शांत संयमी मृदूभाषी देवेंद्र फडणवीस हे कट्टर विदर्भवादी नेते आहेत. मात्र आता त्यांच्याकडे संपुर्ण महाराष्ट्राची जबाबदारी आहे. विधानसभेत बहुमत नसलेले सरकार चालवताना त्यांचा कस पणाला लागेल. राज्याचा विकास करतानाच भ्रष्टाचारावर लगाम लावण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना अथक मेहनत करावी लागेल ऐवढे मात्र नक्की.२०१३ मध्ये देवेंद्र फडणवीस भाजपाचे प्रदेशाध्यक्ष झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली यंदा पहिल्यांदाच भाजपाला महाराष्ट्रात १२२ जागांवर विजय मिळाला आहे. फडणवीस यांची स्वच्छ प्रतिमा ही त्यांची सर्वात जमेची बाजू आहे. अद्याप त्यांच्यावर एकदाही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही.१९९९ मध्ये भाजपाने त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली व पक्षाचा विश्वास सार्थ ठरवत ते आमदार म्हणून निवडून आले. आमदार म्हणून देवेंद्र फडणवीस हे सलग तिस-यांदा निवडून आले आहेत. विधानसभेत अभ्यासू नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. भ्रष्टाचाराचे प्रकरण उघड करुन आघाडी सरकारची कोंडी करण्यात फडणवीस नेहमीच पुढे होते.देवेंद्र फडणवीस १९९२ १९९७ मध्ये सलग दोन वेळा नागपूर महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. या कालावधीत त्यांनी नागपूर महापालिकेचे महापौरपदही भूषवले होते. वयाच्या २७ व्या वर्षी महापौरपदी विराजमान होणारे फडणवीस हे भारतातील दुसरे सर्वात तरुण महापौर होते.संघ जनसंघाच्या संस्कारांचे बाळकडू मिळालेले फडणवीस १९८९ मध्ये भाजपाच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष झाले व तिथूनच त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा शुभारंभ झाला.आठ वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांचा विवाह अमृता यांच्याशी झाला. अमृता या अॅक्सिस बँकेत अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. फडणवीस दाम्पत्त्याला दिविजा ही मुलगी आहे.लॉमध्ये गोल्ड मेडल पटकावणारे देवेंद्र फडणवीस यांनी काळा कोट घातला नाही पण लोकप्रतिनिधी म्हणून व्यापक अर्थाने जनतेची वकिली केली.‘माझ्या बाबांना इंदिरा गांधींनी अटक केली त्यामुळे मी इंदिरा कॉन्व्हेंटमध्ये शिकणार नाही असे आणीबाणीच्या काळात वयाच्या सहाव्या वर्षी देवेंद्र फडणवीस यांनी आईला बजावून सांगितले होते. शेवटी त्या कॉन्व्हेंटमधून त्यांना सरस्वती शाळेत टाकावे लागले.देवेंद्र फडणवीस यांचे वडिल गंगाधर हे विधान परिषदेत आमदार होते. तर त्यांची आई सरिता फडणवीस या विदर्भ हाउसिंग क्रेडीट सोसायटीच्या चेअरमन होत्या. वडिलांचा राजकीय वारसा देवेंद्र फडणवीस यांनी समर्थपणे पुढे नेला.२२ जुलै १९७० मध्ये देवेंद्र फडणवीस यांचा जन्म झाला. फडणवीस हे चंद्रपूर जिल्ह्यातील मालगुजार कुटुंब. त्यांची भरपूर शेती आजही आहे.स्वच्छ प्रतिमा अभ्यासू वृत्ती तरुण आणि तडफदार नेते म्हणून प्रसिद्ध असलेले देवेंद्र फडणवीस हे ३१ ऑक्टोबरला महाराष्ट्राचे २८ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. वयाच्या ४४ व्या वर्षी मुख्यमंत्री झालेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या नगरसेवक ते मुख्यमंत्रीपदापर्यंतच्या कारकिर्दीचा घेतलेला हा आढावा.