नीता अंबानींकडून भारतीय खेळाडूंचे स्वागत; कौतुकाचा वर्षाव, मराठमोळ्या स्वप्नीलचा वाढदिवसही साजरा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 12:59 PM2024-08-07T12:59:55+5:302024-08-07T13:18:30+5:30

paris Olympics 2024 updates in marathi : नीता अंबानी यांनी भारतीय खेळाडूंचे स्वागत केले.

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये आतापर्यंत भारताला तीन पदके जिंकता आली आहेत. मनू भाकरने पदकाचे खाते उघडले. त्यानंतर तिने सरबजोत सिंगच्या साथीने आणखी एका पदकाला गवसणी घातली.

याशिवाय मराठमोळ्या स्वप्नील कुसाळेनेही भारताला एक कांस्य पदक जिंकवून दिले. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नानंतर आता संपूर्ण अंबानी कुटुंब पॅरिसमध्ये आहे. जिथे ते ऑलिम्पिक स्पर्धेचा आनंद घेत आहेत.

नुकतेच पॅरिस ऑलिम्पिकमधील अंबानी कुटुंबीयांचे काही फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये प्रत्येकजण भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन देताना दिसत आहे.

पॅरिसमधून अनंत-राधिकासह संपूर्ण अंबानी कुटुंबाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर सातत्याने येत आहेत. नीता अंबानी यांनी भारतीय शिलेदारांचे स्वागत करून त्यांचे अभिनंदन केले.

यावेळी नीता अंबानी यांनी पदकविजेत्या खेळाडूंचे खास कौतुक केले. त्यांनी मनू भाकर आणि स्वप्नील कुसाळेच्या खेळीला दाद दिली.

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने आतापर्यंत एकूण तीन पदके जिंकली आहेत. भारतासाठी पदक जिंकणारी स्टार महिला नेमबाज मनू भाकर, स्वप्नील कुसाळे यांच्यासह अनेक भारतीय खेळाडू इंडिया हाऊसमध्ये पोहोचले.

IOC सदस्य असलेल्या नीता अंबानी यांनी या सर्व खेळाडूंचे स्वागत केले. नीता अंबानी यांनी सर्व खेळाडूंना कपाळावर टिळा लावून त्यांचा गौरव केला आणि त्यांच्या प्रयत्नांची प्रशंसाही केली.

खेळाडूंचे कौतुक करताना नीता अंबानी म्हणाल्या की, टोकियो ऑलिम्पिकनंतर मनू आपला प्राचीन धर्मग्रंथ भगवद्गीता वाचू लागली. त्यामुळे तिला सर्वोत्तम कामगिरी करण्यास मदत झाली. या ग्रंथातून आपले सर्वोत्तम कार्य करा आणि बाकीचे देवावर सोडा हे शिकायला मिळते.

मनू भाकरने मेहनतीच्या जोरावर यश संपादन केले. २२ वर्षीय मनू भाकरने मागील आठवड्यात इतिहास रचला. तिने केवळ तिचे नशीबच नाही तर आपल्या देशाचेही नशीब बदलले, असेही नीता अंबानी यांनी सांगितले.

तसेच ५० मीटर रायफल शूटिंग इव्हेंटमध्ये पदक जिंकणारा स्वप्नील कुसाळे हा पहिला भारतीय खेळाडू ठरला. त्याने त्याच्या मेहनतीच्या जोरावर यशाला गवसणी घातली. त्याचा संपूर्ण देशाला अभिमान आहे, असेही नीता अंबानी यांनी नमूद केले. यावेळी पदविजेत्या स्वप्नीलचा वाढदिवस साजरा करण्यात आला.