Election Result : निवडणूक जिंकल्याची बातमी आली, अन ती लग्न अर्ध्यावर टाकून मतमोजणी केंद्रात पोहोचली By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 12:02 AM 2021-05-04T00:02:37+5:30 2021-05-04T00:09:08+5:30
Election Result: उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची मतमोजणी सध्या सुरू आहे. उमेदवारांच्या जय पराजयाचे कल क्षणाक्षणाला समोर येत आहेत. या मतमोजणी दरम्यान एक गमतीदार गोष्ट घडली आहे. उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची मतमोजणी सध्या सुरू आहे. उमेदवारांच्या जय पराजयाचे कल क्षणाक्षणाला समोर येत आहेत. या मतमोजणी दरम्यान एक गमतीदार गोष्ट घडली आहे.
उत्तर प्रदेशमधील रामपूर येथे मतमोजणी सुरू असताना एक नववधू मतमोजणी केंद्रात पोहोचली. तिला पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. नंतर समजले की, मिलक ब्लॉकच्या वॉर्ड क्र. १३५ मधून निवडणूक लढवणाऱ्या पूनम शर्मा हिचा विवाह मतमोजणीवेळी सुरू होता. त्याचवेळी तिला ती निवडणुकीत विजयी झाल्याची माहिती मिळाली. निवडणूक जिंकल्याची बातमी कळताच तिच्या आनंदाला पारावार उरला नाही आणि लग्नाचे विधी अर्ध्यावरच सोडून ती निवडणूक जिंकल्याचे प्रमाणपत्र घेण्यासाठी मतमोजणी केंद्रात पोहोचली.
रामपूरमधील मिलक ब्लॉकमधील मोहम्मदपूर जदीद येथील रहिवासी असलेल्या गंगासरन यांची २३ वर्षीय मुलगी पूनम शर्मा वॉर्ड क्र. १३५ मधून निवडणूक लढवत होती. दरम्यान, तिच्या विवाहाची तारीख २ मे निश्चित झाली. योगायोग म्हणजे त्याच दिवशी निवडणुकीचा निकाल होता. कोरोनाचे नियम पाळून हा विवाह सोहळा सुरू होता.
याचदरम्यान पूनमला ती निवडणूक जिंकल्याची बातमी मिळाली. तेव्हा ती वधूच्या वेशातच निवडणूक जिंकल्याचे प्रमाणपत्र घेण्यासाठी मतदान केंद्रात पोहोचली. निवडणूक जिंकल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता.
माझा विवाह बरेली जिल्ह्यातील वफरी थाना शाहीतील रहिवासी रिंकू याच्याशी होत आहे. विवाहाच्या दिवशी अशी खूशखबर मिळेल असे मला वाटले नव्हते. पूनम हिने प्रतिस्पर्धी उमेदवार मुकेश यांना ३१ मतांनी पराभूत केले.
विवाहाचं प्रमाणपत्र घेऊन लग्नमंडपात पोहोचल्यावर पूनम हिने विवाहातील उर्वरित विधी पूर्ण केले. तसेच विवाहाच्या दिवशीच मिळालेली विजयाची भेट घेऊन ती सासरी गेली.