- मनीषा म्हात्रे (लेखिका ‘लोकमत’च्या मुंबई आवृत्तीत गुन्हे वार्ताहर/उपसंपादक आहेत ) पाणी साठवून ठेवण्यासाठी सोय नाही, पावसानं पाठ फिरवलेली, पाण्याचे साठे आटलेले. त्यामुळे शेतीसाठी पाणी नाही. जमीन कोरडी आणि घसाही कोरडा पडलेला. या शुष्क रस्त्यावर रोजगाराचा मार्ग हरवलेला. आणि डोक्यावर फक्त पाण्याचे हंडे आणि रानोमाळ चालण्याच्या वाटा. अशा खडतर परिस्थितीत दोन वेळच्या जेवणाचीही अनेकींची भ्रांत.असं आयुष्य सध्या दुष्काळी भागातल्या ज्या तरुण मुलींच्या वाटय़ाला येतंय. त्यातल्याच काहीजणींना एका संधीनं खुणावलं. आपापल्या गावात त्यांना गेल्या महिन्यात कळलं होतं की, पोलिसात बायकांची भरती होणार आहे. आपल्या जिल्ह्यातही भरतीची प्रक्रिया सुरू आहे. दुष्काळानं पोळलेल्या आयुष्यात जगण्याची आस वाटावी, अशी संधी ज्यांना सोडायची नव्हती त्या मुलींनी भरतीसाठी थेट मुंबई गाठली. हातातल्या कागदपत्रंच्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांत घट्ट धरून ठेवलं पोलिसात नोकरीचं स्वप्न!पण स्वप्नाला वास्तवाचे चटके तर मिळतातच, त्यात मुंबईचा उकाडा असा की, स्वप्नांनाही आपसूक घाम फुटावा. मात्र हे सारं काहीही मनात न आणता राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील तरुणींनी अलीकडेच झालेल्या मुंबईच्या पोलीस भरतीत मोठय़ा संख्येनं उडी घेतली. त्यांच्या जिल्ह्यातही भरती प्रक्रिया सुरू आहेत. मात्र तेथील खडकाळ मैदानावर कोणी चक्कर येऊन पडल्यास त्याला पाणी पाजण्यासाठी कोणी पुढे येणार नाही अशी परिस्थिती. मात्र तरीही मुंबईची संधी अनेकींना मोठी वाटत होतीच. म्हणून मग दुष्काळाच्या झळांमध्ये होरपळलेल्या तरुणींनी काटकसरीनं पै पै करून जमवलेल्या पैशांतून मुंबई गाठली. कुणी एकेकटय़ा, मैत्रिणी-मैत्रिणी आलेल्या, कुणी वडील किंवा भावासह. क्वचित कुणाला नव:याचा पाठिंबा, तर लहान तान्हं लेकरू घेऊनही नवराबायको मुंबईत येऊन धडकले. इथं ना राहण्याची सोय, ना खाण्याची. पण या मुली हारणार नव्हत्या, त्यांनी फुटपाथवरच ठाण मांडलं. मिळेल तिथं राहिल्या, डोक्यात एकच पोलीस ‘वर्दी’ मिळाली पाहिजे. राज्य पोलीस दलात रिक्त असलेल्या सुमारे 4 हजार 14 पोलीस शिपाई पदांसाठी भरती प्रक्रिया नुकतीच पार पडली. बेरोजगार तरुणांचे लोंढे त्या त्या जिल्ह्यात थोपवून त्यांना तेथील पोलीस भरतीत संधी मिळवून देण्याच्या दृष्टीने 2008 पासून राज्यात विविध जिल्ह्यांत एकाचवेळी पोलीस भरती प्रक्रिया राबविली जाते. रेल्वे पोलीस, शहर पोलीस, ग्रामीण पोलिसांची भरती संपूर्ण राज्यात जिल्हानिहाय सुरू झाली आहे. त्यानंतर प्रत्येक जिल्हावार हजारो उमेदवार पोलीस होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. त्यात एकटय़ा मुंबईत 1,275 पदांचा समावेश