Remdesivir: नवाब मलिकांचा आणखी एक गौप्यस्फोट; रेमडेसिवीर साठा करणारा भाजपाचा 'तो' माजी आमदार गोत्यात By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 04:20 PM 2021-04-20T16:20:44+5:30 2021-04-20T16:26:41+5:30
Remdisivir Crisis, Politics Between BJP And Thackeray Government: मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. रेमडेसिवीरचा साठा भाजपाच्या माजी आमदाराच्या हॉटेलवर ठेवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनावरून महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. रेमडेसिवीर महाराष्ट्राला पुरवाल तर परवाना रद्द करू अशी धमकी केंद्र सरकारने औषध कंपन्यांना दिल्याचा दावा नवाब मलिकांनी केला होता.
या दाव्यानंतर आता नवाब मलिकांनी आणखी एक दावा केला आहे. ज्यात भाजपाच्या माजी आमदाराकडे रेमडेसिवीरचा साठा उपलब्ध असल्याचं ते म्हणाले. भाजपच्या माध्यमातून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात रेमडेसिवीरचा साठा त्यांच्या गोडाऊनमध्ये उपलब्ध झाला होता असा आरोप नवाब मलिक यांनी यावेळी केला.
भाजपाचे जळगाव-अमळनेरचे माजी आमदार व हिरा ग्रुप चालवणारे मालक यांनी नंदुरबार येथील हिरा एक्झिक्युटिव्ह हॉटेलमध्ये हजारो रेमडेसिवीरचा साठा जमा करून ठेवला होता. त्यांनी स्वतः फोटो जाहीर केले आहेत. त्यामध्ये ग्रुप फार्माला ओन्ली फॉर एक्स्पोर्ट हे औषधांवर लिहिलेले असताना ८ एप्रिल रोजी चौधरी बांधवाकडून रेमडेसिवीर रांगा लावून वाटप करण्यात आले. त्यानंतर दोन दिवस लॉकडाऊन असल्याने वाटप करण्यात येणार नाही असे सांगून १२ एप्रिलला पुन्हा वाटप करण्यात आले.
जवळपास ७०० - ८०० इंजेक्शन वाटण्यात आले आहे परंतु आमच्या माहितीनुसार २० हजारपेक्षा जास्त रेमडेसिवीर ब्रुक फार्माने आणून ठेवली होती. त्यापैकी ७०० - ८०० इंजेक्शन नंदुरबार, जळगाव आणि धुळे या जिल्हयात काळाबाजाराने वाटप करण्यात आल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.
हिरा ग्रुपचे शिरीष चौधरी यांच्याकडे एफडीएचा परवाना होता का? महाराष्ट्र एफडीएने परवाना दिला होता का? किंवा दमणच्या एफडीएने परवाना दिला होता का? असा सवालही नवाब मलिक यांनी यावेळी केला आहे. एखादा नेता जो आमदार राहिलेला आहे. तो बेकायदेशीरपणे २० हजाराचा साठा ठेवतोय, विकतोय, वाटप करतोय असं मलिकांनी सांगितले.
नंतर तोच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांना घेऊन मंत्री राजेंद्र शिंगणे यांना परवानगी मिळवून द्या यासाठी भेटला होता. १७ तारखेपर्यंत परवानगी नव्हती. त्या काळात जळगावात धंदा सुरू होता. त्याचवेळी आमचे आमदार अनिल पाटील यांनी मंत्र्यांकडे तक्रार करुन कडक कारवाई करण्याची मागणी केली होती.
कालच एफडीएने नंदुरबारच्या जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत असेही मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. तीन दिवसापूर्वी यावर एक प्रश्न निर्माण केल्याचे सांगताना रेमडेसिवीरचा तुटवडा असताना निर्यात कंपन्या आहेत त्यांच्याकडे आमचे अधिकारी संपर्क करत होते. मात्र रेमडेसिवीर आम्हाला द्यायला तयार नाही अडवणूक करत होते असा आरोप होता.
ब्रुक फार्माला राज्य सरकारच्या एफडीएने पत्र दिल्यानंतर केंद्रशासित दमणच्या एफडीएने महाराष्ट्राला रेमडेसिवीर देता येणार नाही असे स्पष्ट सांगितले होते. हाच मुद्दा तीन दिवसापूर्वी उपस्थित केला होता. केंद्राकडून अडवणूक होतेय ती थांबली पाहिजे त्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि तुटवडा दूर करण्याचे आश्वासन दिले होते. आम्ही राजकारणासाठी हा विषय आणला नव्हता तर जनहितासाठी समोर आणल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
ब्रुक कंपनीच्या मालकाला वाचवण्यासाठी भाजपाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री वकिलपत्र घेऊन गेले होते. त्यानंतर माझ्यावर आरोप करण्यास सुरुवात झाली. माझ्या जावयाचा विषय समोर आणला जात आहे. जावयाला अटक झाल्यामुळे नवाब मलिक केंद्राच्या विरोधात आणि अमित शहा यांच्या विरोधात बोलत आहेत. परंतु काही दिवसांपूर्वी मी स्पष्ट सांगितले होते की, कायद्यापेक्षा कुणी मोठं नाही. जो काही निर्णय न्यायालयात होईल तो होईल. जे सत्य आणि असत्य आहे ते बाहेर येईलच असे नवाब मलिक म्हणाले
आम्ही मुद्दा उपस्थित करतो त्याचे उत्तर अपेक्षित आहे. ही साठवण करणारी मंडळी आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. काळाबाजार करत आहेत त्यांना वाचवण्याचा धंदा भाजपाने सुरू केला आहे. हे राजकारण करण्याची आमची अजिबात इच्छा नाही. हे सगळे विषय समोर आणत असताना ऑक्सिजनचा तुटवडा कमी होईल. रेमडेसिवीर लोकांना भेटेल. केंद्र सरकारकडून जे विषय दुर्लक्षित होतायत. त्याकडे लक्ष द्या असे सांगितल्यावर व विषय समोर आल्यावर केंद्र सरकार जागे झाले आहे असा टोला त्यांनी लगावला.