पीआर श्रीजेश... भारतीय हॉकी संघाची ही भिंत आठ प्रयत्नानंतरही ओलांडू शकले नाही ब्रिटीश खेळाडू By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2024 05:23 PM 2024-08-04T17:23:23+5:30 2024-08-04T17:45:16+5:30
Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाची सेमीफायनलमध्ये प्रवेश झाला आहे. शुटआऊटमध्ये ४-२ ने सामना जिंकल्यानंतर देशभरातून भारतीय हॉकी संघाचे कौतुक होत आहे. भारतीय हॉकी संघाने पेनल्टी शूटआऊटमध्ये ब्रिटनचा पराभव करून इतिहास रचला आणि सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकची उपांत्य फेरी गाठली. चार क्वार्टर संपल्यानंतर दोन्ही संघांचा स्कोअर १-१ असा बरोबरीत होता. त्यानंतर शूटआऊटमध्ये भारताने ब्रिटनचा ४-२ असा पराभव केला.
मात्र त्याआधी अमित रोहिदासला रेड कार्ड मिळाल्यावर कदाचित अवघड जाईल असं वाटत होतं. पण पीआर श्रीजेशवर सगळ्यांना विश्वास होता. सर्वजण प्रार्थना करत होते की जर सामना शूटऑफपर्यंत पोहोचला तर तो श्रीजेश आपल्याला विजयापर्यंत नेईल… आणि तेच घडले…
अमित रोहिदासला रेड कार्ड मिळाल्यामुळे भारताला ४३ मिनिटे फक्त १० खेळाडूंसह खेळावे लागले. असे असतानाही हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील संघाने आश्चर्यकारक कामगिरी केली.
भारतीय संघाकडे श्रीजेशसारखा गोलरक्षक होता म्हणून आपला विजय निश्चित झाला. शूटआऊटमध्ये पीआर श्रीजेशने दोन उत्कृष्ट सेव्ह करत भारताला विजय मिळवून दिला आणि ब्रिटनच्या सर्व आशा धुळीस मिळवल्या.
संपूर्ण सामन्यादरम्यान ब्रिटनच्या संघाने भारतीय गोलच्या जवळ आठवेळा पोहोचण्याचा प्रयत्न केला. पण श्रीजेशच्या खेळामुळे त्यांना पराभूत होऊन परतावे लागले.
ब्रिटनचे डावीकडे, उजवीकडे, वर आणि खाली सर्व प्रयत्न अयशस्वी झाले. ब्रिटीश खेळाडू भारतीय गोलपोस्टजवळ पोहोचले पण त्यांना श्रीजेशमुळे गोल करता आला नाही.
विजयानंतर पीआर श्रीजेश म्हणाला की, "मी स्वतःला म्हणालो होतो की, हा माझा शेवटचा सामना असू शकतो किंवा जर मी तो वाचवला तर मी येथे आणखी दोन सामने खेळू शकेन. विजयासाठी आनंद आहे".
दरम्यान, विजयानंतर श्रीजेशने ऑलिम्पिकनंतर निवृत्ती जाहीर केली आहे. या सामन्यानंतर तो आता आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये दिसणार नाही.