...तर विनेश फोगाटचा मृत्यू झाला असता; कोचचा हादरवणारा दावा, 'त्या' रात्री काय घडलं? By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 05:07 PM 2024-08-16T17:07:43+5:30 2024-08-16T17:12:46+5:30
विनेश फोगाटनं पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या ५० किलोग्रॅम वजनी गटात फायनलमध्ये धडक देत इतिहास रचला होता. परंतु २९ वर्षीय पैलवान विनेशला फायनल मॅचच्या दिवशीच अपात्र घोषित करण्यात आले. त्यात रौप्य पदक मिळावं ही विनेश फोगाटची याचिकाही कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्सनंही फेटाळली त्यामुळे भारताला धक्का बसला.
पॅरिसच्या खेळांमध्ये विनेश फोगाटचे कोच वोलर अकोस यांनी सोशल मीडियावर या भारतीय पैलवानासोबत झालेल्या अन्यायाबाबत खुलासा केला आहे. कोचनं फेसबुक पोस्ट केली त्यानंतर काही काळात ती पोस्ट डिलीट करण्यात आली.
अकोस यांनी लिहिलं होतं की, सेमीफायनलनंतर २.७ किलोग्रॅम अतिरिक्त वजन वाढले होते. ते कमी करण्याशिवाय काही पर्याय नव्हता. मध्यरात्री ते पहाटे ५.३० पर्यंत तिने विविध कार्डियो मशिनवर सतत मेहनत घेतली होती. केवळ २-३ मिनिटेच आराम केला होता.
एकदा तर ती खाली कोसळली मात्र तिला आम्ही कसंतरी करून उठवलं. त्यानंतर तिने सॉना बाथ घेतले. मी जाणुनबुजून हे लिहित नाही मात्र ती मेली असती. त्या रात्री हॉस्पिटलमधून परतताना आमच्यात एक संवाद झाला.
विनेश फोगट म्हणाली- कोच, तुम्ही दु:खी होऊ नका, कारण तुम्ही मला सांगितले होते की जर मी कोणत्याही कठीण परिस्थितीत सापडले आणि मला अतिरिक्त उर्जेची गरज असेल तर मी जगातील सर्वोत्तम महिला कुस्तीपटूला (जपानची युई सुसाकी) पराभूत केले आहे हा विचार केला पाहिजे.
मी माझे ध्येय साध्य केले. मी जगातील सर्वोत्तम कुस्तीपटूंपैकी एक असल्याचे सिद्ध केले. आम्ही सिद्ध केले आहे की गेमप्लॅन काम करतात. पदक मिळत नाही आणि कामगिरी हिरावून घेता येत नाही असंही कोचनं पुढे लिहिलं होते.
त्याशिवाय विनेशनं साक्षी आणि बजरंगला त्यांनी मेहनतीने कमावलेली ऑलिम्पिक पदके नदीत फेकून देऊ नका अशी विनंती केली होती. ती पदके त्यांना ठेवण्याची विनंती केली, कारण ते खास होते. पण त्यांनी तिला समजावून सांगितले की हा प्रवास महत्त्वाचा आहे आणि तिच्या कामगिरीची व्याख्या पदकांवरून होत नाही.
ते म्हणाले आम्हाला अजूनही अभिमान वाटेल की आमचे व्यावसायिक वेळापत्रक आणि कठोर परिश्रम यामुळे जगातील सर्वोत्तम महिला कुस्तीपटूला पराभूत करण्यात आणि इतिहासात प्रथमच भारतीय महिला कुस्तीपटूला ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत नेण्यात यश आले असंही कोचनं त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
पॅरिस ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये विनेश फोगाटचे वजन १०० ग्रॅम अधिक आढळले त्यामुळे तिला अपात्र घोषित करण्यात आले. वजन कमी करण्यासाठी विनेश फोगाटचं प्रचंड मेहनत घेतली. तिच्या या मेहनतीवर पर्सनल कोच वॉलर अकोस(Woller Akos) यांनी खुलासा केला.
विनेशचं वजन २.७ किलो वाढले होते. त्यानंतर १ तास २० मिनिटे तिने व्यायाम केला. त्यानंतरही १.५ किलो वजन कमी करायचे होते. ५० मिनिटे सॉना बाथ घेऊनही शरीरातून घामाचे एक थेंब आला नाही. ती सातत्याने व्यायाम करत राहिली त्यात २-३ मिनिटे आराम करायची. एक वेळ अशी आली की तिचा मृत्यू झाला असता असं कोचनं म्हटलं.