खासदार नुसरत जहाँचा 'दुर्गा देवी' अवतार पाहून नेटिझन्स भडकले; जीवे मारण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2020 07:19 PM2020-09-29T19:19:53+5:302020-09-29T19:23:03+5:30

सिनेमातून संसदेत पोहचलेली बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँ सोशल मीडियात खूप सक्रीय असते, तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर नुसरत बशीरहाटमधून निवडून आली आहे.

चाहत्यांसाठी नुसरत जहाँ इन्स्टाग्रामवर व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करत असते. पण तिच्या पोस्टमुळे बर्‍याच वेळा सोशल मीडियावर ट्रोलिंगला सामोरे जावे लागले आहे. नुकतीच नुसरतने एक नवीन फोटोशूट केले, ज्याचे काही फोटो तिने इंन्स्टाग्रामवर अपलोड केले आहेत.

नुसरत जहाँने हा फोटो सोशल मीडियात पोस्ट केल्यानंतर तिला चाहत्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. पुन्हा एकदा तिला उघडपणे धमक्या येऊ लागल्या.

नुसरत जहाँला दुर्गा देवीच्या अवतारात पाहून मुस्लीम युजर्सचा राग अनावर झाला आणि तिला विविध प्रकारचे सल्ले देण्यात आले, त्यातच अनेकांनी नुसरतला जीवे मारण्याची धमकीही दिली होती.

जमीयत दावतुल मुस्लीम संरक्षक आणि प्रसिद्ध आलीम ए दीन मौलाना कारी इस्हाक गौरा यांनी सांगितले की, इस्लामने कोणाच्या वैयक्तिक जीवनात भाग घेण्याची परवानगी दिली आहे. नुसरत जहाँ नेहमीच चर्चेत राहिली आहे. ती जे काम करतेय त्याला इस्लाम कधीच परवानगी देत नाही, नुसरत जहाँचे काम मुसलमानांना शोभा देत नाही.

नुसरत पुन्हा एकदा सोशल मीडियावर धार्मिक द्वेषाचा बळी ठरली आहे. महालयाच्या निमित्ताने नुसरतने दुर्गा देवीच्या रुपात फोटोशूट केले होते, नंतर तिने या फोटोशूटचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले.

या फोटोमधील खास बाब म्हणजे या फोटोंमध्ये ती देवी दुर्गा बनली आहे. हातात त्रिशूल धारण करुन ती दुर्गाच्या अवतारात दिसली आहे.

नुसरतच्या फोटोवर भाष्य करताना एका युजर्सने धमकी देणाऱ्या भाषेत सांगितले की, तुझा मृत्यू जवळ आला आहे. अल्लाहची भीती बाळग. तू तुझे शरीर झाकून घेऊ शकत नाही? एक-दोन नव्हे तर बर्‍याच कमेंट्स आहेत ज्यात लोक नुसरतच्या या फोटोवर टीका करीत आहेत.

तृणमूल कॉंग्रेसचे खासदार आणि बंगाली अभिनेत्री नुसरत काही ना काही कारणांमुळे चर्चेत राहिली आहे. लग्नानंतर खासदार झाल्यापासून ती चर्चेत राहिली आहे. खासदार झाल्यानंतर संसदेत शपथ घेण्यासाठी पोहोचलेल्या नुसरत साडी आणि मंगळसूत्र परिधान केलेले दिसले आणि मुस्लिम धार्मिक नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली.

नुसरत जहाँचा मुस्लीम कुटुंबात जन्म झाला आहे. १९ जून,२०१९ रोजी तिने कोलकाता येथील उद्योगपती निखिल जैनशी लग्न केले. तुर्कस्तानच्या इस्तंबूल शहरात दोन प्रकारच्या प्रथा परंपरेनुसार हे लग्न पूर्ण पार पडले.