एक्झिट पोलनंतर गायब! भाजपा कार्यालयात नेते जमायला सुरुवात; सकाळी होता सन्नाटा By हेमंत बावकर | Published: November 10, 2020 04:26 PM 2020-11-10T16:26:40+5:30 2020-11-10T16:32:18+5:30
Bihar Election Result 2020: मीडियावाल्यांना आता सर्व्हे करण्याच्या पद्धतीचा पुनर्विचार करायची गरज आहे. जर तुम्ही जनतेची नाडी ओळखण्यात फेल झाला तर कोणताही दावा करण्याआधी विचार करायला हवा, अशी आगपाखड आता बिहार भाजपाचे नेते करू लागले आहेत. गेल्या 6-7 वर्षांपासून भाजपाच्या मुख्य तसेच प्रादेशिक कार्यालयात निवडणूक असो वा नसो नेत्यांचा राबता असतोच. परंतू बिहार निवडणुकीत एक्झिट पोल आले आणि पाटण्याच्या कार्यालयातील गर्दी ओसरू लागली होती.
तर त्या उलट राजदच्या कार्यालयात साफसफाई काय, रंगरंगोटी काय...सुशोभिकरणाची रेलचेलच सुरु होती. विजयाच्या आशेने पाटण्यातील रस्त्यांवरही राजदचे झेंडे दिसू लागले होते.
आज सकाळी राजदची महाआघाडी दणक्यात पुढे जाताना पाहून तर भाजपाच्या कार्यालयाकडे नेतेच काय कार्यकर्तेही फिरकण्याचे नाव घेत नव्हते. एक्झिट पोलनंतर जे गायब झाले ते आज दुपारी दिसू लागले आहेत. गेले तीन-चार दिवस भाजपाच्या कार्यालयात सन्नाटा होता.
मात्र, मतमोजणीच्या काही तासात राजद आघाडीवर मात करत एनडीएने मुसंडी मारली आणि भाजपाच्या नेत्यांमध्ये काहीसे बळ आले. यानंतर दुपारी 12 वाजल्यानंतर भाजपा कार्यालयात नेत्यांची रेलचेल सुरु झाली.
गेल्या तीन दिवसांपासून मीडियावाल्यांनाही भाजपाचा नेता शोधून सापडत नव्हता. सकाळी 10 वाजेपपर्यंत हीच परिस्थिती दिसत होती. मात्र, जसजसी मतमोजणी एनडीएच्या बाजुने झुकायला लागली तसे भाजपाच्या गोटातही उत्साह संचारलेला दिसू लागला. त्यानंतर पक्ष कार्यालयात नेत्यांची येजा होऊ लागली.
पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले की, एक्झिट पोलने दिलेल्या अंदाजानंतर पक्षाचे नेते चिंतेत होते. तेजस्वी यादव यांच्या सभांना झालेली गर्दी, एनडीएच्या नेत्यांच्या सभांमध्ये झालेली हुल्लडबाजी जनतेत राग असल्याचे सांगत होती.
जनतेत असलेला हा राग कुठे पर्यंत घेऊन जाईल सांगता येत नव्हते. यामुळे आम्ही सारेच संभ्रमात होतो. यामुळे आम्हीदेखील मोठी आघाडी मिळविण्याची आशा ठेवली नव्हती. मात्र, देवाच्या कृपेने पक्षाने चांगली कामगिरी केली आणि चांगला निकाल लागत आहे, असे ते म्हणाले.
भाजपाचे नेते विजयंत पांडे यांनी सांगितले की, मीडियावाल्यांना आता सर्व्हे करण्याच्या पद्धतीचा पुनर्विचार करायची गरज आहे. जर तुम्ही जनतेची नाडी ओळखण्यात फेल झाला तर कोणताही दावा करण्याआधी विचार करायला हवा. नितीश कुमार यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा सरकार बनविण्यात येणार आहे.
सुदेश वर्मा यांनी सांगितले की, बिहार निवडणुकीच्या निकालावरून आजही हेच सिद्ध होत आहे की नरेंद्र मोदी एक ब्रँड बनले आहेत. विरोधी आणि मीडियाने पंतप्रधानांवर प्रश्न विचारण्याचे प्रयत्न केले होते. मात्र, जनतेने त्यांच्यावरच विश्वास ठेवला आहे.
सध्याच्या कलानुसार भाजपा 76, राजद, 66, जदयू 48, काँग्रेस 21 आणि एलजेपी 2 व अन्य 30 अशी आघाडी दिसत आहे. मात्र, यापैकी 14 जागांवर 5,8, 32 ते 500 चे लीड उमेदवारांना मिळालेले आहे. तर 123 जागांवरील पहिल्या आणि दुसऱ्या उमेदवाराच्या मतांचा फरक हा 3000 मतांहूनही कमी आहे.