राज्यात राजकीय हालचालींना वेग; गेल्या ३-४ दिवसांत नेमकं काय घडल्या मोठ्या घडामोडी?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 01:25 PM2020-05-26T13:25:25+5:302020-05-26T13:33:49+5:30

राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठी हालचाल होत असल्याचं दिसून येत आहे. शरद पवारांनी घेतलेली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट आणि त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट यातून विविध चर्चांना उधाण आलं आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शरद पवारांनी अनेक दिवसांनी मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याने या भेटीला महत्त्व प्राप्त झालं आहे. सध्या कोरोना महामारीतून राज्याला बाहेर कसं काढायचं हेच उद्दिष्ट आहे आणि तिन्ही पक्षाची भूमिका आहे असं शरद पवारांनी सांगितले आहे.

राज्यपालांनी भेटीत शरद पवार यांची तारीफ केली. आपण स्टेटसमन आहात, आपला राजकारणातला अनुभव मोठा आहे. आपण राज्य सरकारच्या कामकाजाबद्दल मार्गदर्शन केले पाहिजे, अशी सूचनाही राज्यपालांनी केली. त्यावर शरद पवार यांनी, मी सहसा कोणाच्या कामात दखल देत नाही, जर कोणी विचारले तरच सल्ला देतो, असे मिश्किल उत्तर दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर विविध बातम्या समोर येऊ लागल्या तेव्हा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. सरकार मजबूत आहे. चिंता नसावी, स्थिरतेबाबत निव्वळ पोटदुखी असल्याचं राऊत म्हणाले.

त्याचसोबत कोरोनावर लस आणि ठाकरे सरकार पाडण्याचा डोस विरोधकांना सापडायचा आहे. संशोधन जारी है. विरोधकांनी तात्काळ क्वारंटाईन व्हावे हेच बरे. महाराष्ट्र अस्थिर करण्याचे प्रयत्न अंगलट येतील अशा शब्दात विरोधी भाजपावर निशाणा साधला.

नेमकं राज्याच्या राजकारणात गेल्या ३-४ दिवसात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. सत्तासंघर्षाच्या काळातही शरद पवारांनी कधी मातोश्री गाठली नव्हती असं असताना सोमवारी अचानक शरद पवारांनी मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेणे यामागे मोठं कारण असणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

२३ मे रोजी शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्याच दिवशी संध्याकाळी भाजपा नेते किरीट सोमय्या राज्यपालांना भेटले होते. याच दिवशी शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर यांनी राज्यपालांची भेट घेतल्याची चर्चा आहे.

शरद पवार यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि भाजपा खासदार नारायण राणे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. कोरोना व्हायरसमुळे राज्य सरकार अपयशी ठरलंय असा आरोप करत त्यांनी राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी केली.

काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपा नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी राज्य सरकारवर आरोप केले होते. यानंतर २२ मे रोजी भाजपाकडून राज्यभरात ठाकरे सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं.

दरम्यानच्या काळात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांची एक ऑडिओ क्लीप बाहेर आली. त्यात त्यांनी हे आमचे सरकार नसून शिवसेनेचे सरकार आहे असं वक्तव्य केल्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याची चर्चा सर्वत्र सुरु झाली आहे.

राज्यात घडणाऱ्या घडामोडींमुळे ठाकरे सरकारला धोका निर्माण झाला आहे का? राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार का? सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधक राजकारण करतंय का? की विरोधकांना राजकीय डावपेचात अडकवण्याची ही सत्ताधाऱ्यांची चाल आहे का? अशा विविध प्रश्नांची उत्तरे राज्यातील जनतेला आगामी काळात मिळतील.