Wrestlers Stage Protest: "ब्रिजभूषण सिंहकडून महिला खेळाडूंचा लैंगिक छळ", दुसऱ्या दिवशीही ऑलिम्पिक खेळाडू आंदोलनावर ठाम By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 11:12 AM 2023-01-19T11:12:06+5:30 2023-01-19T11:16:07+5:30
Wrestlers Stage Protest: भारतीय कुस्ती महासंघाविरोधात दिग्गज खेळाडू जंतरमंतरवर धरणे आंदोलन करत आहेत. भारतीय कुस्ती महासंघाविरोधात दिग्गज खेळाडू जंतरमंतरवर धरणे आंदोलन करत आहेत. या कुस्तीपटूंमध्ये ऑलिम्पियन बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगाट आणि सरिता मोर यांच्यासह अनेक खेळाडूंचा समावेश आहे.
महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने प्रशिक्षकावर गंभीर आरोप केले आहेत. ती म्हणाली की, "प्रशिक्षक महिलांचा छळ करत आहेत आणि फेडरेशनचे काही जवळचे लोक प्रशिक्षक महिला प्रशिक्षकांशीही गैरवर्तन करतात."
"तसेच ते मुलींचा लैंगिक छळ करतात. भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) अध्यक्षांनी अनेक मुलींचा लैंगिक छळ केला आहे." लक्षणीय बाब म्हणजे ब्रिजभूषण सिंह भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत. असा आरोप महिला पैलवानांनी केला आहे.
विनेश फोगाट म्हणाली, "ते (युनियन) आमच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करतात आणि आमचा छळ करतात. ते आमचे शोषण करत आहेत. आम्ही ऑलिम्पिकला गेलो तेव्हा आमच्याकडे फिजिओ किंवा प्रशिक्षक नव्हता. जंतर-मंतरच्या कुस्तीपटूंना हे सांगायचे आहे तेव्हापासून आम्ही आमचा आवाज उठवला आहे, पण आम्हाला धमक्या दिल्या जात आहेत."
"आमची मजबुरी आहे की इथे येऊन ठिय्या मांडावा लागतो. आम्ही आपापसात चर्चा केली, त्यानंतरच आम्ही त्याबाबत निर्णय घेतला, आम्हाला दु:ख होत असताना ही योजना आखली गेली. सर्व पैलवानांना त्रास होत आहे", असे महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने अधिक सांगितले.
भारतीय कुस्ती महासंघाचे अधिकारी आंदोलनाला बसलेल्या खेळाडूंना भेटण्यासाठी जंतरमंतरवर पोहोचले आहेत. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही येथून हटणार नसल्याचे बजरंग पुनियाने सांगितले.
त्यांना कोणत्या समस्या आहेत असे विचारले असता, फेडरेशन आमच्यासाठी मोठी समस्या निर्माण करते असे भारतीय ऑलिम्पिक खेळाडूंनी म्हटले आहे.
लैंगिक छळ हा मोठा आरोप आहे. माझेच नाव यात ओढले जात असताना मी कारवाई कशी करू शकतो? मी चौकशीसाठी तयार आहे, असे भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांनी म्हटले आहे.
तसेच मला विनेश फोगाटला विचारायचे आहे की, तिने ऑलिम्पिकमध्ये कंपनीचा लोगो असलेला पोशाख का घातला? तिने सामना गमावल्यानंतर मी तिला फक्त प्रोत्साहन दिले आणि प्रेरित केले असे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय लैंगिक छळाची कोणतीही घटना घडलेली नाही. असे काही घडले तर मी स्वत:ला फाशी देईन. अशा शब्दांत सिंह यांनी विनेश फोगाटचे आरोप फेटाळले आहेत.
खरं तर आज या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. कडाक्याच्या थंडीत कुस्तीपटू विनेश फोगाट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि इतर कुस्तीपटू भारतीय कुस्ती महासंघ (WFI) आणि त्याचे प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात जंतर-मंतर येथे दुसऱ्या दिवशी मूक आंदोलन करत आहेत. महिला खेळाडूंनी डब्ल्यूएफआयच्या अध्यक्षांवर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत.