बसवराज बोम्मईच नाही तर भारतीय राजकारणातील हे नेते वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत बनले मुख्यमंत्री By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 03:11 PM 2021-07-28T15:11:03+5:30 2021-07-28T15:33:55+5:30
Politics In India: पित्यानंतर पुत्रानेही राज्याचे नेतृत्व करण्याची भारतीय राजकारणातील ही पहिलीच वेळ नाही. भारतीय राजकारणातील हे नेते वडलांच्या पावलावर पाऊल टाकत मुख्यमंत्री बनले आहेत. त्यांची माहिती पुढीलप्रमाणे. सोमप्पा रायप्पा बोम्मई आणि बसवराज बोम्मई कर्नाटक भाजपाने राज्यातील नेतृत्वात बदल करत बसवराज बोम्मई यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली आहे. दरम्यान, बसवराज बोम्मई यांच्याआधी त्यांचे वडील सोमप्पा रायप्पा बोम्मई यांनीही कर्नाटकचे मुख्यमंत्रिपद सांभाळले होते. पित्यानंतर पुत्रानेही राज्याचे नेतृत्व करण्याची भारतीय राजकारणातील ही पहिलीच वेळ नाही. भारतीय राजकारणातील हे नेते वडलांच्या पावलावर पाऊल टाकत मुख्यमंत्री बनले आहेत. त्यांची माहिती पुढीलप्रमाणे.
एच.डी. देवेगौडा आणि कुमारस्वामी देशाचे माजी पंतप्रधान असलेले एच.डी. देवेगौडा हे डिसेंबर १९९४ ते मे १९९६ या काळात कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर ते जून १९९६ मध्ये त्यांनी देशाच्या पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली होती. दरम्यान देवेगौडांचे पुत्र एच.डी. कुमारस्वामी यांनी दोनवेळा कर्नाटकचे मुख्यमंत्रिपद सांभाळले आहे.
करुणानिधी आणि स्टॅलिन तामिळनाडूमधील द्रमुकचे दिवंगत नेते एम. करुणानिधी यांनी १९६९ ते २०११ या काळात पाच वेळा राज्याचे मुख्यमंत्रिपद सांभाळले होते. दरम्यान, त्यांचे पुत्र स्टॅलिन हे सध्या तामिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत.
वाय.एस.आर. रेड्डी आणि जगनमोहन रेड्डी आंध्र प्रदेशमधील काँग्रेसचे दिग्गज नेते असलेले दिवंगत वायएसआर रेड्डी यांनी २००४ ते २००९ या काळात राज्याचे मुख्यमंत्रिपद भुषवले होते. दरम्यान, त्यांचे पुत्र आणि वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगनमोहन रेड्डी हे सध्या आंध्र प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री आहेत.
बीजू पटनाईक आणि नवीन पटनाईक ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांचे वडील बीजू पटनाईक हे १९६१ ते १९६३ आणि १९९० ते १९९५ या काळात राज्याचे मुख्यमंत्री होते. तर नवीन पटनाईक हे २००० पासून सलग पाच वेळा ओदिशाच्या मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले आहेत.
दोरजी खांडू पेमा खांडू अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांचे वडील दोरजी खांडू यांनीही अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री झाले होते. २०११ मध्ये दोरजी खांडू यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला होता.
शिबू सोरेन आणि हेमंत सोरेन झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे वडील शिबू सोरेन यांनीही तीन वेळा झारखंडचे मुख्यमंत्रिपद भूषवले होते. तर हेमंत सोरेन यांनी दोनवेळा राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. हेमंत सोरेन यांच्या दुसऱ्या कार्यकाळाची सुरुवात २०१९ मध्ये केली होती.
शेख अब्दुल्ला आणि फारुख अब्दुल्ला काश्मीरमध्ये अब्दुल्ला कुटुंबातील तीन व्यक्ती मुख्यमंत्री राहिले आहेत. यामध्ये शेख अब्दुल्ला, त्यांचे पुत्र फारुख अब्दुल्ला आणि फारुख अब्दुल्लांचे पुत्र ओमर अब्दुल्ला यांनीही राज्याचे मुख्यमंत्रिपद सांभाळले आहे.
फारुख अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्ला फारुख अब्दुल्लांचे पुत्र ओमर अब्दुल्ला यांनीही जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्रिपद सांभाळले आहे.
मुलायम सिंह यादव आणि अखिलेश यादव उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव आणि त्यांचे पुत्र अखिलेश यादव यांनी राज्याचे मुख्यमंत्रिपद सांभाळले आहे. मुलायम सिंह यादव यांनी तीनवेळा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली. तर अखिलेस यादव यांनी २०१२ ते २०१७ या काळात मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली होती.
हेमवतीनंदन बहुगुणा आणि विजय बहुगुणा उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांचे वडील हेमवतीनंदन बहुगुणा हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते.
देवीलाल आणि ओमप्रकाश चौटाला हरियाणामध्ये देवीलाल यांनी राज्याचे मुख्यमंत्रिपद सांभाळले होते. तर नंतर त्यांचे पुत्र ओमप्रकाश चौटाला यांनीही राज्याचे मुख्यमंत्रिपद सांभाळले होते.
मुफ्ती मोहम्मद सईद आणि मेहबूबा मुफ्ती जम्मू काश्मीरमध्ये वडील आणि कन्येने राज्याचे मुख्यमंत्रिपद सांभाळले आहे. मुफ्ती मोहम्मद सईद हे जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर त्यांची कन्या मेहबूबा मुफ्ती यांनीही राज्याचे मुख्यमंत्रिपद सांभाळले होते.
शंकरराव चव्हाण आणि अशोक चव्हाण पिता-पुत्रांची राज्याचे मुख्यमंत्रिपद सांभाळल्याचा योगायोग महाराष्ट्रामध्येही जुळून आलेला आहे. महाराष्ट्रामध्ये शंकरराव चव्हाण यांनी राज्याचे नेतृत्व केले होते. त्यानंतर त्यांचे पुत्र अशोक चव्हाण यांनीही राज्याचे मुख्यमंत्रिपद सांभाळले.