“PM मोदी म्हणाले, उद्योग खाते मुद्दाम तुमच्याकडे दिलेय; तुम्ही माझ्या अपेक्षा पूर्ण करा” By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 01:53 PM 2021-08-20T13:53:54+5:30 2021-08-20T13:59:42+5:30
narayan rane: जनआशीर्वाद यात्रा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ही कल्पना आली आणि त्यांनी आम्हा सर्वांना जनतेपर्यंत जाण्यास सांगितले, असे नारायण राणे म्हणाले. केंद्रात नव्याने मंत्री झालेल्या महाराष्ट्रातील चार नेते राज्याच्या विविध भागात जनआशीर्वाद यात्रा काढत आहेत. केंद्र सरकारचे चांगले निर्णय जनतेपर्यंत पोहोचवितानाच राज्यातील आघाडी सरकारवर टीकास्र सोडणे, अशी या यात्रेची दुहेरी रणनीती असेल, असे सांगितले जात आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री नारायण राणे, डॉ . भारती पवार, डॉ . भागवत कराड आणि कपिल पाटील हे चार नवनियुक्त मंत्री जनतेशी संवाद साधणार आहेत.
केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी गुरुवारपासून जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात केली. नारायण राणे ७ दिवस चालणाऱ्या जनआशीर्वाद यात्रेत एकूण १७० हून अधिक भागांना भेट देणार आहेत. जनआशीर्वाद यात्रेची सुरुवात झाल्यानंतर शुक्रवारी नारायण राणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
जनआशीर्वाद यात्रा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ही कल्पना आली आणि त्यांनी आम्हा सर्वांना जनतेपर्यंत जाण्यास सांगितले. जनतेचे आशिर्वाद घेऊन तुमच्या खात्याचा कारभार करा, असे नारायण राणे यांनी सांगितले आहे. (narayan rane)
त्यांच्या मार्गदर्शनापासून महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होऊन आम्ही निघालो आणि पूर्ण मुंबईमध्ये जनआशीर्वाद यात्रा घेऊन गेलो, असे नारायण राणे यांनी सांगितले. नारायण राणे यांनी दादर येथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेतले.
उद्योग-धंद्यात तरुणांनी यावे. रोजगार निर्माण करावे, देशाचे उत्पन्न वाढावे, निर्यात वाढावी, यासाठी मी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी पंतप्रधान मोदींनी मला बोलावून सांगितले हे खाते मुद्दाम तुमच्याकडे दिलेय. तुम्ही यामध्ये माझ्या अपेक्षा पूर्ण करा, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे, असे नारायण राणे यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात खासदार नारायण राणे स्थान देण्यात आले. यानंतर नारायण राणेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आभारी असल्याचे सांगितले.
दरम्यान, दिल्लीतील भाजप नेतृत्वाने नारायण राणेंकडे कोकण आणि मुंबईची जबाबदारी दिली असून, मुंबई महापालिकेची निवडणूक पुढच्या वर्षी होत असल्याने मिशन ११४ ची जबाबदारी दिली आहे.
मुंबई महापालिकेत ११४ जागा किंवा त्याहून अधिक जागा निवडून आणण्याची जबाबदारी देण्यात आली असून, कोणत्याही परिस्थितीत हे मिशन यशस्वी करा, असे पक्षश्रेष्ठींकडून सांगण्यात आले आहे.
शिवसेनेला शह देण्यासाठी नारायण राणेंकडे मिशन देण्यात आले असून, महापालिका निवडणुकीत शिवसेनेविरोधात राणेंच्या ताकदीचा पुरेपूर वापर करून घेण्याचे भाजपने ठरवल्याचे सांगितले जात आहे.
यावर भाष्य करताना शिवसेनेचा मुंबई महानगरपालिकेतील ३२ वर्षांचा पापाचा घडा भरला आहे. विरोधाबाबत डाव्या उजव्याला बोलायला लावू नये, स्वत: बोलावे. आम्ही जशास तसे उत्तर देऊ शकतो. आमची तशी ख्याती आहे. मांजरीसारखे आडवे येऊ नये.
येणारी मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप जिंकणार. ३२ वर्षांचा पापाचा घडा फुटल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास आहे, असा हल्लाबोल नारायण राणे यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केला.