Kalyan Singh: राम मंदिरासाठी मुख्यमंत्रिपद लावले पणाला, हिंदुत्वाचा जोर दाखवला, अन् अटलजींशीही पंगा घेतला; असा होता कल्याण सिंह यांचा राजकीय प्रवास By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2021 09:19 AM 2021-08-22T09:19:17+5:30 2021-08-22T09:35:36+5:30
Kalyan Singh News: उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि राजस्थान व हिमाचल प्रदेशचे माजी राज्यपाल कल्याण सिंह यांचे काल रात्री निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्यावर २३ ऑगस्ट रोजी नरौला येथील गंगा किनाऱ्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि राजस्थान व हिमाचल प्रदेशचे माजी राज्यपाल कल्याण सिंह यांचे काल रात्री निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्यावर २३ ऑगस्ट रोजी नरौला येथील गंगा किनाऱ्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
उत्तर प्रदेशमध्ये बहुजन समाजातून पुढे आलेले नेते, भाजपाच्या हिंदुत्वाला जमिनीवर प्रत्यक्षात उतरवून पक्षाला दणदणीत यश मिळवून देणारे, राम मंदिरासाठी आपले सरकार पणाला लावणारे नेते म्हणून भारतीय राजकारणात कल्याण सिंह ओळखले जातील.
कल्याण सिंह जनसंघाच्या काळापासूनच मागास जातींमधील चेहरा म्हणून पुढे आले होते. ९० च्या दशकात राम मंदिराचा मुद्दा ऐरणीवर येऊन लालकृष्ण अडवाणी यांनी रथयात्रा काढल्यानंतर अयोध्येत जमा होत असलेल्या कारसेवकांवर मुख्यमंत्री मुलायम सिंह यांच्या काळात गोळीबार झाला होता. त्यानंतर कल्याण सिंह यांनी जोरदार आंदोलन केले होते. त्यामुळे राज्यातील मुलायम सिंह यांचे सरकार गेले. तसेच भाजपा २२१ जागांसह बहुमताने राज्यात सत्तेवर आले होते.
कल्याण सिंह अयोध्येतील राम जन्मभूमी आंदोलनातील आघाडीवर राहिलेल्या नेत्यांपैकी एक होते. त्यांनी राम मंदिराच्या निर्मितीचे कार्य पुढे जावे यासाठी प्रसंगी मुख्यमंत्रिपदही पणाला लावले होते.
६ डिसेंबर रोजी अयोध्येतील बाबरी मशीद पाडली गेल्यानंतर कल्याण सिंह यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हा राज्यपालांनी या घटनेसाठी जबाबदार ठरवून कल्याण सिंह सरकार बरखास्त केले होते.
त्यानंतर कल्याण सिंह यांच्या राजकारणात अनेक उतार-चढाव आले. त्यानंतर १९९७ ते १९९९ या काळात मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून कल्याण सिंह यांचे अटल बिहारी वाजपेयी यांच्याशी तीव्र मतभेद झाले. त्यांची भाजपातून हकालपट्टीही करण्यात आली.
नंतर कल्याण सिंह यांनी राष्ट्रीय क्रांती पार्टीची स्थापना केली आणि उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवली. त्यात त्यांचे चार आमदार निवडून आले. मात्र त्यांच्या पक्षामुळे भाजपाचे जबर नुकसान झाले. तसेच भाजपा आणि कल्याण सिंह हे उत्तर प्रदेशमधील राजकारणात बाजूला फेकले गेले.
पुढे २००४ मध्ये अटल बिहारी वाजपेयींच्या निमंत्रणावरून ते पुन्हा भाजपामध्ये दाखल झाले. मात्र त्यांने आधीएवढे अधिकार मिळाले नाहीत. तरी ते बुलंदशहर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. पुढे २००७ ची विधानसभा निवडणूक भाजपाने कल्याण सिंह यांच्या नेतृत्वाखाली लढवली. मात्र त्यात त्यांना यश आले नाही.
२००९ मध्ये कल्याण सिंह पुन्हा एकदा भाजपापासून दूर झाले आणि त्यांनी मुलायम सिंह यादव यांच्याशी जवळीक साधली. २००९ मध्ये ते मुलायम सिंह यांच्या पाठिंब्याने एटा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आले. मात्र नंतर मुलामय सिंह यांनी त्यांच्याशी असलेले राजकीय संबंध तोडले.
अखेर २०१३ मध्ये कल्याण सिंह यांचे भाजपामध्ये पुनरागमन झाले. २०१४ मध्ये मोदींच्या आवाहनावरून त्यांनी भाजपासाठी जोरदार प्रचार केला. त्या निवडणुकीत भाजपाला उत्तर प्रदेशमध्ये ८० पैकी ७१ जागांवर विजय मिळाला. त्यानंतर कल्याण सिंह यांना राजस्थानचे राज्यपाल बनवण्यात आले. २०१५ मध्ये त्यांच्याकडे हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदाची अतिरिक्त जबाबदारीही सोपवण्यात आली होती.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खराब होत गेली. तसेच रुग्णालयात उपचार सुरू असताना मल्टि ऑर्गन फेल्युअरमुळे त्यांचा मृत्यू झाला. ज्या राम मंदिरासाठी कल्याण सिंह यांनी राजकीय संघर्ष केला. ते पूर्ण झालेले पाहण्याची संधी त्यांना मिळाली नाही.