सहा मतदारसंघांमध्ये महायुती, मविआच्या उमेदवारांची गणिते बिघडणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 04:24 PM2024-11-12T16:24:52+5:302024-11-12T16:54:39+5:30

Maharashtra Assembly election 2024: नाशिक जिल्ह्यातील १५ मतदारसंघांपैकी १४ मतदारसंघांमध्ये प्रामुख्याने महायुती आणि मविआमध्येच चुरशीच्या लढती आहेत. मात्र, त्यातही ६ मतदारसंघांमध्ये बंडखोर, अपक्ष आणि काही लहान पक्षांच्या उमेदवारांना मिळू शकणारे मतदान हे तेथील प्रस्थापित उमेदवारांचे समीकरण बिघडवणारे ठरण्याची शक्यता आहे. त्यात काही जागांवर तर अपक्ष, बंडखोर 'डार्क हॉर्स' ठरत बाजी मारण्याची किंवा किमान प्रस्थापित उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकावर फेकत प्रमुख प्रतिस्पर्धी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नाशिक जिल्ह्यातील अशा चर्चेतल्या जागांमध्ये प्रामुख्याने नांदगाव, नाशिक पश्चिम, देवळाली, इगतपुरी, चांदवड आणि मालेगाव मध्यचा समावेश आहे. या जागांवरील बंडखोर, अपक्ष किंवा लहान पक्षांचे उमेदवार किती मते मिळवतात, त्यावर या निवडणुकांचा निकाल निश्चित होण्याची शक्यता असल्याची त्या मतदारसंघांमध्येच चर्चा आहे. त्यामुळे या सहा मतदारसंघांमध्ये चकित करणारे निकाल लागले तरी कुणालाही फारसे आश्चर्य वाटणार नाही.

चांदवड देवळा विधानसभा : महायुतीतर्फे भाजपाकडून आमदार डॉ. राहुल आहेर यांना मविआतर्फे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार शिरीष कोतवाल यांच्यातील लढतीत भाजपा जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्या अपक्ष बंडखोर उमेदवारीने तिहेरी रंग आला आहे. त्यात पूर्वापार या मतदारसंघात मतदारांचे चांदवड विरुद्ध देवळा असे विभाजन होत आले आहे. मात्र, यावेळी देवळ्ळ्यातून दोन आहेर आणि चांदवडमधून कोतवाल असे समीकरण बनल्याने दोन्ही तालुक्यांतील मतदार त्यांचा पूर्वीचाच पॅटर्न कायम राखतात की यावेळी त्यात फरक करणार, त्यावर या मतदारसंघाचे भवितव्य निश्चित होईल.

नाशिक पश्चिम विधानसभा : या मतदारसंघात भाजपाच्या विद्यमान आमदार सीमा हिरे यांना उद्धवसेनेचे सुधाकर बडगुजर यांच्याशी झुंजावे लागत आहे. मात्र, भाजपमधून पक्षांतर करीत मनसेत दाखल झालेले दिनकर पाटील तसेच निवडणुकीपूर्वी स्वराज्य पक्षातून उमेदवारी मिळविलेले दशरथ पाटील यांच्यामुळे या लढतीला चौरंगी लढतीचे परिमाण प्राप्त झाले आहे. त्यातही खान्देशी मतदार, मराठा फॅक्टर, ओबीसी फॅक्टर तसेच कोणता उमेदवार कुणाची किती मते खातो त्यावरही या मतदारसंघातील समीकरण फिरणार आहे.

मालेगाव मध्य विधानसभा : मालेगाव मध्य मतदारसंघात एमआयएमचे उमेदवार मुफ्ती मोहम्मद इस्माईल, काँग्रेसकडून एजाज बेग, समाजवादी पार्टीकडून निहाल अहमद यांच्या कन्या शान ए हिंद आणि माजी महापौर आणि माजी आमदार आसिफ शेख यांनी कोणत्याही पक्षाकडून उमेदवारी न घेता अपक्ष अर्ज दाखल करीत येथील लढत चौरंगी झाली आहे. मुस्लीम समाजातील अंतर्गत जातीय समीकरणे तसेच समाजातील मौलवींकडून मिळणाऱ्या संदेशांवर या मतदारसंघातील कल निश्चित होणार आहे.

देवळाली विधानसभा : या मतदारसंघात महायुतीच्या सरोज अहिरे यांच्याविरुद्ध मविआकडून उद्धवसेनेचे योगेश घोलप अशी दुरंगी भासणारी लढत शिंदेसेनेने राजश्री अहिरराव यांना एबी फॉर्म दिल्याने तिरंगी झाली. त्यात सध्या शिंदेसेनेकडून पत्ते उघड केले नसले तरी समीकरणे कशी फिरतात, त्यावर अनेक बाबी अवलंबून राहणार आहेत. त्यामुळे ही अतिरिक्त उमेदवारी महायुतीसाठी डोकेदुखी ठरत असतानाच मनसेनेदेखील महिला उमेदवार मोहिनी जाधव यांना उमेदवारी दिल्याने या दोन महिला तिसऱ्या महिलेची किती मते घेतात त्यावर निर्णय निश्चित होईल.

इगतपुरी विधानसभा : या आदिवासी राखीव मतदारसंघात सर्वाधिक उलथापालथी झाल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसमधून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात गेलेले हिरामण खोसकर यांच्यासमोर काँग्रेसचे लकी जाधव अशी अधिकृत लढत आहे. मात्र, काँग्रेसच्या माजी आमदार निर्मला गावित यांची अपक्ष उमेदवारी आणि शिंदेसेनेतून मनसेत गेलेले माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांच्यापैकी कोणता उमेदवार इगतपुरी, त्र्यंबकवासीयांना जवळचा वाटतो त्याचा अंदाज बांधणे राजकीय तज्ज्ञांनादेखील मुश्कील झाले आहे. आदिवासी समाजांमधील उपजाती, गट, तट आणि कोणत्या भागात कोण किती मते खेचतो त्या समीकरणांवर या मतदारसंघातील उमेदवारांचे १ ते ४ नंबर निश्चित होणार आहेत.

नांदगाव विधानसभा : महायुतीकडून शिंदेसेनेचे विद्यमान आमदार सुहास कांदे यांच्यासमोर मविआच्या उद्धवसेनेतर्फे गणेश धात्रक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, माजी खासदार समीर भुजबळ यांच्या अपक्ष उमेदवारीसह डॉ. रोहन बोरसे यांच्या उमेदवारीने ही लढत चौरंगी झाली आहे. प्रारंभी ओबीसी विरुद्ध ओबीसी भासणारी ही लढत आता तीन ओबीसी, एक मराठा अशी चौरंगी होत आहे. त्यातही स्थानिक, उपरा असे वाद यामुळे या मतदारसंघात कोण बाजी मारेल, त्याचा अंदाज बांधणे मतदारसंघातील जाणकारांनादेखील अवघड झाले आहे.