- आकाश नेवे / आॅनलाइन लोकमतआयपीएल १० च्या गुणतक्त्यात टॉपर असलेल्या मुंबई इंडियन्सचा सामना आज रात्री ८ वाजता रायजिंग पुणे सुपर जायंट्स विरोधात आहे. मुंबईने या सत्रात अत्यंत आक्रमक आणि यशस्वी खेळ केलेला असला, तरी या सत्रात त्यांनी पुणेविरोधात झालेला पहिला सामना गमावला आहे.धोनीला गवसलेला सूर हे पुणे संघाचे बलस्थान आहे. राहुल त्रिपाठीची फटकेबाजी पुणे संघाला मोठी धावसंख्या उभारण्यासाठी नक्कीच मदत करेल. कर्णधार स्टिव्ह स्मिथ एकदा खेळपट्टीवर स्थिरावला, तर तो काय करूशकतो, याचा अंदाज मुंबईला पहिल्या सामन्यात आलाच असेल. या सामन्यात स्मिथने षटकार मारून पुण्याला विजय मिळवून दिला होता, तर इम्रान ताहीरने या सामन्यात मुंबईची फिरकी घेतली होती. वानखेडे स्टेडियम हे शार्दुल ठाकूरचे होमग्राउंड आहे, त्यामुळे त्याचा फायदा तो नक्कीच घेईल.फलंदाजीचा विचार केला तर मूळचा मुंबईकर असलेल्या अजिंक्य रहाणेला वगळून रणनीती बनवणे अशक्य आहे. वानखेडे स्टेडियममधील खेळपट्टी रहाणेला रोहित शर्मा एवढीच परिचित आहे.मुंबई इंडियन्सचा विचार करता, पार्थिव पटेल आणि जोश बटलर हे मुंबईला दमदार सुरुवात करून देऊ शकतात. युवा खेळाडू नितीश राणाकडे आॅरेंज कॅप पटकावण्याची चांगली संधी आहे. मात्र त्यासाठी त्याला खेळपट्टीवर टिकून मोठी खेळी करावी लागेल.रोहित शर्माचा फॉर्म हा मुंबई संघासाठी चिंतेची बाब आहे. सध्या रोहित आपल्या संघासाठी फिनिशरची भूमिका बजावण्यास उत्सुक आहे. गुजरात लायन्स विरोधात ४० धावांची खेळी सोडली तर मोसमात रोहितला अजून फारशी चमक दाखवता आली नाही.लसिथ मलिंगाने दोन सामन्यात धावा खूप दिल्या होत्या. गेल्या सामन्यात मुंबईने त्याला वगळून मिशेल जॉन्सनला संधी दिली होती, त्याने त्याचे सोने केले. मिशेल मॅक्लेघन बुमराह, हरभजन चांगल्या फार्ममध्ये आहेत. स्मिथ आणि कंपनीला या सामन्यात पराभूत करण्यासाठी गोलंदाज नक्कीच चांगली कामगिरी करण्यास उत्सुक असतील.हार्दिक आणि कृणाल पांड्या यांच्यापासून पुणे सुपरजायंट्सला सावध राहावे लागेल. मोक्याच्या वेळी फटकेबाजी करण्यात दोन्ही भावांचा हातखंडा आहे, तसेच गोलंदाजीत कमाल दाखवण्यात ते सक्षम आहेत.पुणे संघाने गेल्या सामन्यात विजय मिळवल्याने त्यांचे मनोबल नक्कीच उंचावलेले आहे. त्यांनी गुणतक्त्यात तळाच्या स्थानावरून पाचवे स्थान गाठले आहे.