शुभमंगल सावधान! पीव्ही सिंधूचं आता आयुष्याच्या बॅडमिंटन कोर्टवर कायमस्वरूपी 'मिक्स डबल्स'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 20:17 IST2024-12-24T19:48:11+5:302024-12-24T20:17:16+5:30

PV Sindhu Wedding Photo Album: भारताची 'फुलराणी' पीव्ही सिंधूचा शुभविवाह २२ डिसेंबरला व्यंकट दत्ता साई याच्याशी झाला.

भारताची 'फुलराणी' ऑलिम्पिक पदकविजेती बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिचा शुभविवाह २२ डिसेंबरला उदयपूरच्या सागर तलावावरील राफेल हॉटेलमध्ये पार पडला.

या ग्रँड लग्नसोहळ्यासाठी अनेक दिग्गजांची उपस्थिती होती. २० तारखेपासून उदयपूर येथे सिंधू आणि व्यंकट यांच्या लग्नाचे विविध कार्यक्रम व विधी सुरु होते.

पीव्ही सिंधूचा पती व्यंकट दत्ता साई हा साई पोसाइडेक्स टेक्नॉलॉजीजचे कार्यकारी संचालक आहे. दोन्ही कुटुंबे आधीपासूनच एकमेकांना ओळखत होती.

शनिवारी (१४ डिसेंबर) तिचा साखरपुडा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला होता. सिंधूने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना या संदर्भातील खुशखबर दिली होती. त्यानंतर आता ती 'मिसेस' झाली.

सिंधूने लग्नाची घोषणा लखनौमधील सय्यद मोदी इंटरनॅशनलमध्ये विजेतेपद पटकावल्यानंतर केली होती. त्यानुसार २२ डिसेंबरला ती व्यंकट दत्ता साई याच्याशी विवाहबद्ध झाली. कारण जानेवारीपासून सिंधूचे वेळापत्रक खूप व्यस्त असणार आहे.

बॅडमिंटन कोर्टवर दुहेरी सामन्यात एक महिला आणि एक पुरूष अशी टीम असेल तर त्याला मिक्स डबल्स (मिश्र दुहेरी) म्हणतात. तशीच सिंधू आयुष्याच्या बॅडमिंटन कोर्टवर आता कायमची 'मिक्स डबल्स' टीममध्ये दिसणार आहे.

सिंधू आणि व्यंकट यांच्या विवाहानंतर या नवदाम्पत्यावर शुभेच्छांचा अक्षरश: वर्षाव केला जात आहे. सर्व स्तरातून या नव्या जोडप्याला भरभरून आशीर्वाद दिले जात आहेत. (सर्व फोटो- पीव्ही सिंधू ट्विटर)