"सरकार इतके उदासीन आहे माहिती असतं तर त्याला..."; स्वप्नील कुसाळेच्या वडिलांची बक्षिसावरुन नाराजी By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 03:40 PM 2024-10-07T15:40:47+5:30 2024-10-07T15:49:05+5:30
Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात कोल्हापुरच्या स्वप्नील कुसाळे याने कांस्य पदक मिळवत इतिहास रचला होता. मात्र आता स्वप्नीलच्या वडिलांनी राज्य सरकारच्या बक्षिसावरुन खंत व्यक्त केली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात स्वप्नील कुसाळे याने कांस्य पदक जिंकले. स्वप्नीलच्या पदकामुळे ७२ वर्षांनी पुन्हा एका देशासह कोल्हापूरचे नाव झळकावले. स्वप्नीलच्या यशानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याचे वडील सुरेश कुसाळे यांचे फोनवरुन अभिनंदन करत मोठं आश्वासन दिलं होतं.
स्वप्नीलने मिळवलेले यश हे आपल्या राज्यासाठी अभिमानास्पद आहे. सरकार तुमच्या सोबत असल्याचे सांगत शासन स्वप्निलसाठी जे काही करायचे आहे ते करेल असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते.
मात्र आता पॅरिस ऑलिम्पिक विजेता स्वप्निल कुसाळे याची राज्य सरकारने चेष्टा केल्याची खंत स्वप्निलच्या वडिलांनी केली आहे. स्वप्निलला ऑलिम्पिक पदक पटकावल्यानंतर दोन महिन्यांनी बक्षीस जाहीर करण्यात आलं. मात्र जाहीर केलेलं बक्षीस अतिशय तोकडं असल्याची खंत स्वप्निलच्या वडिलांनी व्यक्त केली आहे.
नेमबाजांसाठी हे सरकार इतकं उदासीन आहे याची आधी कल्पना असती तर स्वप्नीलला या खेळाकडे पाठवलंच नसतं अशा शब्दात सुरेश कुसाळे यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
स्वप्नील कुसाळे सामान्य कुटुंबातील आहे म्हणून त्याला एवढे तोकडे बक्षीस दिले का? जर हाच मुलगा एखाद्या मंत्र्याचा,आमदाराचा असता तर तु्म्ही काय केलं असतं? असा सवाल सुरेश कुसाळे यांनी केला.
महाराष्ट्र शासनाने स्वप्नीलला किमान पाच कोटी रुपयांचे बक्षीस द्यावे, बालेवाडीपासून जवळ त्याला फ्लॅट मिळायला हवा आणि तिथल्या शूटिंग रेंजला स्वप्नीलनचे नाव द्यावे अशी मागणी सुरेश कुसाळे यांनी केली आहे.
त्यामुळे आता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचणाऱ्या स्वप्नील कुसाळेच्या वडिलांनी केलेल्या मागण्या सरकार मान्य करणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.