जाणून घ्या, ठाकरे, पवार यांच्यासह 'या' 11 घराण्यांच्या हाती महाराष्ट्राचं राजकारण! By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 08:55 PM 2019-10-02T20:55:43+5:30 2019-10-02T21:01:28+5:30
विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. सर्वच राजकीय पक्ष आखाड्यात उतरलेले आहेत. मात्र राज्यातील राजकारण पाहिलं तर 11 घराण्यांच्या भोवती गुंडाळलं गेलं आहे. पवार, ठाकरे घराणं सर्वांनाच माहित आहे. त्याव्यतिरिक्तही स्थानिक पातळीवरील काही घराणे राजकारणात आपला दबदबा कायम ठेवतात. पवार - राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे राज्यातील राजकारणात आहे. पवार घराण्यातील तिसरी पिढी रोहित पवार, पार्थ पवार हेदेखील राजकारणात सक्रीय झालेत.
ठाकरे - मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना संघटना उभी केली. आज बाळासाहेब ठाकरेंनंतर उद्धव ठाकरे पक्षप्रमुख म्हणून ही संघटना सांभाळतात. त्याचसोबत बाळासाहेब ठाकरेंचे पुतणे राज ठाकरे हेदेखील मनसे पक्षाच्या माध्यमातून राजकारणात चर्चेत असतात. ठाकरे घराण्यातील तिसरी पिढी आदित्य ठाकरे यंदाच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. तर अमित ठाकरेही मनसेच्या कार्यक्रमात दिसून येतात.
मुंडे - भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याभोवती बीड जिल्ह्याचं राजकारण फिरत असते. गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा मुंडे या राज्यात मंत्री आहेत, दुसरी मुलगी प्रीतम मुंडे खासदार आहे तर धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रीय आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते म्हणून ते जबाबदारी सांभाळतात.
भुजबळ - राज्याच्या राजकारणात भुजबळ कुटुंबही चर्चेत आहे. छगन भुजबळ, समीर भुजबळ आणि पंकज भुजबळ हे तिघंही राजकारणात सक्रीय आहेत.
चव्हाण - माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे कुटुंब म्हणजे अशोक चव्हाण. नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांचा दबदबा आहे. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अशोक चव्हाण यांनी पत्नी अमिता चव्हाण यांच्या मतदारसंघातून विधानसभेसाठी उभे आहेत.
देशमुख - विलासराव देशमुख राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांच्यानंतर मुलगा अमित देशमुख आणि धीरज देशमुख हे विधानसभेसाठी निवडणूक लढविणार आहेत.
निलंगेकर-पाटील- माजी मुख्यमंत्री शिवाजी पाटील निलंगेकर 1985-86 दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा दिलीप निलंगेकर आणि नातू संभाजी पाटील निलंगेकर राजकारणात सक्रीय आहेत.
राणे - कोकणचे नारायण राणे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. शिवसेना-काँग्रेस अन् आता भाजपा असा राणेंचा प्रवास आहे. त्यांचे चिरंजीव नितेश राणे हे आमदार आहेत तर निलेश राणे माजी खासदार आहेत.
विखे-पाटील - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील यांचे चिरंजीव राधाकृष्ण विखे पाटील सध्या भाजपाच्या मंत्रिमंडळात आहेत. तर पुत्र सुजय विखे पाटील हे अहमदनगरमधून खासदार आहेत.
शिंदे - महाराष्ट्रातील उपनिरीक्षकापासून ते देशाचे गृहमंत्री पर्यंत प्रवास करणारे कॉंग्रेस नेते सुशील कुमार शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यांची मुलगी प्रणिती शिंदे यादेखील यंदाच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून उभ्या आहेत.
वसंतदादा पाटील - वसंतदादा पाटील यांचे राज्याच्या राजकारणावर चांगलेच वर्चस्व राहिलेले आहे. सध्या पाटील परिवाराची तिसरी पिढी राज्याच्या राजकारणात सक्रिय आहे. त्यांच्या पत्नी केंदीय मंत्री राहिलेल्या आहेत तर पुत्र प्रकाश आणि नातू प्रतीक हे सांगलीतून खासदार राहिलेले आहेत.