आहे. आणि विशेष म्हणजे त्यात 3क् टक्के जागा महिलांसाठी राखीव असल्यानं महाराष्ट्रभरातून खेडय़ा-पाडय़ासह तरुण मुलींनी मोठय़ा प्रमाणात या भरतीकडे धाव घेतली. या मुलींना भेटायचं म्हणून जिथं भरती सुरू होती ते ठिकाण गाठलं. पोलिसात भरती, या दोन शब्दांनी मोहवून जाऊन या मुली आल्या, त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि त्यातून त्यांच्या वास्तवाचं चित्रच उकलत गेलं.अगदी सुरुवातीलाच भेटल्या त्या भांबावलेल्या नजरेनं मुंबईकडे पाहणा-या दुष्काळग्रस्त भागातून पहिल्यांदाच मुंबईत दाखल अनेक तरुण मुली. एकतर त्यांच्याकडे पैसे नव्हते, मात्र तरी ते कसेबसे जमवून थेट मुंबईत पोहचण्यार्पयतची एक लढाईच त्यांनी जिंकलेली होती. वरळी, मरोळ आणि नायगाव येथे 23 तारखेपासून या तरुणींची कागदपत्र पडताळणी, शारीरिक मोजमाप चाचणी बरोबरच मैदानी परीक्षा सुरू झाली. एका दिवसात संपेल अशी ही प्रक्रिया नव्हतीच. संपूर्ण भरती प्रक्रिया पार पडेर्पयत या तरुणींना मुंबईत राहणं भागच होतं. खिशात पुरेसे पैसे नसल्याने हॉटेलमध्ये रूम घेऊन राहणं हा विषय कल्पनेतही नव्हता. त्यात भरतीसाठीच्या मैदानाच्या जवळपास ना शौचालयाची सोय, ना स्वच्छतागृहाची. दिवस कसाबसा वडापाव खाऊन रेटलाही जायचा, पण रात्रीचं काय? सुरक्षा आणि सुविधा या दोन गोष्टींची काहीएक पर्वा न करता या मुलींनी मग भरतीचं मैदान, आसपासच्या इमारती यासह फुटपाथवर झोपून रात्र काढली. दरवर्षी पोलीस भरतीसाठी येणा-या तरुणांच्या वाटेला अशी परवड येतेच, त्याच्या बातम्या होतात, टीका होते, पण एवढय़ा मोठय़ा संख्येनं लांबलांबून आलेल्या मुलींच्या वाटय़ालाही दुर्दैवानं तीच रडकथा आली. त्यांच्या सुरक्षिततेची कुणालाही काही पर्वा नव्हती. आमच्या मुलींना इथं रस्त्यावर रात्रीबेरात्री काही झालं, काही धोका झाला तर कोण जबाबदारी घेणार, असं मुलींचे सोबत आलेले पालक विचारत होते, पण त्यांच्या त्या प्रश्नात काळजी आणि धास्तीच जास्त होती. याच गर्दीत भेटली पूजा. (वय 19) लातूर जिल्ह्यातल्या एका गावातून आलेली तरुणी.ती सांगत होती, गावाकडे ओसाड पडलेली शेती. दोन थेंब पाणी दिसणं अवघड. ही परवड आपल्या लेकीच्या वाटय़ाला नको म्हणून तिच्या वडिलांनी जिवाचं रान केलं. तिला पोलीस भरतीत दाखल करण्यासाठी कसे बसे पैसे जमवले. तिच्यासोबत मुंबई गाठली. प्रवासादरम्यान अर्धे पैसे संपले. फक्त परतीच्या प्रवासपुरतेच पैसे शिल्लक राहिले. मग नाइलाज म्हणून त्यांनी एक रात्र फुटपाथवर उपाशीपोटी काढली. ‘तरुण मुलगी, रस्त्यावर कसं झोपणार?’ असं म्हणत मैदानाच्या आतील भागात तरी रात्रभर राहू द्या, अशी विनवणी तिथल्या वर्दीवाल्याकडे केली, पण दांडय़ाचा धाक दाखवत त्यांनी या बापलेकीला फुटपाथ दाखवला. सकाळ उजाडली; पण उंची बसत नसल्याचे सांगून तिला बाहेर काढण्यात आलं. पूजा भेटली तेव्हा हमसून हमसून रडत होती. ‘आता तर सगळचं संपलं’ म्हणत गुडघ्यात डोकं खुपसून बसली. घरी आई, वडील आणि लहान भाऊ. एक एकर शेती, पण दुष्काळ असा की तिथं चार वर्षात काही पिकलं नाही. एकवेळ जेवायचं तर एकवेळ उपाशीपोटी झोपायचे असा जणू त्यांचा दिनक्रमच झालाय. मंत्र्यांचे दौरे, शासनाचा टँकरही या भागातही फिरतो. एका घराला केवळ पाच घागरी. त्यात कुटुंबीयांनी तहान भागवायची. त्याच्यावर जास्त पाणी मागितले की भिका:यासारखे हकलून देतात, असं पूजा सांगते. दुय्यम वापराच्या पाण्यासाठी परभणी गाठायची. तेथून केलेल्या खडतर पायी प्रवासातून मिळेल ते दोन ते तीन हंडे डोक्यावर, खाद्यांवर घेऊन यायचे. अनेकदा रखरखत्या उन्हातील ‘या’ प्रवासात ती कोसळली. तेव्हा पुन्हा मागचा रस्ता गाठून डोक्यावर पाणी आणायला लागले. त्यात पोलीस भरतीने आशा दाखवली म्हणून वडिलांनीही काही दिवस चालक म्हणून काम करत मुलीसाठी पाच हजार रुपये जमवले. मुंबई गाठली. मुंबईचे आकर्षण होतंच पूजालाही. त्यात वरळी, सिनेमात पाहिलेली. पोलीस ग्राउंड गाठलं. तिथं सोमवारी तिचा क्रमांक असल्याचे समजताच सुरुवातीला तेथील जवळच्या पालिका उद्यानात इतरांच्या गर्दीत त्यांनी स्वत:साठीही जागा केली. झाडाच्या आडोशाला विश्रंती घेत बरेच वाटले. मात्र येथे ना पिण्याच्या पाण्याची सोय ना शौचालयाची. तेथील कर्मचा:यांकडे काही विचारावे तर उत्तरांऐवजी बाहेरचा रस्ता दाखवला. मुंबईत ओळखीचे, नातेवाईक कोणीच नाही. अशात हॉटेलमध्ये खोली घेऊन राहण्याइतके खिशात पैसे नाही. त्यातच उद्यानातूनही रात्री 9 नंतर बाहेर हकलण्यात आले. अखेर मैदानाच्या आधार भिंतींचा आधार घेत त्यांनी बाहेरच मुक्काम केला. सोमवारी सकाळी उठल्यानंतर ना त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी सोय ना शौचालयाची. सोमवारी सकाळी कागदपत्र पडताळणी आणि शारीरिक मोजमाप चाचणी पार पडणार असल्याने हजारोंच्या रांगेत तिही उभी राहिली. मात्र तेथील अधिका:यांच्या नजरा तिच्यासारख्या अनेक मुलींना डावलत असल्याने तिच्या मनातली धाकधूकही वाढत होती. केवळ अंगकाठी भरगच्च असलेल्या मुलींना रांगेतून वेगळं केलं. त्यात तिचा क्रमांक येईर्पयत ती कधी बाहेर निघाली हे तिला कळलंच नाही. ‘अहो साहेब.. पुन्हा एकदा उंची मोजा, पुन्हा एकदा उंची मोजा, साहेब..’ असा आकांत करून काही उपयोग नव्हताच. तिच्यासारख्या शेकडो होत्या. अखेर मुंबईच्या मायाजाळातून सावरत तिने परतीच्या प्रवासाची तयारी केली. ही सारी कथा सांगत म्हणाली, ‘अहो, मॅडम गावातल्या दुष्काळाने पिचलेलो आम्ही. जेवायला धड मिळेना; त्यात भरगच्च अंगकाठी कोठून आणणार? किमान दुष्काळग्रस्त भागातून आलेल्या तरुणींसाठी तरी शासनानं काहीतरी विशेष सवलत द्यायला हवी!’