ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगटला रौप्य पदक का मिळाले नाही? CAS ने सांगितले कारण By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 02:10 PM 2024-08-20T14:10:15+5:30 2024-08-20T14:18:03+5:30
Vinesh Phogat CAS Full Verdict: भारताची अव्वल महिला कुस्तीपटू विनेश फोगट कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टने दिलेल्या निर्णयानंतर चर्चेत आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये १०० ग्रॅम अधिक वजन असल्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आलं होतं. मात्र सीएएसने विनेशची याचिका फेटाळून लावली आणि भारताचे पदक हुकलं आहे. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतीय स्टार कुस्तीपटू विनेश फोगटने ६ ऑगस्ट रोजी सलग ३ सामने जिंकून 50 किलो फ्रीस्टाइल कुस्तीच्या अंतिम फेरीत प्रवेश करत रौप्य पदक निश्चित केलं होतं.
विनेशचा सुवर्णपदकाचा सामना ७ ऑगस्टच्या रात्री होणार होता. पण त्याच दिवशी सकाळी तिच्या वजनामुळे विनेशला अपात्र ठरवण्यात. सामन्यापूर्वी विनेशचे वजन १०० ग्रॅम जास्त होते.
यानंतर विनेशने कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टमध्ये अपील केले होते. या स्पर्धेत विनेशला संयुक्त रौप्यपदक देण्यात यावे, अशी त्यांची मागणी होती. पण या प्रकरणात सीएएसने विनेशचे अपील फेटाळले.
सीएएसने आता विनेशबाबतच्या निर्णयाचा तपशीलवार अहवाल प्रसिद्ध केला आहे. सीएएसचा हा निर्णय अहवाल २४ पानांचा आहे.
सीएएसने निर्णयात म्हटले आहे की खेळातील सर्व सहभागींसाठी नियम समान आहेत आणि या नियमांमध्ये कोणतीही शिथिलता दिली जाऊ शकत नाही, मग ते खेळाडूचे वजन असो किंवा इतर कोणत्याही कारण.
आपल्या वजन श्रेणीच्या मर्यादेत राहणे ही खेळाडूची जबाबदारी आहे. विनेश फोगटचे प्रकरण असे होते की तिचे वजन निर्धारित मर्यादेपेक्षा १०० ग्रॅम जास्त होते.
विनेशने या किंचित वजन वाढीसाठी सूट मागितली होती. कारण ही वाढ मासिक पाळीमुळे पाणी टिकून राहणे आणि पाणी पिणे यामुळे झाली होती. मात्र सीएएसने हे मान्य केले नाही आणि नियमात सूट देण्याची तरतूद नसल्याचे स्पष्ट केले.
अपात्र ठरवल्यानंतर विनेश फोगट खूपच निराश झाली होती. सुवर्णपदकासाठी तिला अंतिम सामन्यात सहभागी होण्यास अपात्र ठरवण्यात आल्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर निवृत्तीची घोषणा केली. मात्र, पॅरिसहून भारतात परतल्यानंतर जेव्हा ती तिचे गाव आणि कुटुंबीयांना भेटली तेव्हा तिला तिच्या समर्थकांकडून खूप आपुलकी आणि पाठिंबा मिळाला.