Roger Federer Retiremet: १६ व्या वर्षी सोडली शाळा, गायी पाळण्याची आवड; जाणून घ्या 'टेनिसच्या राजा'ची जीवनकथा By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 12:43 PM 2022-09-16T12:43:58+5:30 2022-09-16T12:52:41+5:30
महान टेनिसपटू रॉजर फेडरर याने निवृत्तीची घोषणा केली आहे. तब्बल २० ग्रँडस्लॅम विजेतेपदे जिंकणारा दिग्गज खेळाडू रॉजर फेडरर याने अचानक निवृत्तीची घोषणा करून आपल्या चाहत्यांना धक्का दिला. रॉजर फेडरर या नावाशिवाय टेनिसचा खेळ पूर्ण होऊ शकत नाही. टेनिसच्या या विश्वावर २४ वर्षे अधिराज्य गाजवणाऱ्या रॉजर फेडररने गुरूवारी अचानक निवृत्तीची घोषणा केली. एक महान खेळाडू म्हणून रॉजर फेडरर आज जगभर प्रसिद्ध आहे, मात्र या यशामागे त्याच्या संघर्षाचा मोठा वाटा आहे. इथपर्यंत पोहचण्यासाठी त्याने अथक परिश्रम आणि मोठा त्याग केला आहे. फेडररची टेनिस प्रतिभा आणि आवड पाहून त्याच्या कुटुंबीयांनी त्याला खेळावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला होता. यामुळेच त्याने वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी शाळा सोडली होती.
टेनिसमुळे फेडररला शिक्षण घेता आले नसले तरी खेळ आणि व्यावसायिक गरजा लक्षात घेऊन त्याने अनेक भाषा शिकल्या आहेत. त्याला स्विस भाषेव्यतिरिक्त इतर ९ भाषा अवगत आहेत. यामध्ये इंग्रजीसह रोमन, स्पॅनिश, जर्मन फ्रेंच या भाषांचा समावेश आहे. अधिक भाषा शिकल्यामुळे जगभरातील बहुतांश लोकांपर्यंत पोहचता येते असे त्याने एका मुलाखतीत सांगितले होते.
स्वीत्झर्लंडच्या धरतीवर जन्मलेला मुलगा पुढे जाऊन विम्बल्डनला गेला आणि जाएंट किलर झाला. टेनिसच्या पंढरीत अनेक मोठे विक्रम रचणारा फेडरर सुरूवातीपासूनच वादांपासून दूर राहिला आहे. त्याने अनेकवेळा कौंटुबिक प्रेम आपल्या चाहत्यांना दाखवून दिले आहे. स्वीत्झर्लंडमध्ये तो अनेकवेळा कुटुंबासाठी भाजीपाला आणि घरगुती वस्तू खरेदी करताना दिसला आहे. एवढेच नाही तर फेडरर आपल्या चार मुलांसाठी रविवारी पास्ता देखील बनवतो.
स्वीत्झर्लंडच्या लोकांना त्यांच्या या विलक्षण खेळाडूचा खूप अभिमान आहे. २०१७ मध्ये फेडररच्या नावावर स्विस स्टॅम्प बनवण्यात आला होता. लक्षणीय बाब म्हणजे हयात असताना हा सन्मान मिळालेला तो स्वित्झर्लंडचा एकमेव नागरिक आहे. याशिवाय जगभरातील अनेक मोठे सन्मान त्याला मिळाले आहेत.
रॉजर फेडररचे जगभरात खूप चाहते आहेत. फेडरर एक महान खेळाडू म्हणून जगभर प्रसिद्ध आहे मात्र त्याच्या काही खास शैलीमुळे देखील त्याला ओळखले जाते. एका महान खेळाडूला गायींची आवड आहे हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटते. स्वीत्झर्लंडमध्ये त्याने केवळ गायीच नाही तर इतर अनेक प्राणीही त्यांच्या फार्ममध्ये ठेवले आहेत. वयाच्या २१ व्या वर्षी फेडररने पहिले विम्बल्डन जेतेपद पटकावले आणि ही स्पर्धा जिंकणारा तो आपल्या देशाचा पहिला खेळाडू ठरला होता. या विजयानंतर त्याला दुर्मिळ आणि अत्यंत महागड्या जातीची गाय भेट म्हणून देण्यात आली. फेडररने प्रेमाने त्या गायीचे नाव ज्युलिएट असे ठेवले होते.
रॉजर फेडररची गणना जगभरातील सर्वात श्रीमंत खेळाडूंमध्ये केली जाते. माहितीनुसार, त्याची एकूण संपत्ती ४,३७२ कोटींच्या घरात आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीत बक्षीस म्हणून एकूण १३० मिलियन डॉलर्स कमावले आहेत. मात्र तरीदेखील स्वीत्झर्लंडमध्ये तो सामान्य माणसाप्रमाणे सार्वजनिक वाहतूक वापरताना दिसला आहे.
रॉजर फेडररच्या या सोनेरी आयुष्यावर त्याची आई लिनेट फेडररची छाप राहिली आहे. रॉजरची आई देखील एक प्रोफेशनल टेनिसपटू होती आणि ती स्वीत्झर्लंडमध्ये टेनिसची क्लब प्रशिक्षक होती. तो देखील कबूल करतो की त्याने त्याच्या आईकडून टेनिसचे बारकावे आणि मूलभूत ज्ञान घेतले आहे.