विनेशच नाही याआधी हे पाच खेळाडूसुद्धा ऑलिम्पिकमधून झाले होते बाद, अशी होती कारणं By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 04:53 PM 2024-08-07T16:53:12+5:30 2024-08-07T16:56:56+5:30
Vinesh Phogat Disqualified From Olympics: ऑलिम्पिकमधील महिलांच्या कुस्तीमध्ये अंतिम फेरी गाठणारी विनेश फोगाट ही भारताची पहिला महिला कुस्तीपटू ठरली होती. मात्र तिचं वजन ती खेळत असलेल्या वजनी गटापेक्षा अधिक भरल्याने तिला स्पर्धेतून बाद करण्यात आलं. दरम्यान, (Paris Olympics 2024) ऑलिम्पिकमध्ये निर्णायक क्षणी बाद ठरवण्यात आलेली विनेश ही काही पहिली खेळाडू नाही. याआधीही काही खेळाडूंना ऐनवेळी बाद ठरवून त्यांचं पदक रद्द करण्यात आलेलं आहे, अशा खेळाडूंची यादी पुढील प्रमाणे आहे. ऑलिम्पिकमधील महिलांच्या कुस्तीमध्ये अंतिम फेरी गाठणारी विनेश फोगाट ही भारताची पहिला महिला कुस्तीपटू ठरली होती. मात्र विनेशचा हा आनंद अल्पकालीन ठरला आज विनेशचं वजन ती खेळत असलेल्या वजनी गटापेक्षा अधिक भरल्याने तिला स्पर्धेतून बाद करण्यात आलं. या निर्णयामुळे विनेशच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा करत असलेल्या कोट्यवधी भारतीयांची निराशा झाली आहे. दरम्यान, ऑलिम्पिकमध्ये निर्णायक क्षणी बाद ठरवण्यात आलेली विनेश ही काही पहिली खेळाडू नाही. याआधीही काही खेळाडूंना ऐनवेळी बाद ठरवून त्यांचं पदक रद्द करण्यात आलेलं आहे, अशा खेळाडूंची यादी पुढील प्रमाणे आहे.
२००८ साली झालेल्या बीजिंग ऑलिम्पिकनंतर क्युबाचा तायक्वांडोपटू एंजेल माटोस याच्यावर आजीवन बंदी घालण्यात आली होती. माटोस यांने एका सामन्यादरम्यान, पंचाच्या चेहऱ्यावर लाथ मारली होती. माटोस पंचांच्या एका निर्णयावर नाराज होता.
२००४ च्या अथेन्स ऑलिम्पिकमध्ये ज्युडो फायटर अरश मिरेस्माली याला इस्राइलच्या खेळाडूविरुद्ध होणाऱ्या सामन्यापूर्वी आपल्या निश्चित वजन मर्यादेपेक्षा दोन किलो वजन अधिक आढळल्याने अपात्र ठरवण्यात आलं होतं.
१९८४ साली झालेल्या लॉस एंजिल्स येथील ऑलिम्पिक स्पर्धेवेळी अमेरिकेचा बॉक्सर इव्हेंडर होलिफिल्ड याला ब्रेकनंतर न्यूझीलंडच्या प्रसिस्पर्ध्यावर मुष्टीचा प्रहार केल्याने सुवर्ण पदकासाठी होणाऱ्या सामन्यापूर्वी बाद ठरवण्यात आलं होतं. होलिफिल्ड एक प्रमुख खेळाडू होते. पुढे त्यांना कांस्यपदकाने सन्मानित करण्यात आले.
जपानमधील नागानो येथे १९९८ मध्ये झालेल्या हिवाळी ऑलिम्पिकमध्ये बीसी स्नोबोर्डर रॉस रेबाग्लियाती याला उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यानंतर सुवर्णपदकापासून वंचित ठेवण्यात आलं होतं. मात्र या निर्णयाविरोधात त्यानं अपील केलं होतं. त्यानंतर काही दिवसांनी त्याला त्याचं सुवर्णपदक पुन्हा बहाल करण्यात आलं.
१९८८ च्या ऑलिम्पिकमध्ये कॅनडाच्या बेन जॉन्सन याचंही सुवर्णपदक उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळल्यानंतर काढून घेण्यात आलं होतं.