CWG 2022: ज्या खेळात भारताच्या चौघींनी मिळवलं 'गोल्ड'; तो 'Lawn Bowls' हा खेळ कसा खेळतात माहीत आहे का? By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2022 09:21 PM 2022-08-02T21:21:53+5:30 2022-08-03T11:08:51+5:30
What is Lawn Bowls? Commonwealth Games 2022 : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मंगळवारी भारतीय खेळाडूंनी इतिहास रचला. वेटलिफ्टिंग, बॉक्सिंग, बॅडमिंटन, नेमबाजी, तिरंदाजी आदी खेळ हे भारतीयांच्या परिचयाचे होते. पण, मंगळवारी अशा एका खेळात भारताने पदक जिंकले अन् तेही सुवर्ण की ज्याची फार कुणाला माहिती नव्हती. जवळपास दोन-अडीच तास चाललेला हा खेळ पाहताना सुरुवातीला नेमकं काय चाललंय हेच अनेकांना कळेनासे झाले असावे... फक्त गुण पाहून भारत आघाडीवर आहे, की दक्षिण आफ्रिका हे समजत होते. What is Lawn Bowls? Commonwealth Games 2022 : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मंगळवारी भारतीय खेळाडूंनी इतिहास रचला. वेटलिफ्टिंग, बॉक्सिंग, बॅडमिंटन, नेमबाजी, तिरंदाजी आदी खेळ हे भारतीयांच्या परिचयाचे होते. पण, मंगळवारी अशा एका खेळात भारताने पदक जिंकले अन् तेही सुवर्ण की ज्याची फार कुणाला माहिती नव्हती. जवळपास दोन-अडीच तास चाललेला हा खेळ पाहताना सुरुवातीला नेमकं काय चाललंय हेच अनेकांना कळेनासे झाले असावे... फक्त गुण पाहून भारत आघाडीवर आहे, की दक्षिण आफ्रिका हे समजत होते.
भारतीय महिलांनी सुवर्णपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. भारताने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कडवा संघर्ष मोडून काढताना १७-१० असा विजय मिळवला. आफ्रिकेने २-८ अशा पिछाडीवरून १०-८ अशी आघाडी घेतली होती, परंतु अखेरच्या फेरीत भारतीय महिलांनी सॉलिड खेळ केला. CWG2022 भारताचे हे एकूण चौथे सुवर्णपदक ठरले. भारताच्या खात्यात ४ सुवर्ण, ३ रौप्य व ३ कांस्य अशी एकूण १० पदकं झाली आहेत आणि पदक तालिकेत ते सहाव्या क्रमांकावर आहेत.
भारताने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मंगळवारी लॉन बॉल ( Lawn Bowls) स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले. ९२ वर्षांच्या स्पर्धा इतिहासातील भारताचे या क्रीडा प्रकारातील हे पहिलेच पदक ठरले. आतापर्यंत १२ खेळांमध्ये भारताने किमान एकतरी गोल्ड जिंकले आहे. नेमबाजीत सर्वाधिक ६३ सुवर्ण भारताच्या खात्यात आहेत. त्यापाठोपाठ वेटलिफ्टिंग ( ४६), कुस्ती ( ४३), बॉक्सिंग ( ८) , बॅडमिंटन ( ७), टेबल टेनिस ( ६), अॅथलेटिक्स ( ५) , तिरंदाजी ( ३) , हॉकी, टेनिस, स्क्वॉश व लॉन बॉल ( प्रत्येकी १) असा क्रम येतो.
लॉन बॉल खेळाचे नियम काय, कशाच्या आधारावर गुण ठरवतात? लॉन बॉल पाहताना प्रथम दर्शनी असे दिसेल की दोन्ही टीममध्ये चार खेळाडू असून तीन खेळाडू दूर ठेवलेल्या पिवळ्या चेंडूच्या ( Jack) आपल्या जवळील मोठ्या चेंडूला जवळ पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. बरं खेळाडूंना जो चेंडू दिला जातो त्याचा आकार हा पिवळ्या चेंडूपेक्षा दुप्पट मोठा असतो. त्या चेंडूच्या बाजू किंचितशा सपाट असतात आणि तो वजनदार असतो.
तो वजनदार बॉल खेळाडू फेकून नव्हे तर जमिनीलगत ठेऊन ( सरपटी) त्या समोरील पिवळ्या चेंडूपर्यंत पोहोचवायचा असतो. तो बॉल जॅकच्या जितक्या जवळ जाईल, तितके गुण मिळण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे दोन्ही संघ जॅकच्या जास्तीत जास्त जवळ आपल्याकडील चेंडू पोहोचवण्याचा प्रयत्न करताना दिसतात.
त्यामुळे ज्या संघाचे जेवढे चेंडू जॅक जवळ असतील तेवढे त्या संघाला गुण दिले जातात... प्रत्येक फेरीत ९ प्रयत्न केले जातात. १५ फेरीपर्यंत हा खेळ सुरू राहतो आणि जेवढे ज्याचे गुण अधिक त्याला विजयी घोषित केले जाते. नाणेफेक महत्त्वाची ठरले, कारण जो संघ आधी चेंडू फेकणार असतो तो प्रतिस्पर्धीला एका ठराविक अंतरापर्यंत जॅक टाकण्याची संधी देतो आणि त्यानंतर सामना सुरू होतो. दोन्ही संघांचे खेळाडू आळीपाळीने चेंडू जॅक पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात.