Bihar Assembly Election Results: ...तर बिहारमध्ये महागठबंधन सरकार?; सत्तास्थापनेसाठी 'या' समीकरणावर विचार By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2020 11:29 PM 2020-11-12T23:29:03+5:30 2020-11-12T23:32:08+5:30
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळालं. राष्ट्रीय जनता दलाच्या नेतृत्त्वाखाली महागठबंधननं एनडीएला जबरदस्त लढत दिली. मात्र त्यांना बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही.
महागठबंधनाला ११० जागा मिळाल्या आहेत. तर एनडीएकडे बहुमत आहे. मात्र महागठबंधनकडे सरकार स्थापनेची संधी आहे. तेजस्वी यादव राजकीय डावपेच टाकून ती संधी साधणार याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
२०१५ मध्ये राजद, जेडीयू आणि काँग्रेसच्या महागठबंधननं भाजप आणि मित्रपक्षांचा धुव्वा उडवला. मात्र २०१७ मध्ये नितीश कुमार यांनी महागठबंधनमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भाजपनं त्यांना पाठिंबा दिला. त्यानंतर राज्यात जेडीयू आणि भाजपचं सरकार स्थापन झालं.
तेजस्वी यादव यांना सरकार स्थापन करायचं असल्यास त्यांना असेच डावपेच खेळावे लागतील. सध्या महागठबंधनकडे ११० आमदार आहेत. सत्ता स्थापनेसाठी १२२ आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे.
एनडीएमध्ये दोन लहान घटक पक्ष आहेत. हिंदुस्तानी अवाम मोर्चा (हम) आणि विकासशील इन्सान पक्ष (व्हीआयपी) यांचे प्रत्येकी ४ आमदार निवडून आले आहेत.
व्हीआयपीचे अध्यक्ष मुकेश सहानी आणि तेजस्वी यादव यांच्यातील बोलणी जागावाटपामुळे फिस्कटली. त्यामुळे ते एनडीएकडे गेले. त्यांचं मन वळवण्यात यादव यांना यश आल्यास महागठबंधनचा आकडा ११४ वर जाईल.
हिंदुस्तानी अवाम मोर्चाचे (हम) अध्यक्ष जीतन राम मांझी हे लालू प्रसाद यादव यांचे चांगले मित्र आहेत. ते लालू प्रसाद आणि राबडी देवी यांच्या मंत्रिमंडळात होते. लालूंची ती मैत्री तेजस्वींच्या कामी येऊ शकते. तसं झाल्यास महागठबंधनचा आकडा ११८ वर जाईल.
सीमांचल परिसरात असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमनं महागठबंधनचं मोठं नुकसान केलं. एमआयएमचे ५ उमेदवार निवडून आले. राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो. त्यामुळे तेजस्वी ओवेसींची मदत घेऊ शकतात. धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावर ओवेसींनी पाठिंबा दिल्यास तेजस्वींकडे १२३ आमदारांचा पाठिंबा असेल.
मतमोजणीत घोटाळा झाल्याचा आरोप करताना तेजस्वी यादव यांनी एनडीएच्या घटक पक्षांना साद घातली. एनडीएचे मित्रपक्ष आमच्यासोबत येऊ शकतात, असं तेजस्वी म्हणाले होते.