Paris Olympic 2024 : अभिमानास्पद! रेल्वेतील टीसी ते ऑलिम्पिकवीर; मराठमोळ्या खेळाडूने जिंकले कांस्य

By ओमकार संकपाळ | Published: July 31, 2024 05:11 PM2024-07-31T17:11:51+5:302024-07-31T17:23:01+5:30

Paris Olympic 2024 Updates In Marathi : कोल्हापुरच्या स्वप्नील कुसाळेने ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकले.

मराठी पाऊल पडते पुढे... कोल्हापुरच्या स्वप्नील कुसाळेने बुधवारी पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत प्रवेश करून सर्वांचे लक्ष वेधले. तो ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात अंतिम फेरीसाठी पात्र ठरला अन् कांस्य पदकही जिंकले.

कोल्हापुरचा सुपुत्र असलेल्या स्वप्नीलने ५९० गुणांसह सातवे स्थान मिळवून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता. भारताचा आणखी एक शिलेदार ऐश्वर्य प्रताप सिंग ११व्या क्रमांकावर राहिला अन् तो अंतिम फेरीला मुकला.

खरे तर अव्वल आठ खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरत असतात. ऐश्वर्य प्रतापला पहिल्या आठमध्ये स्थान मिळवता न आल्याने त्याचे आव्हान संपुष्टात आले.

नेमबाज स्वप्निल कुसाळे कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यातील आहे. ६ ऑगस्ट १९९५ मध्ये जन्मलेल्या स्वप्निलने पॅरिसच्या धरतीवर चमक दाखवली. स्वप्निलचा ऑलिम्पिकपर्यंतचा प्रवास खूपच भारी आहे.

अभिनव बिंद्राला २००८ च्या ऑलिम्पिकमध्ये खेळताना पाहण्यासाठी स्वप्नीलने १२वीच्या परिक्षेकडे कानाडोळा केला. २००९ मध्ये वयाच्या १४व्या वर्षी त्याच्या वडिलांनी स्वप्नीलला महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा प्रबोधिनी योजनेत दाखल केले. तिथूनच त्याचा क्रीडा क्षेत्रातील प्रवास सुरू झाला.

सुरुवातीच्या काळात स्वप्नीलने नेमबाजीतील आपले कौशल्य विकसित करण्यासाठी पुण्याला जाण्यापूर्वी नाशिकमध्ये प्रशिक्षण घेतले. तिथे त्याने या खेळात प्रगती करण्यास सुरुवात केली.

कौतुकास्पद कामगिरी करताना स्वप्नीलने पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन्स स्पर्धेत सातवे स्थान पटकावले. अंतिम फेरी गाठली आणि पदकही मिळवले.

स्वप्नील सुरेश कुसाळे या ग्रामीण भागातील खेळाडूने आपल्या मेहनतीच्या जोरावर ऑलिम्पिकपर्यंत मजल मारली. महाराष्ट्रातून पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंना महाराष्ट्र सरकारने पन्नास लाखांची मदत केली आहे. सध्या रेल्वेमध्ये टीसी म्हणून कार्यरत असणारा स्वप्नील पुण्यातील बालेवाडी येथील क्रीडा संकुलात सराव करत होता.

ऑलिम्पिक स्पर्धेत पात्र ठरल्यानंतर तो दिल्ली येथील रेंजवर सरावासाठी गेला होता. स्वप्नील आपल्या सर्वोत्तम खेळांचे चांगले प्रदर्शन करून देशासाठी सुवर्ण पदक मिळवून देईल याची आम्हाला खात्री आहे असे उद्गार वडिल सुरेश कुसाळे (सर) व आई सरपंच अनिता सुरेश कुसाळे यांनी दैनिक 'लोकमत'शी बोलताना काढले होते. स्वप्नीलच्या या यशाने कांबळवाडीचे गाव सर्वदूर पसरले.