जयंत पाटलांचा चढला पारा, भाषण थांबवून परत गेले; नंतर झाप-झाप झापले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 04:51 PM2024-09-26T16:51:08+5:302024-09-26T16:59:00+5:30

भाषणाची सुरूवात करत असतानाच एका कार्यकर्त्याने घोषणाबाजी केली आणि जयंत पाटलांनी भाषण थांबवले. त्यानंतर ते जागेवर बसण्यासाठी गेले. पण, स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विनंती केल्यानंतर पुन्हा आले आणि कार्यकर्त्या झाप-झाप झापले.

शिवस्वराज्य यात्रा अकोलेमध्ये असताना जयंत पाटलांचे वेगळेच रुप कार्यकर्त्यांना बघायला मिळाले. भाषणाच्या सुरूवातीलाच कार्यकर्त्याने घोषणाबाजी केल्याने जयंत पाटलांनी भाषणच थांबवले आणि जागेवर गेले. त्यानंतर परत आल्यावर त्यांनी कार्यकर्त्याला चांगलेच सुनावले.

शिवस्वराज्य यात्रा गुरुवारी (२६ सप्टेंबर) अकोलेमध्ये होती. यावेळी झालेल्या कार्यक्रमात हा सगळा प्रकार घडला. जयंत पाटील यांनी भाषण सुरू केल्यानंतर एका कार्यकर्त्याने मध्येच घोषणा दिल्या. जयंत पाटील म्हणाले, कोण आहे? हात वर कर. मी भाषणच संपवतो. तुम्ही चर्चा करा', असे म्हणत संतापलेल्या जयंत पाटलांनी भाषण थांबवलं.

त्यानंतर त्यांना स्थानिक नेते, खासदार अमोल कोल्हे यांनी विनंती केली. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्या कार्यकर्त्याला शांत बसण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर जयंत पाटील भाषणाला आले आणि म्हणाले, "असा पोरकटपणा करणार असाल, तर सगळ्यांची भाषणं झालेली आहेत. मला काही रस नाही. मी पुढची सभा आहे. वेळ वाचवायला मी लगेच जातो.'

त्यानंतर जयंत पाटील म्हणाले, "288 मतदारसंघा आहेत. महाविकास आघाडीचे जागावाटप चालू आहे. ३०-१ तारखेला त्याच्यावर शिक्कामोर्तब होईल. शिक्कामोर्तब झाल्यानंतर आपल्या वाट्याला जे मतदारसंघ येणार, त्याचे उमेदवार आपण त्यानंतर घोषित करणार."

"मी जर असे उमेदवार घोषित करायला गेलो. याने मागणी केली तशी, तर महाविकास आघाडीतील दोन मित्रपक्षांना आक्षेप आहे. तुम्ही घोषणा करायला लागलात, तर आम्ही घोषणा करूया का?", असे जयंत पाटील म्हणाले.

"त्यामुळे काहीतरी तारतम्य बाळगायला पाहिजे, कारण आपल्याला आघाडी टिकवायची आहे. त्यामुळे या मतदारसंघात कुणाला उभे करणार, हे जर तुला कळलं नसेल, तर तुझ्यासारखा येडा दुनियेत माणूस नाही मग", अशा शब्दात जयंत पाटलांनी त्या कार्यकर्त्याला झापले.

जयंत पाटील पुढे म्हणाले, "तुझ्या बुद्धीची कीव करतो. तो जाणारच ना. पण, असे समर्थक असतील, तर आपला प्रॉब्लेम होईल. आपल्याला महाविकास आघाडी टिकवायची आहे. शिवसेना आणि काँग्रेस दोन्ही पक्ष आपल्याला बरोबर घ्यायचे आहेत."

"त्यांचा सन्मान करत आपल्याला महाविकास आघाडी चालवायची आहे म्हणून नाव घेणं योग्य नाही. पण, महाविकास आघाडीचे निर्णय हे दोन-तीन तारखेला जातील. दुसरा महत्त्वाचा प्रॉब्लेम असा आहे की, आता श्राद्ध पक्ष आहे. मुहूर्तावर घोषणा झाली पाहिजे. घट बसायला पाहिजेत. काय म्हणजे", असे म्हणत जयंत पाटलांनी इशाऱ्यानेच डोक्याचा पत्ताच नाही असे म्हटले.

"मी कुठेच उमेदवार घोषित केला नाही. जामनेरमध्ये एक नवीन नेते भाजपातून आपल्या पक्षात आले आहेत. त्याचंही नाव जाहीर केले नाही. मी फक्त भाषणात सांगितले की, त्यांच्या हातात तुतारी दिलेली आहे. कारण करू शकत नाही", असे जयंत पाटील म्हणाले.