ऑनलाइन लोकमत मुंबईने ठेवलेलं 312 धावाचं लक्ष्य पूर्ण करत गुजरातने एक नवा रेकॉर्ड केला आहे. इतकी मोठी धावसंख्या आतापर्यत तीन वेळाच पार करण्यात प्रतिस्पर्धी संघ यशस्वी ठरला होता. मुंबईने आतापर्यंत 40 वेळा रणजी जिंकला असून शिरपेचात अजून एक तुरा रोवण्याची संधी त्यांच्याकडे होती. मात्र पार्थिव पटेलच्या खेळीपुढे मुंबईचे गोलंदाज निष्प्रभ ठरले. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या मुंबई विरुद्धच्या अंतिम सामन्यात पार्थिव पटेलने दोन्ही डावात कर्णधारपदाला साजेसा खेळ केला. पहिल्या डावात त्याने 90 तर दुस-या डावात 143 धावांची खेळी केली. त्यामुळे 83 वर्षात प्रथमच गुजरातला रणजी करंडक जिंकता आला. दुस-या डावात गुजरातच्या चिंतन गाजाने प्रभावी मारा करुन मुंबईला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. दुस-या डावात हेरवाडकर, पृथ्वी शॉसह श्रेयस अय्यर या आघाडीच्या तीन फलंदाजांसह अन्य तीन फलंदाज असे मिळून त्याने एकूण सहा गडी बाद केले. अंतिम सामन्यात त्याने एकूण आठ विकेट मिळवल्या. पहिल्या डावात गुजरातने 100 धावांची आघाडी घेतल्यानंतर दुस-या डावात गुजरातसमोर विजयासाठी मोठे लक्ष्य ठेवणे आवश्यक होते. त्यावेळी मुंबईचा अष्टपैलू खेळाडू अभिषेक नायरने 91 धावांची शानदार खेळी केली. दोन्ही डावात मिळून त्याने 126 धावा केल्या आणि 4 विकेट घेतल्या. मुंबईच्या शादुर्ल ठाकूरने दोन्ही डावात मिळून भेदक मारा केला. पहिल्या डावात त्याने गुजरातच्या 4 फलंदाजांना तंबुची वाट दाखवली. दुस-या डावात मुंबईच्या क्षेत्ररक्षकांनी केलेल्या चुका महाग पडल्या. अन्यथा त्याच्या खात्यात जास्त विकेट जमा झाल्या असत्या. त्याने दोन्ही डावात मिळून पाच गडी बाद केले. रणजी करंडक स्पर्धेत पदार्पण केल्यापासून दमदार फलंदाजी करणा-या पृथ्वी शॉ ने अंतिम सामन्यातही चांगली कामगिरी केली. सलामीला येऊन शॉ ने पहिल्या डावात अर्धशतकी खेळी करताना 71 धावा केल्या. दुस-या डावात त्याने 44 धावा केल्या.