Tokyo Olympics 2020 : लेकीला 'गुडलक' देण्यासाठी आईनं दागिने विकले; मीराबाईनं तेच परिधान करून पदक स्वीकारले; डोळे पाणावले By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 04:20 PM 2021-07-24T16:20:16+5:30 2021-07-24T16:54:06+5:30
Tokyo Olympics 2020, Mirabai Chanu: टोकियो ऑलिम्पिकमध्ये वेट लिफ्टिंग क्रीडा प्रकारात भारताला रौप्य पदकाची कमाई करुन देणाऱ्या मीराबाई चानूचा आजवरचा प्रवास अतिशय खडतर राहिला आहे. तिच्या आईनं सांगितलेली ही कहाणी डोळ्यांत पाणी आणणारी आहे. वाचा... भारताची महिला वेटलिफ्टर मीराबाई चानू हिनं शनिवारी टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला. तिनं ४९ किलो वजनी गटात रौप्य पदकाची कमाई केली. वेटलिफ्टिंगमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकणारी मीराबाई चानू दुसरी भारतीय महिला वेटलिफ्टर ठरली आहे.
मीराबाईचा इथवरचा प्रवास काही सोपा नव्हता. अनेक संकटांवर आणि अडचणींवर मात करुन २६ वर्षीय मीराबाईनं ऑलिम्पिकपर्यंत मजल मारली आहे. ऑलिम्पिक पदक जिंकल्यानंतर मीराबाईच्या गळ्यात रौप्य पदक तर होतच, पण सर्वांचं लक्ष वेधलं ते तिच्या आईनं तिला दिलेल्या खास गीफ्टनं.
मीराबाईच्या आईनं तिचे स्वत:चे दागिने विकून लेकीसाठी ऑलिम्पिक्सच्या लोगोच्या डिझाइनचे खास कानातले गुडलक म्हणून गिफ्ट दिले होते. हेच खास कानातले सोबत घेऊन मीराबाई टोकियोला गेली होती.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये मीराबाईनं आईनं दिलेले हेच खास कानातले परिधान करुनच रौप्य पदक स्वीकारलं आणि इथं मणिपूरमध्ये तिच्या राहत्या घरी आईच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
"मीराबाईला टीव्हीवर पाहात असताना माझं लक्ष मी तिला दिलेल्या कानातल्यांकडे गेलं आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं. माझ्याकडे असलेला दागिना विकून २०१६ सालच्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी तिच्यासाठी गुडलक म्हणून सोन्याचे कानातले गिफ्ट दिले होते", असं मीराबाईची आई सेखोम ओंग्बी तोम्बी लीमा यांनी सांगितलं. हे सांगत असतानानाही त्यांचे डोळे पाणावले होते.
लीमा यांनी त्यांच्याकडचा एक दागिना विकून आणि काही बचत करुन मीराबाईसाठी खास ऑलिम्पिकच्या लोगोच्या आकाराचे कानातले बनवले होते. तिचं भाग्य चमकावं या उद्देशानं त्यांनी २०१६ साली रिओ ऑलिम्पिक स्पर्धेवेळी लीमा यांनी हे कानातले बनवून घेतले होते.
रिओ ऑलिम्पिकमध्ये मीराबाईच्या पदरात निराशा आली. पण यावेळी ती कमतरता भरुन काढत तिनं रौप्य पदकाची कमाई केली आणि न विसरता आईनं दिलेले कानातले पारितोषिक स्वीकारताना परिधान केले होते.
"मीराला पाहून माझ्या डोळ्यात पाणी आलं. तिच्या वडिलांचेही डोळे पाणावले. हे आनंदाश्रू आहेत. तिनं आपल्या कठोर परिश्रमातून हे यश प्राप्त केलं आहे", असंही मीराबाईच्या आईनं पीटीआयशी बोलताना म्हटलं.
मणिपूरची राजधानी इन्फाळ येथून २५ किमी अंतरावर असणाऱ्या नोंगपोक काकचिंग गावात मीराबाईचं राहतं घर आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे निर्बंध असतानाही जवळचे नातेवाईक आणि गावकरी मीराबाईच्या घरी जमले होते. मीराबाई हिला तीन बहिणी आणि दोन भाऊ आहेत.
रिओ ऑलिम्पिकमधील पराभवामुळे मीराबाई खूपच निराश झाली होती. पण गेल्या पाच वर्षांत तीनं घेतलेली मेहनत पाहता यंदा पदक निश्चित आहे हे आम्हाला माहित होतं. त्यामुळेच सकाळपासूच आम्ही एकत्र घरी जमलो आणि मीरबाईला तिच्या मेहनतीच फळ मिळाला याचा आम्हाला खूप आनंद आणि अभिमान वाटतोय, असंही तिच्या कुटुंबियांनी सांगितलं.