तिथंच गर्दीत राणी भेटली. बीड जिल्ह्यातल्या धारूर तालुक्यातली. दुष्काळाच्या झळेनं पोळलेलं कुटुंब, त्यातून वाट काढत आठ महिन्यांच्या चिमुरडीसोबत तिनं मुंबई गाठली. आयपीएस होण्याचं एकेकाळी स्वप्न होतं, ते आता या पोलीस भरतीर्पयत पोहचलं. पण हे तर हे म्हणत वीस वर्षाची राणी तान्ह्या लेकीसह भरतीला आली.घरची परिस्थिती नव्हतीच पण त्यातही तिनं अभ्यासही सुरू ठेवला. ‘बीएससी’च्या दुस:या वर्षाला असतानाच तिचा विवाह झाला. नव:यानं शिक्षण पूर्ण करण्याचं वचन दिल्यानं ती खूश झाली. याच विश्वासाच्या बळावर तिने ‘बीएसची’चे शिक्षण पूर्ण केले. दुष्काळग्रस्त गावात आठ महिन्यांचे बाळ, शिक्षणाबरोबर पोलीस होण्याचं स्वप्न उराशी बाळगून पतीच्या मजुरीवर तिनं संसार सुरू केला. आणि त्यात ही भरतीची बातमी कळली. हातात आठ महिन्यांच्या बाळाला घेऊन रांगेत उभ्या असलेल्या राणीकडे पोलिसांपासून सर्वाच्याच नजरा खिळल्या होत्या. कळव्यातल्या काकांकडे राहून सध्या ती भरतीसाठी प्रयत्न करते आहे. ती सांगते, ‘लहानपणापासून माङया आजोबांना मी आयपीएस ऑफिसर व्हावं, अशी इच्छा होती. आता ते या जगात नाहीत. मात्र मला त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. त्यात माङया डोळ्यादेखत कुणावर अत्याचार झाल्यास मला सहन होत नाही. गावच्या दुष्काळग्रस्त भागात माङया स्वप्नांना यश येणार नाही. पण मुंबईत ‘माझं’ स्वप्न पूर्ण होईल अशी आशा आहे.’अशा किती कहाण्या. कितीजणींच्या.त्या कहाण्यातल्या लातूरच्याच मुरुड तालुक्यातील पल्लवी अपवाद नव्हती.घरची शेती सरपंचाच्या घशात गेली. त्यानंतर ‘चिकन मार्केट’मधील एका दुकानात नोकरी करून वडिलांनी घराचा गाडा ओढला. बाराही महिने पडलेल्या दुष्काळात खायचं काय आणि साठवायचं काय, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा. ग्रॅज्युएट झालेल्या पल्लवीनं थेट लातूरहून ट्रेननं मुंबई गाठली. नोकरीचे सगळेच मार्गच बंद झाल्याने पोलीस भरतीतून काहीतरी मिळेल, अशी मनीषा उराशी बाळगूनच ती मुंबईत दाखल झाली आहे. ती सांगते, ‘गावच्या दुष्काळात खाण्यापिण्याची सोय न्हाय. अशात तिथं नोकरी म्हणजे स्वत:च्याच पायावर दगड मारून घेण्यासारखं आहे. पोलिसात झालंच काम तर घरची परिस्थिती तरी बदलेल!’तिच्याच सोबतची अनिता.ती सांगते, ‘पिण्याच्या पाण्यासाठी पदरमोड करूनदेखील अवघ्या 3क् रुपयांत एकच घागर मिळते. बाकी वापरायच्या पाण्यासाठी दोन ते तीन किलोमीटरचं अंतर कापून विहिरीतील तळाकाठी साचलेलं पाणी शेंदावं लागतं. घरात दारिद्रय़ त्यात बेरोजगारी. मजुरी करून वडील घरखर्च भागवतात. मात्र घरातली मोठी मुलगी म्हणून वडिलांच्या खांद्यावरचा भार कमी करण्यासाठी तिनंही अनेक प्रयत्न केले. अशात गावातही पोलीस भरती सुरू झाली; मात्र तिथल्या ग्राउंडलाही दुष्काळामुळे तडे गेले आहेत. त्यात जर चक्कर येऊन पडल्यास कोणी पाणी देण्यासाठीही नाही. पण मुंबईत मात्र असं चित्र नाही. ‘त्यात वर्दीच्या आत मुली सुरक्षित राहतात’ असं मी ऐकलं आहे म्हणून मुंबईत भरतीला आले.’ असं ती सांगत होती.या मुलींची हिंमत आणि जिद्द पाहण्यासारखी होती. त्याच जिद्दीनं आलेली नागपूरची मोनिका भेटली. वडिलांच्या निधनांनतर आईचा हात धरून ती मोठी झाली. मैत्रिणीसोबत या भरतीसाठी ती मुंबईत दाखल झाली. सुरुवातीला आमदार निवास येथे राहण्याची सोय होईन, या आशेनं दोघींनीही तिथं धाव घेतली. मात्र तिथं पुरुष मंडळी जास्त असल्यानं स्वतंत्र रूम मिळणं शक्य नसल्याचं त्यांना सांगण्यात आलं. अखेर दोघींनीही वरळी पोलीस ग्राउंड गाठले. तिथंच त्या राहिल्या. बाहेरगावाहून येणा:या मुलींची किमान राहण्याची तरी काही व्यवस्था शासनानं करायला हवी होती, असं ती निराश होत सांगते.शेकडोनं सांगता येतील अशा किती कहाण्या या गर्दीत भेटल्या. सगळ्याच मुलींची काही पोलिसात भरती झाली नाही. जागा कमी, गर्दी जास्त, त्यात अनेकींच्या वाटय़ाला अपेक्षाभंगच आला. पण तरीही त्यांच्या जिद्दीचं आणि हिमतीचं मोल काही कमी होत नाही.उलट या ‘भरतीत’ जी जिद्दीची-कष्टांची आणि चिकाटीची ‘लाट’ दिसली,जी जिगर राज्यातल्या खेडय़ापाडय़ातल्या तरुण मुलींच्या रूपात दडलेली दिसली,तिचं कौतुक करायला हवं!त्या हिमतीला एक सलाम!!खेडय़ापाडय़ात रुजतंय एक स्वप्न2014 च्या भरतीमध्ये झालेल्या पोलीस भरतीमध्ये महिलांचे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत 35 टक्क्यांनी वाढले. मात्र भरतीसाठी अर्ज करणा-या तरुणींमध्ये मुंबई, ठाणे, नागपूर या शहरी भागांमधील मुलींचे प्रमाण अधिक होते. यंदा मात्र ग्रामीण महाराष्ट्राच्या दुष्काळी भागातील मुलींचे प्रमाण अधिक असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बांधून लातूर, उस्मानाबाद, नंदुरबार, बीड, नागपूर अशा भागातील तरुणी मोठय़ा संख्येने मुंबईत पोलीस भरतीसाठी आल्या आहेत. अंतर कमी केल्यामुळे सुटका..राज्य पोलीस दलात सध्या 10.48 टक्के महिला कार्यरत असून, यावर्षी होणा:या भरतीमध्ये एकूण रिक्त पदांच्या 30 टक्के जागा महिलांसाठी राखून ठेवण्यात आल्या आहेत. पोलीस शिपाई पदासाठी असलेल्या या भरतीमध्ये यावर्षी मैदानी चाचणीतील धावण्याचे अंतर पुरुषांसाठी 5 किलोमीटरवरून कमी करून अवघे 1 हजार 600 मीटर करण्यात आले आहे. तर महिलांसाठी हेच अंतर 3 किलोमीटरवरून कमी करून अवघे 800 मीटर करण्यात आले आहे. भरतीमध्ये पात्र ठरलेल्या मात्र निवड न झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळांमध्ये अकरा महिन्यांच्या कंत्राटीपद्धतीवर भरती करून घेण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले.