जपानी 'गुडीया'ची सेरेना विल्यम्सला टक्कर; पाहा सिंधू कितव्या स्थानी! By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2019 03:18 PM 2019-08-07T15:18:25+5:30 2019-08-07T15:21:00+5:30
अमेरिकन आणि ऑस्ट्रेलियान ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणाऱ्या जपानच्या नाओमी ओसाकाने सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंमध्ये दिग्गज टेनिसपटू सेरेना विल्यम्सला टक्कर दिली आहे. मागील वर्षभरात सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंत ओसाकानं फोर्ब्सच्या यादित सेरेनापाठोपाठ दुसरे स्थान पटकावले आहे.
ग्रँड स्लॅम स्पर्धेची 23 जेतेपदं नावावर असलेली सेरेना विल्यम्सने सलग चौथ्या वर्षी फोर्ब्सच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. तिची वर्षाची कमाई ही 29.2 मिलियन अमेरिकन डॉलर ( भारतीय रुपयांत 2,07,02,50,800) इतकी आहे.
सर्वाधिक कमाईच्या बाबतीत ओसाका फार दूर नाही. वर्षभरापूर्वी 1.5 अमेरिकन डॉलर मिळकत असलेल्या ओसाकाची आताची कमाई ही 24.3 मिलियन अमेरिकन डॉलर ( 1,72,23,71,850 ) इतकी आहे. पण, सर्वाधिक कमाई करणाऱ्या अव्वल शंभर खेळाडूंमध्ये तिला स्थान पटकावता आलेले नाही. टॉप 100मध्ये सेरेना ( 63) ही एकमेव महिला खेळाडू आहे.
या क्रमवारीत अव्वल 15 खेळाडूंमध्ये 12 टेनिसपटू आहेत. अमेरिकन महिला फुटबॉलपटू अॅलेक्स मॉर्गन ही 12 व्या स्थानावर आहे. तिची कमाई 5.8 मिलियन आहे.
भारताची बॅडमिंटन स्टार पी. व्ही. सिंघू या क्रमवारीत 5.5 मिलियन अमेरिकन डॉलरच्या कमाईसह 13व्या स्थानावर आहे.
15व्या स्थानी थायलंडची गोल्फपटू अरिया जुतानुगर्न ( 5.3 मिलियन अमेरिकन डॉलर) आहे.