्व अधिक. ऑफसाइडच्या नियमावर टाकलेला हा दृष्टिक्षेप...
व्हीएआरचे नवीन तंत्रज्ञान व्हिडीओ असिस्टंट रेफ्री (व्हीएआर) या तंत्रज्ञानाचा यंदाच्या विश्वचषकात पहिल्यांदाच वापर करण्यात आलेला आहे. गोल झाल्यानंतर ऑफसाइडची शंका असल्यास या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो. यामध्ये व्हिडीओ फुटेजच्या साहाय्याने पंच पुन्हा रिप्ले बघतात आणि त्यानुसार निर्णय घेतात.
एक आडवी सरळ रेषा ठरवते ऑफसाइड खेळाडू ऑफसाइड आहे, हे जाणून घेण्यासाठी मुख्य पंचांशिवाय मैदानाच्या बाजूला दोन पंच खेळावर बारीक लक्ष ठेवून असतात. प्रतिस्पर्धी संघाच्या हाफमध्ये आल्यावर खेळाडूला एखाद्या संघ सहकाऱ्याने पास दिला तर तो इतर प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंसोबत एका आडव्या रेषेत आहे की थोडा पुढे, यावर पंचांची बारीक नजर असते. आता तंत्रज्ञानाच्या वापरातसुद्धा हीच आडवी सरळ रेषा महत्त्वाची ठरते.
दोन प्रतिस्पर्धी खेळाडू असणे गरजेचे कुठलाही स्ट्रायकर जेव्हा गोल करण्यासाठी प्रतिस्पर्धी संघाच्या हाफमध्ये जातो, तेव्हा संघ सहकाऱ्याने पास दिल्यानंतर त्याच्या आजूबाजूला प्रतिस्पर्धी संघाचे किमान दोन खेळाडू असणे गरजेचे असते. पास दिल्यानंतर तो प्रतिस्पर्धी संघातील अखेरच्या खेळाडूच्या पुढे आणि गोलरक्षकाच्या पुढ्यात असेल तर त्यावेळी तो ऑफसाइड ठरवला जातो. मात्र कुठल्याही पासविना चेंडू जर तो स्वत:च ड्रीबल करत गोलजाळ्याच्या दिशेने नेत असेल तर अशावेळी तो ऑफसाइड ठरत नाही. तसेच एखाद्या खेळाडूने त्याच्याच गोलरक्षकाकडे पास दिला आणि चेंडू त्याच्याकडे पोहोचण्यापूर्वीच प्रतिस्पर्धी खेळाडूने चेंडूचा ताबा घेतला तरीसुद्धा ऑफसाइड ठरत नाही.
अशा नियमाची गरज का? ऑफसाइडचा नियम नसल्यास, फुटबॉल थोडा विचित्र खेळ बनेल. कारण, आक्रमण करणारा संघ अनेक खेळाडूंना प्रतिस्पर्ध्याच्या हाफमध्ये कायमचा मुक्कामी ठेवेल आणि त्यांच्याकडे सातत्याने चेंडू पास करत राहील. यामुळे खेळात रटाळपणा येईल आणि खेळाडूंच्या कौशल्यपूर्ण खेळास चाहते मुकतील.
ऑफसाइड ठरवल्यानंतर काय? ऑफसाइड ठरवले गेल्यानंतर आक्रमण करणारा संघ चेंडू गमावतो. त्यानंतर ज्या ठिकाणी ऑफसाइडचा भंग झाला तेथून प्रतिस्पर्धी संघाला फ्री किक मिळते. ऑफसाइड पोझिशनवरून केलेले गोलही बाद ठरविले जातात.