रेल्वे बजेटनंतर 12 तासांत ममतांनी घोर अपमान केलेला, 9 वर्षांनी दिनेश त्रिवेदींनी बदला घेतला By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 04:53 PM 2021-02-12T16:53:58+5:30 2021-02-12T17:04:54+5:30
Dinesh Trivedi Resigned: मोठमोठे नेते तृणमूल सोडून भाजपात जात आहेत. यामुळे ही संधी आता त्रिवेदींनी साधून ममता यांनी केलेल्या अपमानाचा एकप्रकारे बदलाच घेतला आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि माजी केंद्रीय रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी (Dinesh Trivedi) यांनी आज (शुक्रवार) राज्यसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान राजीनामा देत असल्याची घोषणा केली.
भर राज्यसभेत राजीनाम्याची घोषणा करणाऱ्या दिनेश त्रिवेदींचे हसू ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी 9 वर्षांपूर्वीच घालवले होते. त्रिवेदी तेव्हा मनमोहन सरकारचे रेल्वेमंत्री होते. त्यांना मोठा अपमान सहन करावा लागला होता. रेल्वे अर्थसंकल्प मांडल्यानंतर ममतांनी त्यांना पायऊतार होण्यास सांगितले होते.
तेव्हा झालेला अपमान त्रिवेदी यांच्या मनात सलत होता. गोष्ट 2012 सालची आहे. युपीए-२ सरकारमध्ये त्रिवेदी टीएमसी कोट्यातून रेल्वेमंत्री होते. त्यांनी 14 मार्च, 2012 मध्ये संसदेत रेल्वे बजेट सादर केले. परंतू त्यानंतर जे झाले ते मनमोहन सिंगदेखील इच्छा असून थांबवू शकले नाहीत. त्याच अॅक्शनची रिअॅक्शन आज पहायला मिळाली आहे.
14 मार्चचा दिवस उजाडला. त्रिवेदींच्या चेहऱ्यावर हसू होते. देशातील सर्वात मोठ्या संस्थेचे बजेट ते सादर करणार होते. त्यांचेही हे पहिलेच बजेट होते. त्यांना तेव्हा अंदाजही नव्हता की सायंकाळी त्यांच्या चेहऱ्यावरील हसू हिसकावून घेतले जाणार आहे.
त्रिवेदी यांनी बजेटमध्ये रेल्वेच्या भाड्यात वाढ करत असल्याची घोषणा केली, अन तिकडे ममता बॅनर्जी यांचा चेहरा रागाने लाल झाला. त्रिवेदी यांनी प्रवासी भाड्यात 2 ते 30 पैसे प्रती किमीची वाढ केली होती. बरीच वर्षे ही वाढ झाली नव्हती. रेल्वेच्या विकासासाठी हे गरजेचेही होते.
ममता यांना हे कळताच त्यांनी थेट तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना फोन लावला. ममता यांच्यासोबतच पक्षातील अन्य नेत्यांनाही ही दरवाढ आवडली नाही. ममता यांनी मनमोहन यांना फोन करून त्रिवेदी यांना रेल्वेमंत्री पदावरून हटविण्यास सांगितले. त्यांनी त्यांच्याजागी मुकुल रॉय यांचे नाव देखील सुचविले.
इकडे मनमोहन सिंग टेन्शनमध्ये आले. रेल्वे बजेट झाल्याझाल्याच रेल्वे मंत्र्यांना कसे हटवायचे? सरकारची नामुष्की होईल, ममतांना त्यांनी समजवायचा प्रयत्न केला. मात्र, हट्टाला पेटलेल्या ममता यांनी त्यांचे काहीच ऐकले नाही. रेल्वे मंत्री पद हे तृणमूलच्या कोट्याचे असल्याने त्यांचाही नाईलाज होता.
दिनेश त्रिवेदींना ममतांकडून या कारवाईची अपेक्षा नव्हती. असे कसे त्यांना पदावरून हटवितायत. त्रिवेदी यांनी पक्षाक़डून लेखी आदेश मागितला. तसेच हे खरे आहे का, हे विचारण्यासाठी त्यांनी ममतांना फोन केला. तिकडे ममतांनी त्यांनी तुम्हाला पद सोडावेच लागेल, असे स्पष्ट सांगितले.
त्रिवेदी यांनी जड अंतकरणाने 18 मार्च, 2012 ला रेल्वे मंत्रीपदाचा राजीनामा दिला. रेल्वे भाडेवाढीवर जनतेमध्ये रोष दिसला नव्हता. तसेच पंतप्रधान मनमोहन सिंगांनी तसेच रेल्वेच्या पाचही संघटनांनी बजेटचे समर्थन केले होते. अखेर मनमोहन यांनी त्रिवेदींना मंत्रिमंडळातून काढल्याची माफीही मागितली होती.
यानंतर 2015 पासून त्रिवेदी तृणमूल सोडणार असल्याच्या चर्चा होत होत्या. तेव्हा ते भाजपात जाणार असल्याचे बोलले जात होते. आता ममता बॅनर्जी यांच्याविरोधात बंगालमध्ये वातावरण तयार होऊ लागले आहे. मोठमोठे नेते तृणमूल सोडून भाजपात जात आहेत. यामुळे ही संधी आता त्रिवेदींनी साधून ममता यांनी केलेल्या अपमानाचा एकप्रकारे बदलाच घेतला आहे.