मराठी पाऊल पढते पुढे! धोनीचा जबरा फॅन, स्वप्नील १२ वर्षे ऑलिम्पिक एन्ट्रीसाठी वाट पाहत होता... By ओमकार संकपाळ | Published: August 1, 2024 03:43 PM 2024-08-01T15:43:15+5:30 2024-08-01T15:48:45+5:30
swapnil kusale kolhapur : स्वप्नील कुसाळेने ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकले. भारताला शूटींमधून आणखी एक पदक मिळाले असून, एकूण तीन पदकांची नोंद झाली आहे. कोल्हापूरच्या पठ्ठ्याने ऐतिहासिक कामगिरी करताना कांस्य पदक जिंकले. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या लेकाने अंतिम फेरीत धडक मारली अन् मोठे यश मिळवले.
मूळचा कोल्हापूर येथील असलेल्या स्वप्नील कुसाळेने बुधवारी ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात अंतिम फेरीचे तिकीट मिळवले. (swapnil kusale in final) अंतिम फेरीत मातब्बर खेळाडू मैदानात होते. पण, अखेरच्या काही क्षणांमध्ये स्वप्नील इतर पाच खेळाडूंना वरचढ ठरला आणि त्याने तिसऱ्या क्रमांकावर मजल मारली.
ऑलिम्पिकच्या आतापर्यंतच्या इतिहासात वैयक्तिक पदक मिळवणारे मराठमोळे खेळाडू म्हणून फक्त खाशाबा जाधव यांच्या नावाची नोंद होती. यात आता भर पडली असून तब्बल ७२ वर्षांनंतर स्वप्नीलच्या रूपात मराठमोळ्या खेळाडूला पदक जिंकण्यात यश आले.
स्वप्नील हा कोल्हापूर येथील राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी गावातील रहिवासी आहे. २९ वर्षीय स्वप्नीलने २०१२ पासून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.
मात्र, ऑलिम्पिकमध्ये पदार्पण करण्यासाठी त्याला १२ वर्षे वाट पाहावी लागली. धोनीला आदर्श मानणाऱ्या स्वप्नीलने कॅप्टन कूलच्या आयुष्यावर बनलेला चित्रपट अनेकदा पाहिला.
दरम्यान, १९५२ मध्ये ऑलिम्पिकमध्ये खाशाबा जाधव यांनी कुस्तीत ऐतिहासिक कांस्य पदक जिंकले होते. आता असाच पराक्रम करून दुसरा मराठमोळा खेळाडू बनण्याची संधी स्वप्नीलने मिळवली आहे.
कोल्हापूरचा पठ्ठ्या... स्वप्नील कुसाळे हा महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील आहे. नेमबाज स्वप्निल कुसाळे कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यातील आहे. ६ ऑगस्ट १९९५ मध्ये जन्मलेल्या स्वप्निलने पॅरिसच्या धरतीवर चमक दाखवली. स्वप्नीलचा ऑलिम्पिकपर्यंतचा प्रवास खूपच भारी आहे.
अभिनव बिंद्राला २००८ च्या ऑलिम्पिकमध्ये खेळताना पाहण्यासाठी स्वप्निलने १२वीच्या परिक्षेकडे कानाडोळा केला. २००९ मध्ये वयाच्या १४व्या वर्षी त्याच्या वडिलांनी स्वप्निलला महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा प्रबोधिनी योजनेत दाखल केले. तिथूनच त्याचा क्रीडा क्षेत्रातील प्रवास सुरू झाला.
सुरुवातीच्या काळात त्याने नेमबाजीतील आपले कौशल्य विकसित करण्यासाठी पुण्याला जाण्यापूर्वी नाशिकमध्ये प्रशिक्षण घेतले. स्वप्नील सुरेश कुसाळे या ग्रामीण भागातील खेळाडूने आपल्या मेहनतीच्या जोरावर ऑलिम्पिकपर्यंत मजल मारली.
महाराष्ट्रातून पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंना महाराष्ट्र सरकारने पन्नास लाखांची मदत केली. सध्या रेल्वेमध्ये टि.सी असणारा स्वप्नील पुण्यातील बालेवाडी येथील क्रीडा संकुलात सराव करत होता. ऑलिम्पिक स्पर्धेत पात्र ठरल्यानंतर तो दिल्ली येथील रेंजवर सरावासाठी गेला होता.