Sachin Vaze: ठाकरे सरकारमधील 'ते' मंत्री रडारवर; वाझे प्रकरणात NIA चौकशी करणार By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 12:20 PM 2021-03-18T12:20:11+5:30 2021-03-18T12:28:21+5:30
Sachin Vaze case: सचिन वाझे प्रकरणावरून ठाकरे सरकारच्या अडचणी वाढणार; एनआयए लवकरच मंत्र्यांना समन्स बजावणार उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर आढळून आलेल्या स्फोटकांनी भरलेल्या कार प्रकरणात दररोज नवीन खुलासे होत आहेत. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे अडचणीत आले असताना, त्यांच्या विरोधात पुरावे आढळून येत असताना आता महाविकास आघाडी सरकारमधील मंत्रीदेखील अडचणीत येण्याची शक्यता आहे.
अंबानींच्या घराबाहेर आढळून आलेल्या कारचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे करत होते. मात्र अंबानींच्या घराबाहेर आढळून आलेली कार काही महिने वाझेच वापरत होते. त्या कारच्या मालकाशी वाझे यांची ओळख होती, अशी माहिती समोर आली. यामुळे वाझे अडचणीत आले.
तपास करणारे अधिकारीच संशयाच्या भोवऱ्यात सापडल्यानं गृहमंत्री अनिल देशमुखांनी त्यांना निलंबित केलं. यानंतर संपूर्ण प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (NIA) हाती घेतला. १३ मार्चला वाझेंनाच अटक करण्यात आली. यानंतर गेल्या काही दिवसांपासून वाझेंविरोधात एनआयएला महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत.
सचिन वाझेंना शिवसेना पाठिशी घालत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षानं वारंवार केला आहे. आता या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्रीच अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे.
एनआयए पुढील काही दिवसांत महाविकास आघाडी सरकारमधील एक-दोन मंत्र्यांची चौकशी करणार आहे. याबद्दलचं वृत्त एबीपी माझानं दिलं आहे. तसं झाल्यास सरकारच्या अडचणी वाढू शकतात.
एनआयएनं अद्याप तरी कोणत्याही मंत्र्याला चौकशीसाठी समन्स बजावलेलं नाही. पण लवकरच एनआयए एक-दोन मंत्र्यांना समन्स बजावणार असल्याचं समजतं.
सचिन वाझे मंत्र्यांच्या संपर्कात होते का, असल्यास कशासाठी, त्यांना मंत्र्यांकडून काही सूचना मिळाल्या का, या दृष्टीनं एनआयएनं तपास सुरू केला आहे. एनआयएचा तपास महाविकास आघाडी सरकारसाठी अडचणीचा ठरू शकतो.
सचिन वाझे प्रकरणावरून शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब गृह मंत्रालयात हस्तक्षेप करत असल्याची तक्रार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली होती.
भाजपचे आमदार नितेश राणेंनीदेखील पश्चिम उपनगरातला शिवसेनेचा एक नेता वाझे प्रकरणाशी संबंधित असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे अनिल परब यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
२०१८ मध्ये मी मुख्यमंत्री असताना सचिन वाझेंचं निलंबन मागे घेण्यासाठी उद्धव ठाकरेंनी फोन केला होता. वाझेंना पुन्हा सेवेत घेण्यासाठी शिवसेनाचा दबाव होता. त्यासाठी शिवसेनेचे काही मंत्रीदेखील माझ्या भेटीला आले होते, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
एनआयएचे अधिकारी मुंबई पोलीस दलातल्या अनेक बड्या अधिकाऱ्यांनादेखील चौकशीसाठी बोलावणार आहेत. मुंबई पोलीस दलात अनेक वरिष्ठ अधिकारी असताना त्यांना डावलून एपीआय दर्जाच्या अधिकाऱ्याला अंबानी स्फोटक प्रकरणाचा तपास का सोपवला गेला, याची चौकशी एनआयए करणार आहे.