बिहार निवडणूक : भाजपाची रॅली; रविशंकर प्रसाद यांना माथेफिरूने मारलेली गोळी By हेमंत बावकर | Published: October 12, 2020 10:21 AM 2020-10-12T10:21:56+5:30 2020-10-12T10:30:48+5:30
Bihar Election 2020: एकीकडे कोरोना दुसरीकडे प्रचार, असा दुहेरी सामना उमेदवारांना करावा लागणार आहे. मोठमोठे नेते प्रचारासाठी येणार आहेत. तसे इतिहासातही बिहारची निवडणूक एक चर्चेचा विषय राहिलेली आहे. केंद्रीय मंत्री असलेले रविशंकर प्रसाद यांच्यावर जीवघेणा हल्लाही झाला आहे. यंदा कोरोनाच्या संकटात बिहारमध्ये निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. एकीकडे कोरोना दुसरीकडे प्रचार, असा दुहेरी सामना उमेदवारांना करावा लागणार आहे. मोठमोठे नेते प्रचारासाठी येणार आहेत. तसे इतिहासातही बिहारची निवडणूक एक चर्चेचा विषय राहिलेली आहे. केंद्रीय मंत्री असलेले रविशंकर प्रसाद यांच्यावर जीवघेणा हल्लाही झाला आहे. आता लोक जन शक्ती पक्षाकडून उभे असलेले तत्कालीन भाजपाचे नेते रामेश्वर चौरसिया यांच्या रॅलीवेळी हा भय़ानक हल्ला झाला होता.
चौरसिया आज भाजपाच्या विरोधात उभे ठाकले असले तरीही एक काळ होता ते भाजपाच्या ताकदवान नेत्यांमध्ये मोडत होते. त्यांच्या प्रचारासाठी प्रमोद महाजन यांच्यासारखे मोठे नेते येत होते.
ही घटना 15 वर्षे जुनी म्हणजेच 2005 मधील आहे. तेव्हा ऑक्टोबर 2005 मध्ये केवळ 7 महिन्यांनी पुन्हा विधानसभेची निवडणूक लागली होती. फेब्रुवारीमध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपा-जदयू लालू यांना सत्तेतून बेदखल करण्यात कमी पडली होती. यामुळे ही आरपारची लढाई बनली होती.
चौरसिया तेव्हा भाजपाकडून नोखा मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. फेब्रुवारीमध्ये ते तिथून जिंकलेले होते. त्यांनाही पुन्हा निवडणूक होईल असे वाटले नव्हते. मात्र, ऐन हिवाळ्यात बिहारमध्ये राजकीय वातावरण गरम झाले होते.
2004 मध्ये केंद्रात सत्ता गमावल्याने भाजपाला बिहारची ही निवडणूक काहीही करून जिंकायची होती. यासाठी पक्षाने मोठमोठे चेहरे प्रचारासाठी पाठविले होते. यामध्येच एक होते केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद
6 ऑक्टोबर 2005 ला चोरसिया यांच्यासाठी दोन रॅली होणार होत्या. मंचावर तेव्हाचे चाणक्य प्रमोद महाजन देखील उपस्थित होते. रविशंकर प्रसादही वाजपेयी सरकारमध्ये मंत्री होते.
भाजपाचे नेते सभेला लालू प्रसाद यांच्या सरकारविरोधात गरळ ओकत होते. सभेला आलेले लोक टाळ्या वाजवत होते. मधूनच भाजपाचे नारे लागत होते. याचवेळी रविशंकर प्रसाद यांनी माईकचा ताबा घेतला.
रविशंकर प्रसाद यांचे भाषणही संपले. यामुळे ते पुन्हा आपल्या जागेवर जाऊन बसले. याचवेळी एक तरुण वेगाने मंचावर चढला. त्याच्या हातामध्ये देशी कट्टा होता. रविशंकर यांची पापणी लवते न लवते तोच त्यांच्यावर बंदूक रोखून त्याने गोळी झाडली अन् मंचावर शांतता पसरली. मात्र, पुढच्याच क्षणाला खळबळ उडाली.
तो कोण होता, कुठून आला याचा विचार लोकांच्या मनात घोळण्याआधीच रविशंकर प्रसाद मंचावर पडले. त्यांच्या डाव्या दंडाला गोळी लागली होती. रक्तस्त्रावही होत होता. या गोळीबारात महाजन सुखरूप होते.
नेत्याला गोळी लागताच कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी लगेचच मंचावर धाव घेत हल्लेखोराला चोप दिला. तर काहींनी रविशंकर प्रसाद यांना मंचावरून खाली नेले. एका गोळीने पटन्यावरून दिल्लीपर्यंत खळबळ उडाली होती.
रविशंकर प्रसाद यांच्यावर सासारामच्या स्थानिक रुग्णालयात उपचार केले गेले. त्यानंतर त्यांना पटनाला हलविण्यात आले. भाजपाने हाच मुद्दा निवडणुकीत लावून धरला. जंगल राजचे आरोप होऊ लागले. 243 जागांच्या या विधानसभेत नितिशकुमारांच्या जदयूला 88 आणि भाजपाला 55 जागा मिळाल्या. तर लालूंच्या राजदला 54 जागांवर समाधान मानावे लागले.