Padma Shri Faisal Ali Dar: पद्म पुरस्कार जाहीर झालेला फैजल अली दार नक्की कोण? काश्मीरमध्ये दहशतीच्या सावटाखालीही ट्रेनिंग देणं सोडलं नाही... By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 11:21 AM 2022-01-26T11:21:37+5:30 2022-01-26T11:41:08+5:30
क्रीडा जगतातून फैजल अली दारची पद्मश्री पुरस्कारासाठी निवड झाली. पुरस्काराची घोषणा झाल्यावर जम्मू-काश्मीरच्या नायब राज्यपालांनीही ट्विट करून त्याचे अभिनंदन केले. Padma Shri Faisal Ali Dar: भारत सरकारने मंगळवारी (२५ जानेवारी) १२८ पद्म पुरस्कारांची घोषणा केली. टोकयो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचणाऱ्या नीरज चोप्रासह क्रीडा क्षेत्रातील ९ दिग्गजांचा या यादीत समावेश आहे. त्यापैकीच एक म्हणजे कुंग-फू मास्टर फैजल अली दार.
क्रीडा जगतातून फैजल अली दारची पद्मश्री पुरस्कारासाठी निवड झाली. पुरस्काराची घोषणा झाल्यावर जम्मू-काश्मीरच्या नायब राज्यपालांनीही ट्विट करून त्याचे अभिनंदन केले.
फैजल अली दार लहानपणापासूनच हिरो ब्रूस लीचे चित्रपट पाहत असे. ब्रुस ली हा अमेरिकन मार्शल आर्टिस्ट होता. ब्रुस ली याच्या चित्रपटांतून प्रेरणा घेऊन फैजलमध्ये कुंग-फू बद्दल आवड निर्माण झाली आणि त्याने त्यातच आपले करिअर घडवले.
२००३ साली फैजलने कुंग-फू शिकण्यास सुरुवात केली. फैजलने प्रशिक्षक कुलदीप हांडू यांच्याकडून कुंग फू चे ज्ञान मिळवले. तो कुलदीप सरांना आपला आदर्श मानतो.
माजी मार्शल आर्ट चॅम्पियन फैजल अली दार जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात राहतो. तेथे त्याने एक अकादमीदेखील सुरू केली आहे. त्या अकादमीत जागतिक किक-बॉक्सिंग चॅम्पियन तजामुल इस्लाम आणि कराटे चॅम्पियन हसिम मन्सूर या तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले. फैजल अली दार महिला सशक्तीकरण व सबलीकरण याबाबतही कार्यरत आहे.
बांदीपोरा हा दहशतवादग्रस्त भाग मानला जातो. फैझलला त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या खूप संघर्ष करावा लागला. एका मुलाखतीत त्यांनी हे सांगितले. फैजल अली दार हा जम्मू-काश्मीरचा आहे. दहशतीच्या सावटाखाली तो आपली मार्शल आर्ट अकादमी चालवत आहे.
या भागात अशांतता असतानाही त्याने प्रशिक्षण घेणं आणि इतरांना शिकवणं सोडलं नाही. खडतर परिस्थितीतही अकादमी चालवल्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यामुळेच फैजलला 'खेळ व शांतता'मध्ये डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कारही देण्यात आला.