Pratap Patil Chikhalikar: २० वर्षात चिखलीकरांनी पाचव्यांदा बदलला पक्ष, असा आहे इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 02:20 PM2024-10-25T14:20:54+5:302024-10-25T14:30:44+5:30

Pratap Patil Chikhalikar history: शिवसेनेचे माजी आमदार, भाजपाचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

विधानसभा निवडणुकीमुळे पक्ष बदलण्याची मोठी लाट महाराष्ट्रात आली आहे. आयात उमेदवार मोठ्या संख्येने दिसत असून, यात एक नाव आता माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचंही जोडलं गेलं आहे.

२०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत पराभव होताच प्रताप पाटील चिखलीकरांनी विधानसभेची तयारी सुरू केली होती. आता त्यांना पाचव्यांदा पक्षांतर करत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवली आहे.

लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असलेल्या प्रताप पाटील चिखलीकर यांनी गेल्या २० वर्षात पाचव्यांदा पक्षांतर केले आहे. काँग्रेसमधून राजकीय कारकीर्द सुरू केल्यानंतर चिखलीकरांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वेगवेगळ्या पदांवर काम केले.

२००४ मध्ये त्यांनी लोहा कंधार मतदारसंघातून विधानसभेची अपक्ष निवडणूक लढवली. त्यांना लोकभारती पक्षाचा पाठिंबा मिळाला होता. आमदार झाले. त्यानंतर २०१२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

२०१४ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला. विधानसभा निवडणूक लढवली आणि आमदार झाले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. नांदेड लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकले.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा प्रताप पाटील चिखलीकर यांना उमेदवारी मिळाली. पण, काँग्रेसच्या वसंतराव चव्हाण यांनी त्यांचा पराभव केला. वसंतराव चव्हाणांच्या निधनानंतर नांदेडची पोटनिवडणूक होत आहे, पण प्रताप पाटील चिखलीकरांना विधानसभेची निवडणूक लढवायची आहे.

आता प्रताप पाटील चिखलीकर यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून महायुतीचे उमेदवार म्हणून तिकिटही मिळवले आहे. या मतदारसंघात त्यांच्या विरोधात त्यांच्या बहिणीचे पती विद्यमान आमदार श्यामसुंदर शिंदे हे असणार आहेत.