वर्षभरात राष्ट्रवादीला मिळणाऱ्या देणगीत मोठी वाढ, भाजपाच्या बड्या नेत्याने दिले पाच कोटी By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 05:08 PM 2021-02-24T17:08:55+5:30 2021-02-24T17:13:38+5:30
Big increase in donations to NCP during the year : राज्यात आलेल्या सत्तेचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला होताना दिसत आहे. गतवर्षभरात राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणाऱ्या देणग्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. (BJP leader Mangalprabhat Lodha's Company gave Rs 5 crore) २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशी महाविकास आघाडी होऊन उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले होते. या सरकारच्या स्थापनेत शरद पवार यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
दरम्यान, राज्यात आलेल्या सत्तेचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला होताना दिसत आहे. गतवर्षभरात राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणाऱ्या देणग्यांमध्ये मोठी वाढ झाली असून, २०१९-२० मध्ये राष्ट्रवादीला ५९.९४ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. आधीच्या वर्षाच्या तुलनेत देणग्यांमध्ये पाच पटींने वाढ झाली आहे. या संदर्भातील वृत्त सरकारनामाने द प्रिंट या संकेतस्थळाच्या हवाल्याने दिले आहे.
राजकीय पक्षांना मिळालेल्या देणग्यांची माहिती निवडणूक आयोगाकडे देणे अनिवार्य करण्यात आल्यापासून राजकीय पक्ष त्या त्या आर्थिक वर्षातील माहिती निवडणूक आयोगाला देत असतात. दरम्यान २०१९-२० मध्ये ५९.९४ लाखांच्या देणग्या मिळालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला २०१८-१९ मध्ये १२.०५ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या देणगीदारांमध्ये भाजपाच्या एका बड्या नेत्याचाही समावेश आहे. भाजपाचे आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या लोढा डेव्हलपर्स कंपनीने राष्ट्रवादी काँग्रेसला ५ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. या देणगीबाबत संबंधित संकेतस्थळाने विचारले असता लोढा यांनी तुम्ही याबाबत कंपनीतील इतर कुणाशी तरी संपर्क साधा असे सांगितले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणाऱ्या देणग्यांचा स्वीकार केला जातो. तसेच याची माहिती निवडणूक आयोगासमोर सादर केली जाते. त्यामुळे संशय घेण्याची गरज नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे.